इंदिरा संत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इंदिरा संत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रंगबावरी


म्रुगजळ


निराकार


गर्भरेशीम

१. तुझ्या केतकी रंगांत
२. अडाणी
३. प्रळ्याच्या पैल
४. मऊ रेशमाची घडी
५. डोंगरावरी गांव

तुळस वेल्हाळ

कसे केंव्हा कलंडते
माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा
दूर पोचतो ओघळ

उरे तुडुंब तयांत
काळोखाचे मृगजळ
रितेपणाच्या डोहाची
आत ओढी उचंबळ

मंत्रविद्ध मध्यरात्र
उभी झुकून काठाशी
जन्मोजन्मीच्या दु:खाचा
राळ धरूनी उशाशी

ओढ घेऊन पाण्याची
सूर मारते सरल
एक गाठायचा तळ
आणि तळींचा अनळ

पेट घेई मध्यरात्र
पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये
उभी तुळस वेल्हाळ


कवी - इंदिरा संत

इंदिरा संत

संत ईंदिरा नारायण ( जन्म ४ जानेवारी १९१४ ते १३ जुलै २०००)कवियत्री, कथाकार, ललित लेखिका.
मुळच्या इंदोर च्या इंदिरा दिक्षीत..
फर्ग्युसन मधे महाविद्यालयिन शिक्षण.. तेथेच प्रा. ना. मा. संत यांच्याशी परिचय ऊन पुढे विवाह झाला.
पहिला काव्य संग्रह:- १९४० मधे “सहवास”
१९४६ मधे वैधव्य आले.
१९५२ मधे “शामली हा कथासंग्रह
१९५५ मधे “कदली”
१९५७ मधे “चैतु “
१९५१ मधे प्रकाशित झालेल्या शेला ह्या कविता संग्रहा पासुन स्वतः ची ऒळख निर्माण झाली.शेला मधिल कविता अतिशय उत्कट ,भावपुर्ण, आणि प्रतिभा संपन्न होत्या.”विशुद्ध भाव कविता” लिहिणारी कवियत्री म्हणुन स्वतःची ओळख निर्माण केली.

१९५५ मधे मेंदी आणि १९५७ मधे म्रुगजळ ह्या कविता संग्रहात त्यांच्या कवितांचे सामर्थ्य पुर्णत्वाला पोहोचलेले दिसते..प्रिती, एकाकी पणाचे दुःख, विरह आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातुन भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दात बांधण्याची त्यांची किमया या संग्रहातुन जाणवते..

१९६४ मधे रंगबावरी, १९७२ मधे बाहुल्या, १९८२ मधे गर्भ रेशमी१९८९ मधे चित्कळा, आणि १९८९ मधे वंशकुसुम आणि निराकार हे त्यांचे संग्रह प्रसिध्द झाले.

गर्भ रेशमी ला १९८३ साली साहित्य अकादमी चे पारितोशक मिळाले.

सन्मान:-

१) अध्यक्ष , कविसंमेलन ,मुंबई मराठी साहित्य सम्मेलन १९५२ साली.
२) अध्यक्ष , महाराष्ट्र कवियत्री सम्मेलन कऱ्हाड १९७५ साली.
३) अध्यक्ष , कवियत्री साहित्य सम्मेलन , गदग १९८४ साली
४) अध्यक्ष , बालकुमार साहित्य सम्मेलन ,सावंतवाडी
५) अध्यक्ष , साहित्य सम्मेलन कदिली, कर्णाटक

पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठान्चा पुरस्कार, १९९५
’गर्भरेशमी’ साठी साहित्य अकादमी पुरस्कार
’गर्भरेशमी’ साठी अनंत काणेकर पुरस्कार
’मेंदी ’,’मॄगजळ’ या संग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार.

निळा पारवा

वसुंधरेच्या माथ्यावरती
घुमतो आहे
आभाळाचा निळा पारवा.

डोळ्यावरती राखी ढापण,
लक्ष सदाचें धनिणीपाशी
अन धनिणीच्या पायामधल्या
रुणझुणणाऱ्या नादापाशी.

-अवचित काही घडलें
आणि दचकला निळा पारवा;
टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.

जाती त्याच्या अगदी जवळून
किलबिलणारे कुणी मुशाफिर
रंगित पक्षी…
कुणी घासली चोच तयावर;
कुणी घातली शिळ तयाला;
ऐकवैली…पंखाची फडफड;
दाखविले चित्रांकित वैभव
पंखावरचे.
गिरकी घालुन त्याच्या भवती
निघुन गेले.. धुंद मुशाफिर;
झुलवित अपुले पंखे,
झुलवित त्याला.

पुन्हा दचकला निळा पारवा’
मनात भरले वारे
पिसा पिसातुन थरथरणारे;
फुगली पंखे;
उचलुन धरला पोटापाशी
पाउ एकुटा;
मान ताठली जरा खालती
झेंप भाराया…

तोच वरी ये वसुंधरेचा
तांबुस गोरा कोमलसा कर.
भरवई त्याच्या टोची मध्ये
एकच मोती
शुभ्र टपोरा,
एकच माणिक , झगमगणारे.

पुन्हा टेकले पाउल खाली;
नितळाई ये पुन्हा पिसांवर
-आणि लागला पुन्हा घुमाया
आभाळाचा……. निळा पारवा.


