दुरून दिसतात अदृश्य सीमेसारख्या
टेकड्यांच्या ओळी.
क्षितिजाच्या सहवासामुळे त्यांचाहि
रंग निळाच भासतो.
मधोमध लांबच लांब मैदान पसरलें
आहे, मोकळे.
दक्षिणेकडील टोकावर बंगल्यांची आरास,
तिथून जरासें दूर, पायवाटेला,
चर्चमधील सायंघंटेच्या अंतरावर
तुझें घर उभे आहे;
मालकंसाच्या अवरोहांत उतरणाऱ्या
गांधारासारखें....
तुझ्या मुद्रेवरील संवेदनांच्या उदास
ओळी माझ्यापर्यंत येऊ लागतात,
तेव्हां डोळ्यांतील बाहुल्यांच्या ज्योतींसाठीं
मीहि क्षणभर स्थिरावतों
मावळता दिवस आणि सावल्यांचे प्रदेश
सांधणाऱ्या संधिप्रकाशासारखा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा