आई

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.

आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.

ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.

किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.



कवियत्री -  इंदिरा संत

बाहुली

एक बाहुली हरवते तेव्हा
दुसरई साठी हटुन बसते;
नवी मिळता,नाचतं नाचतां
ती ही कुठे हरवून जाते.
किती किती नि कसल्या कसल्या
बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या;

पिवळी रंगीत लाकडाची ठकी,
तांबुस काळी चंदनाची कंकी,
आवाज काढणारी रबराची पिंपी,
उघड मीट डोळ्यांची कचकड्यांची चंपी,
मण्यांच्या झग्याची काचेची सोनी,
बिंदी बिजवऱ्यांची कापडाची राणी
किती किती नी कसल्या कसल्या
बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या.

खेळाचा पेटारा उघडुन पाहिला,
संसार सारा धुंडुन पाहिला,
ढगात धुक्यात शोध गेतला,
स्वप्नांचा ढीग उपसुन झाला…
किती किती नी कसल्या कसल्या
माझ्या मी हरवुन बसल्या.


 कवियत्री - इंदिरा संत

कुब्जा

अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ ॥ १ ॥

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकून आपुले तनमन ॥ २ ॥

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डॊळ्यामधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ॥ ३ ॥


कवियत्री : इंदिरा संत (१९७५)
गायिका: सुमन कल्याणपूर
संगीतकार: दशरथ पुजारी

तवंग

शेतावरती इथे नाचणी कशी बिलगते पायाभवती;
थरथरणारी नाजुक पाती इतुके कसले गूज सांगती

इवली इवली ही कारंजी, उडती ज्यांतुन हिरव्या धारा;
हिरवे शिंपण अंगावरती, रंग उजळतो त्यांतुन न्यारा

त्या रंगाची हिरवी भाषा, अजाण मी मज मुळि न कळे तर;
तरंगतो परि मनोमनावर त्या रंगाचा तवंग सुंदर….!!


कवियत्री - इंदिरा संत

आक्रोश

दिसु नको, दिसु नको,
नवी रीत मांडु नकॊ
येउ नको, येउ नको,
प्राण माझा कोंडू नको…

नवे अनोखे बेट,
नवे रेशमाचे फास
आणि मनाच्या तळाशी
नको नको चा आक्रोश..


कवियत्री - इंदिरा संत

तिचे स्वप्न

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्य़ांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे . गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.

पण ते पडण्यापुर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.


कवियत्री - इंदिरा संत

थेंबाथेंबी

तारेवरती असती थांबुन
थेंब दवाचे;
मनांत ज्यांच्या,
इवले काही, हिरवे पिवळे
चमचमणारे……
सतारीवरी असती थांबुन
थेंब सुरांचे;
मनांत ज्यांच्या ,
इवले कांही, निळे- जांभळे
झनझनणारे…….
मनोमनावर असती थांबुन
थेंब विजेचे;
छेडुन तारा करांगुलीने.
ऒठ करावे पुढती
टिपायला ती थेंबाथेंबी.

कवियत्री - इंदिरा संत