नदीच्या कांठीं

नदीच्या कांटानें दिवस मळला सांज ढळली 
जशी वृक्षांना ये शिशिर - भिजली हांक पिवळी 
कुणाचे हे देवा अशुभ हिरवे सूर उडती 
तुझ्या रक्ताखालीं कितिक सजलें चंद्र ढळती.

नदीच्या कांठानें मरण-मिटलीं मंद चरणें 
जशी झाडांखालीं हळुच गळती चंद्रकिरणें 
नदीच्या पाण्यानें हृदय करुणा नेत्र भरलें 
जसे प्रारब्धाच्या कुशिंत थकुनी शब्द निजले....

- पुढें स्वप्नांधांच्या धुळिंत कसला गंध मिसळे 
जशी गांधारीचीं नदिंत गळती नेत्रकमळें 
नदीच्या तीरांना क्षितिज अपुले प्राण भिडवे 
दिशांना मेघांचे मधुन जडती रंग भगवे ....

दुपार

विवर्त नभ एकटें सतत तापलेली हवा 
उन्हांत जणुं मैथिली तुजसि शोधिते राघवा.... 
विवस्त्र मृगतंद्रिनें क्षितिज वाहतें कीं पुढें 
तृषार्त बिलगे मला सभय चातकांचा थवा.

तुझे तटचि पांगळे तरिहि विश्व यावें गळीं 
सुवर्णवन पेटलें तुझिं न आसवें मोकळीं.... 
प्रशांत नगरांत या घरचि सांपडे ना मला 
जिथें अधर गोंदिला पिळुनी वासनेचा दिवा.

विराण नुपुरापरी नभचि तीक्ष्ण झालें निळे 
उन्हांत जणुं दीप्तिचें फुटूनि सांडतें की तळे 
विदग्ध प्रतिमेपरी सगुण ऊन झेलूं नको
तुझें अमल दुःख दे मजसि तेवढा जोगवा.....

बहार

पान पान सोडती सहिष्णु वृक्ष येथले 
चक्र ओंजळीतलेंच वर्तुळांत नादलें 
ऐकतों कुठेतरी तमांत झांकलीं घरें 
दिशादिशांत गात हा फकीर एकटा फिरे 
पहाड शब्द वेढती तसा सतंद्र गारवा 
नि रक्तवाहिन्यांतुनी उडे सुसाट पारवा.... 
तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी 
वेदनेंतली फुले नि चांदण्यांतल्या सरी.... 
तुझेंच अंग चंदनांत अंतराळ ओढते 
पुरांत आणखी असें सजून ओल मागतें.... 
दुःख लागतां मला सभोंवतीं जसें जसें
या होउनी तसें क्षितीज दृष्टिला दिसे....

दुपारचें ऊन.....

दुपारचें सचित्र ऊन मृगजळांस लांबवी 
अनंत इंद्रियांतले स्वतंत्र शोक जागवी.... 
जिथें उभारलीं घरें तिथें अपार शून्यता 
दुपारच्या उन्हांतली विचित्र एकसंधता.... 
समुद्र आटतील का ? अतर्क्य सूर्य वाहतो 
अशी अवेळ साधुनी मनांत कोण हिंडतो.... 
तहान ही मला गिळे नि कंठ हो तुझा निळा 
उन्हांत पाय वाजती कुणांत जीव गुंतला....

प्रारंभ

इंद्रियांच्या प्रारंभांत क्षितिज, 
संवादीपणानें.
नाद माझे हळुवार, पैंजणी रात्रींना
दुःख अभिजात, स्पर्शमय वर्तुळांत 
क्षणाक्षणानें.
अवकाश-रेषा निसरड्या, सप्तरंगी
आकाशगामी डोळियांच्या गुंफांत....
जाऊ नकोस, हांकेवर थांब, ते अमृताचे
भयाण डोह आहेत
अमर होशील....

तहान

कुठल्याही क्षणीं यावेसें वाटतें. 
हुतात्म्याच्या समाधीवरील फुलांसारखे 
मंद मधुर दिवस...
मृत्यूच्या पार्श्वभूमीवर गळणारें तुझें लावण्य 
कुठल्याही क्षणीं प्यावेंसें वाटतें....

निनाद

तुझी भीति वाटावी तसें पारिजाताचें झाड
निनादानें फुलें सोडून जाणारें. 
मनाच्या भिंतीआडून कुणीतरी गाणारें 
जवळ येऊ नये म्हणून रात्रीचा प्रपंच... 
झोपाळ्यावर झोके घ्यावे म्हणजे 
नीजही येऊ लागते
पण मोडत नाही बुबुळांच्या शुभ्रतेंत 
रुतलेला चंद्र....