शाप

संधिप्रकाशांतिल रेषेवर स्तब्ध थांबली गुरें 
घाटापासुन घाट तुटे की अरण्य हृदयी भरे.... 
गांवगांव रस्त्यांत ढळे अन् तशा तन्मयी वाटा 
एकाकी प्राणांच्या उठती लाटांवरती लाटा.... 
या दुःखाचा कलश सावरे तुझ्या कटीची आण 
कीं हातानें हळु स्पर्शावे मीच आपुले प्राण.... 
उभ्या घनांच्या शिखरांमध्ये तुटे जशी चांदणी 
मळवट भरल्या केसांवरचें फूल तसें साजणी 
संध्याकाळी मुका उभा मी मला सतीचा शाप 
कुठें पाहतो ? अस्थावरती सरसर चढती साप....

गाणें

सांज हंबरे पिशी तुझीं धुळींत पैंजणें 
धुळीस पाय लागतां धुळींत गोंदलें जिणें. 
गोंदणें कसें निनाद कोरल्या धुक्यांवरी 
कलंडल्या दिशा तमांत वांसरें उभीं घरीं.... 
तुझ्या मिठींत मी ढळें तशींच वांसरें मला 
वनांत गाय शोधतां कसा सुगंध लागला.... 
सुदीर्घ दूर सावल्या तसें क्षितीज भासलें 
कुण्या फुलांस पांघरूं तरूंस मेघ लागले.... 
सशिल्प दुःख मंदिरीं धुळींत रेखतां तुला 
उभ्या निजेंत जागणें दिसे न गांव आपुला.

भूल

प्रकाश गळतो हळू हळू की चंद्र जसा उगवे 
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे.... 
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका 
दुःख- सुरांचा क्षितिजांपाशी मेघ दिसे परका.... 
हिमनगरांतिल बर्फ-धुळींचे उत्सव भरले नवे 
धुक्यांत तुटल्या शिखरांवरती पक्ष्यांचेहि थवे .... 
मंदिर-मंदिर पाणी.... पाणी शिल्प कुठें वितळे 
दुःखाच्या तंद्रींतुन जैसें अमृत ठिबकत निळें..... 
माझ्या हातुन मुठभर माती अवकाशावर पडे 
घरांघरांना मरणफुलांची गंधित भूल जडे....

नाद

वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा 
या फुलांत या सुरांत चंद्र घालतो गळा 
पावलें अशीं सलील नादती कुठून नाद ? 
मी क्षितीज वाहतों तरी जुळे न शब्द, गीत. 
दुःख एक पांगळे जशी तरूंत सावली 
या उरांत पेटलीस, कां उन्हास काहिली ? 
असें कसें सुनें सुनें मला उदास वाटतें 
जशीं उडून पांखरें नभांत चाललीं कुठें.

मरण

अंधारांतुन जात कुणीतरी गात पुढें क्षितिजाला 
मातीमधला पाऊस घेऊन सुगंध इथवर आला. 

सुन्न निरामय चिरनिद्रेपरि नभ माथ्यावर गढलें. 
प्रारब्धांतिल विश्व कुणाचें जसें तमावर निजलें.... 

अंधारांतुन सरकत जाती झाडांचे जड पुतळे 
कुणीं मांडिले ? कशास माझे लोचन भरुनी आले....

ध्वनिबंधावर तूंच उभी कीं युगे निळावत गेलीं 
आभासांतिल हिमशिखरांची रांगच घसरत आली...

उभे धराया मला पुरांतुन सूर समाधी ल्याले 
हृदयांमधलें अमृत प्याया मरण कोठवर आलें....

हळदीचे हात

रंगाच्या रसनेंत सूर्य बुडाला अंधारलें सागरीं 
बेटांचें जळबिंब फक्त हलतें माझ्याच प्राणांवरी 
घोड्यांचे पथ दक्षिणेंत मिटले गेले सखेसोबती 
एकाकी नभ प्राक्तनांत शिरतां रक्तांत येते भिती....

अज्ञेयाहुन गूढ गूढ दिसती झाडांतलीं वर्तुळें 
तूं पाठीवर रंग आज विणले कीं द्राक्ष-वेलींतले 
यात्रेच्या अपुऱ्या अभंगसमयीं पाठींत कैशा विजा 
अश्रूही सरल्यावरी उमलसी तूं एकटी स्वमजा......

माझ्यानें उठवे न दार उघडे वारा मला आवळे 
लाटांच्या ध्वनिबंधनांत अडलें चैतन्य की आंधळे.... 
अस्थींचीं उडती पिसें सजुनिया अंधार घाली कडें 
हळ्दीचे कुणि हात हे पसरले माझ्या सुखाच्या पुढें....

माडांच्या परिघांत मी विझविल्या स्वप्नात चंद्रावळी 
डोळ्यांची बुबुळे तुझीं उलटता झाली धरित्री निळी.... 
तृष्णेच्या पहिल्या फुलास गिळतो माकंद ओठांतला 
कर्णाच्या घनतेंत की वितळतो संभोग कुंतींतला....

संयोगिनी

विराट घुमटांतुनी गळत सावल्यांची घरें 
उजाड शिशिरांतलीं गहन सावळीं मंदिरें 
हिमांत जडली कुठें तरल स्वप्नभूमी निळी 
तसेच घन मंद हे, हृदयिं लागलेले झरे....

तुझ्यांत नभवाहिनी कुठुन रक्त गंधावलें 
अनाथ तुटल्या तिरीं विझत सूर्य कीं मावळे 
शरीर विणले कुणी अतुट फाटली वासना 
तुझ्यांत भिनल्यावरी फिरुन चंद्र अर्धा उरे....

पहाड इथले मुके दिवस आंधळा कीं जसा 
अभंग तिमिरांतला तडत चालला आरसा 
तसा सहज नाचतों कधिं न बांधिली पैंजणें 
जशा धुळिंतल्या दिशा भुलुन गाय जी हंबरे....