गंधर्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गंधर्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दुपार

या ग्रंथसंग्रहालयात
निःशब्दाच्या हातातील
ते कोरे पुस्तक
पहा कसे पेंगत आहे
डोक्यावरच्या या वेडपट पंख्याला मात्र
दुपारची कधीच
झोप येत नाही!
सूर्यफुलासारखी उमलणारी
उन्हाचा स्कर्ट घातलेली बॉबकट केलेली
ती मुलगी
केव्हापास्नं घुटमळते आहे
कवितासंग्रहाच्या कपाटांपाशी!
(पण तेही बेटे झोपी गेलेले दिसतात ढाराढूर...)
समोरच्या टेबलावर बसलेला
आईन्स्टाईनसारखे केस पिंजारलेला
तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर
घेतो आहे लिहून भराभर
झोपाळू बोटांनी
गलेलठ्ठ पुस्तकातले काहीतरी
झोपेला आलेल्या अक्षरांत...


बाहेर...
उन्हाच्या झाडाखाली
कलंडलेली सावली

घेऊ लागली आहे डुलक्या
अन् तिच्या हातांतली
ती पेंगुळलेली कादंबरी म्हणते आहे :
आता पुरे ग!
मला झोप येते आहे!


कवी - सदानंद रेगे
कवितासंग्रह -  गंधर्व