वाट

तूं येशील म्हणून मी वाट पाहतों आहे 
तीही अशा कातरवेळीं,  
उदाच्या नादलहरीसारख्या 
संधिप्रकाशांत....

माझी सर्व कंपनें इवल्याशा ओंजळींत 
जमा होतात.
अशा वेळीं वाटेकडे पाहणें,
सर्व आयुष्य पाठीशीं बांधून एका सूक्ष्म 
लकेरींत तरंगत जाणें;
जसें काळोखांतहि ऐकूं यावें दूरच्या 
झऱ्याचें वाहणें....
मी पाहतों झाडांकडे, पहाडांकडे, 
तूं येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती 
एक नसलेली पणती लावून देतों....

आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे 
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतों 
नदीच्या प्रवाहांत....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा