संभ्रम

ग्रीक पुराणांतील एकांतवासी श्रद्धांसारखी, 
मस्तकाच्या धुळींत रथाची चाकें रुतलीं आहेत. 
शिशिरांतील विझत्या वाऱ्याच्या प्रतिमा,
अंतःकरणावर धूर उजळत आहेत ; भूतकाळाच्या 
तंद्रीत विसावलेल्या एखाद्या प्राचीन शहरासारख्या.... 
शेवटच्या बहरांत पारिजाताला यावीत 
अर्धनग्न संभाराचीं कांहीं फुलें...तसेंच एखादें 
झाड डुलतां-डुलतां करुणेच्या दिगंतपार लयींत 
विलीन व्हावें ! माझ्या हातांना तळवे नाहींत आणि 
तुझ्या पायांना वाटा नाहीत...
क्षितिजाच्या कडेकडेनें उगवणारा एकेक तारा 
अंधाराच्या संभ्रमांत गळून पडतो; वैकुंठाच्या
दाराशीं निजलेल्या कैवल्यपूर्ण अस्तित्वांच्या
रांगाच जशा...

विश्व गळतां

विश्व गळतां या तिराला वृक्ष झाल्या बाभळी 
श्रावणांतिल वासनांची गर्द प्रतिमा जांभळी. 

चंदनाचा धूप जळतो देह झाली मंदिरें 
अर्थ प्राशुन शब्द माझा आज तुजला आवळी. 

पाय सोडुन तूं मिटावीं या जळाची कंपनें 
दूर क्षितिजाला जडावी ही तुझी काया गव्हाळी. 

श्वास शिंपुन उत्सवाला चाललीं ही लोचनें 
मी पुढें अन् त्या पुढें तूं अमृताच्या राउळीं.

साजण

तुझा आला गे साजण 
नको त्याच्यापुढें जाऊं 
त्यानें यात्रत भेटल्या 
कोण्या पोरीच्या देहाला 
दिले आभाळाचे बाहू....

त्याला हात नाहीं वेडे 
उभा अंधारीं साजण 
तिनें जीव दिला तरी
यानें वाहत्या पाण्याचे
इथें आणिले पैंजण....

प्रार्थना

या इथें, झाडांना उदासीन करणाऱ्या संधिप्रकाशांत 
मी जेव्हां ईश्वरी करुणांचीं स्तोत्रे म्हणूं लागतों 
मावळतीला, शेवटच्या किरणांची फुलें समुद्राच्या 
दिशाहीन पाण्यांत बुडून जातात...कुठे जातात ? 
क्षितिजाच्या अमूर्त बनांत पारिजाताचे वणवे 
उत्कर्षानं पेटूं लागतात....

या इथें, शिल्प-गांधाराच्या शून्य नगरींत
मी जेव्हां अंतिम वासनांच्या प्रार्थना म्हणूं लागतों, 
आत्मलीन पाचोळ्याच्या साक्षीनें;
-तेव्हां तुझ्या लोचनांतील अतर्क्य दुःखांतून, 
चंद्रकालीन शिवालयांचीं बर्फाच्छादित शिखरें 
प्रार्थनांच्या अंधारांत शिरत असतात.

सावली

समुद्र-जळ फोडतां तुटुन लाट ये जांभळी 
तिच्या अमित बिंदूंच्या कितिक बांधिल्या ओंजळी 
उभे पिउन शिल्प हे ढळत नेत्र माझे पुढें 
उदास वर माड, तूं खिळुन झावळ्यांच्या तळीं ....

मला मरण येउं दे फिटत जाउं दे वर्तुळें 
जशा मिटत पापण्या फुलत आसवांचे मळे 
उभा अढळ मुक्तिचा प्रलयगंध प्राणांवरी 
तुझे चरण मेंदिचे गगन जान्हवीच्या जळीं ....

असा कधिं न पाहिला प्रहर भव्य स्पर्शातला 
जसा मिठित वांकला सजल मेघ स्वातींतला 
उभी व्यथित मग्न ही अचल पर्वतांची सभा 
तुझी स्मरुन नग्नता क्षितिज पांघरे सावली....

वाराणसी

कथेंत निजल्यापरी चढत रात्र आली कशी 
सकंप शरिरांतली प्रहरवेल की स्निग्धशी 
तुझ्या हृदयशक्तिची मिठित मृण्मयी धूळ ही 
तमांत शिरल्यावरी दुरुन हाक येते जशी ..... 
उदास मन येइना थकुनि झोपलेले झरे 
अनाम असल्यापरी तुजसि जन्म गेला स्मरे.... 
किती तरल सूक्ष्म ही तम-समर्पणाची तऱ्हा
नदीत बुडली जणूं लहर चांदण्यांची अशी.... 
तमास कुणीही नसे मरण अमृताचें जसें 
तशांत तुज स्वमिंचें अटळ लागलेलें पिसें 
सजून मन भाविनी दिसशी हंसगीतापरी 
विराट तननिर्मळा बघत आर्त वाराणसी....

शाप

संधिप्रकाशांतिल रेषेवर स्तब्ध थांबली गुरें 
घाटापासुन घाट तुटे की अरण्य हृदयी भरे.... 
गांवगांव रस्त्यांत ढळे अन् तशा तन्मयी वाटा 
एकाकी प्राणांच्या उठती लाटांवरती लाटा.... 
या दुःखाचा कलश सावरे तुझ्या कटीची आण 
कीं हातानें हळु स्पर्शावे मीच आपुले प्राण.... 
उभ्या घनांच्या शिखरांमध्ये तुटे जशी चांदणी 
मळवट भरल्या केसांवरचें फूल तसें साजणी 
संध्याकाळी मुका उभा मी मला सतीचा शाप 
कुठें पाहतो ? अस्थावरती सरसर चढती साप....