वार्ड नं. ६ : आर्थोपिडिक्स

 

गीता रॉयच्या आवाजांतील चाकूचें रेशमी 
झळझळतें पातें ;
असंख्य हाकांच्या आर्तपणाचें अंतःकरणावर 
भुरभुरणारें जावळ
या विझत्या डोळ्यासमोर प्रतिबिंबांना 
तोलून धरणारी केरळी नर्स
तिच्या डोळ्यांत एका क्षणांत दिसतात 
कन्याकुमारीच्या रंगीत सूर्याचे उदयास्त.... 
आमच्या उजव्या पायाची दोन हाडें 
मोडली आहेत.

निव्वळ शारीरिक दुःखाच्या अप्रतिम कळा 
दुष्मनांच्या वाट्याला जाऊं नयेत
म्हणून आम्ही घेतल्या
द्यावेंसें वाटतें या यातनांच्या वैकुंठांत
केरळीं माडांना आलिंगन
कळांचा सर्वस्पर्शी ऑर्केस्ट्रा मेंदूच्या कांचेवर
इन्ग्रिड बर्गमनची आसवांत वाहणारी
प्रतिमा रचून जातो;
उजव्या पायाची दोन हाडे मोडली आहेत आणि
खोलीच्या दाराशीं बावीस सप्टेंबरच्या विसराळू 
संध्येचें बोट धरून केरळी नर्स
तिच्या स्तनांचें मीनाक्षी मंदिर रक्तांतून 
चकाकणारें....
राSSमS-S-S राम-S-S

यह वही दर है जहां आबरू नही जाती....
घोड्यांचा प्रचंड कळप अंधारावर धावून
गेला....
तशा सरकल्या सर्व इमारती.
असा पाऊस कधीं पडला नहता....
दुःखवादी तुझी अभिजात आठवण अंगावर ओव्हरकोट 
घालून स्मशानाकडे जाणारी....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा