सावल्या विसावल्या नि
विश्वतेज मावळे
आरतींत नादतील
सजल सांध्य देउळें
सांद्र रंग, सूर संथ
क्षितिज स्फुंदतें अबोल
मूक वर्तुळांत शब्द-
शून्य हा विराट गोल !
गगन हें कुठें सरे नि
रंग हा कसा निळा
दूर पाहतो उदास
संथ भास एकला
मी इथें व्यथालयांत
दुःख सांगतों तुला
घे मला कुशींत आज
पावलांत श्रृंखला !
संपणार ना कधींहि
रात्र घोर पापिणी
ओंजळींत हीं फुलें नि
आसवांत पापणी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा