घोडे

मेणबत्तीच्या एकाकी प्रकाशांत तुटलेलीं 
ॲनी फ्रँकच्या डायरींतील अक्षरें. 
मरणाशीं समांतर आकाश कीं पुरांत 
बुडालेलें कॉन्व्हेंट
घोडे येतात तेव्हां आवाज नाहीं, 
जातात तेव्हां साज नाहीं
आतां ग्रंथसंभाराचें घर. कांहीं दिशा शून्य 
कांहीं सामान्य. मध्यरात्रींचा अंधार,
मधें एखादी आठवण, तसा वारा.
इन्ग्रिड बर्गमनचा पुतळा सर्व पाहतो आहे
माझें उरलेले आयुष्य....
घोडे येतात तेव्हां आवाज नाहीं,
जातात तेव्हां साज नाहीं.
प्रदीर्घ आजारानंतर कुठल्याशा प्रदेशांतून तूं येतेस
वाटेंत संगमरवरें तुटलेली, फुलें गळाली, झाडें
अभागी झाली.
माझ्या संमतीशिवाय कोण टाकून जातो झोळींत
त्यांना दिलासा देणारें दुःख
प्रारब्धवादी हिंवाळ्याच्या अंतराळांतून घोडे येतात तेव्हां 
साज नाहीं, जातात तेव्हां आवाज नाहीं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा