सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥ सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥ जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥ नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥ दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥ एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥ मला दादला नलगे बाई ॥धृ॥ फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥ जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥ मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥ सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥ एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