कवियत्री - इंदिरा संत

दगड

किती दिवस मी मानित होतें
ह्या दगडापरी व्हावे जीवन;
पडो उन वा पाउस त्यावर
थिजलेलें अवधें संवेदन…

किळवुन ज्याच्या वरती डोळे
मनात यावे असले कांही
तोच एकदा हसुन म्हणाला-
दगडालाही चुकले नाही.

चुकले नाही… चढते त्यावर
शेवाळाचे जलमी गोंदण;
चुकले नाही .. केविलवाणें
दगडफुलाचे त्यास प्रसाधन…

थिजलेल्याचे असले कांही
त्याहुन वाते, हवे तुझे मन
सळसळणारे अन जळणारे
पशापशाने जाया भडकुन


कवियत्री – इंदिरा संत

रक्तामध्ये ओढ मातीची

रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे


कवियत्री - इंदिरा संत

जशी ती

तो कधी येईल, कधी न येईलकधी भेटेल, कधी न भेटेल
कधी लिहिल, कधी न लिहिल
कधी आठवण काढील, कधी न काढील
असा तो. एक अनिश्चिती…………..
बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी.
म्रूत्युसारखी.

त्या अनिश्चितीच्या ताणांच्या धाग्यात
तिचे पाय गुंतणार, काचणार……..
कोलमडणार….
पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक
पीळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर
उभी राहून ती झोके घेऊ लागली
या अस्मानापासुन त्या अस्मानापर्यंत
अशी ती एक मूक्ता
वार्यासारखी. जीवनासारखी.

कवियत्री - इंदिरा संत

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची…


कवियत्री - इंदिरा संत

आला केसराचा वारा

प्रभातीच्या केशराची कुणि उधळली रास
आणि वाऱ्यावर रंगला असा केशरी उल्हास!

रंगा गंधाने माखून झाला सुखद शितळ
आणि ठुमकत चालला शीळ घालीत मंजुळ!

हेलावत्या तळ्यावर वारा केशराचा आला
लाटा -लहरी तरंगानी उचंबळुन झेलला!

नीळे आभाळ क्षणात तळ्यामधे उतरले!
एकाएकी स्तब्ध झाले!!

नऊ सुर्याची मुद्रीका सीतामाईने टाकली
इथे काय प्रकटली!

तळ्याकाठी माझे घर , उभी दारात रहाते
हेलावत्या केशरात स्वप्ने सुंदर पहाते

केशराचे मंज माझा मनावर चमकले!
आली किरणे तळ्याशी दारातुन आत आले

मनातील बिंदु बिंदि निगुतीने गोळा केले
तळ्यावरच्य़ा शेल्यात घट्ट गाठीने बांधले


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - निराकार

चुकून चुकून

चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …

शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …

त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम

कधि कुठे न भेटणार

कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार

निखळे कधि अश्रू एक
ज्यात तुझे बिंब दिसे
निखळे निःश्वास एक
ज्यात तुझी याद असे

पण तिथेच ते तिथेच
मिटुनि ओठ संपणार
व्रत कठोर हे असेच
हे असेच चालणार


गीत – इंदिरा संत
संगीत – गजानन वाटवे
स्वर – रंजना जोगळेकर

बाकी

होते का ते नुसते
येणे आणिक जाणे
होत्या का त्या नुसत्या गप्पा
क्षेमकुशल अन स्मरणे ;होते का ते नुसते फिरणे -
करड्या चढणीवरुणी
हिरवी उतरण घेणे
होते का ते नुसते बघणे
क्षितीजावरची चित्र लिपी अन
पायाखालील गवतावरची
तुसें रेशमी
निवांतवेळी
आभाळाच्या पाटीवरती
हिशोब मांडू बघता
उरते बाकी
चंद्र घेतला जरी हातचा
तरीही उरते बाकी.




कवियत्री - इंदिरा संत

तुला विसरण्यासाठी

तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
अकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

दिला उधळुन डाव
आणि निघाले कुठेही
जिथे तुझे असें…
तुजे असे कांही नाही!

द्रुष्टी ठेविली समोर,
चालले मी ’कुठेही’त;
कुठेही च्या टोकापाशी
उभी मात्र तुझी मुर्त!

वाट टाकली मोडुन
आणि गाठला मी डोह;
एक तोच कनवाळु
माझे जाणिल ह्रुदय!

नांव तुझे येण्याआधी
दिला झोकुन मी तोल;
डोह लागला मिटाया
तुझी होऊन ओंजळ!!


कवियत्री - इंदिरा संत

पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी

अजूनही तिन्ही सांज

चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण

समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - निराकार

“ऐक जरा ना”

ऐक जरा ना…….
अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलावर;
एकाकीपण आले पसरत
दिशादिशातुन.

घेरायास्तव…..
एकटीच मी
पडते निपचित मिटुन डोळे.

हळुच येते दार घराचे
अंधारातुन;
उभे रहाते बाजुला.

“ऐक जरा ना….”
आठवते मज ती… टकटक
त्या बोटांची;
शहारते अन रंगरोगणाखाली
एक आठवण,
गतजन्मीची;
आभाळातुन पडणार्या त्या थेंबाची

“ऐक जरा ना”
दंडावरती हात ठेवुनी
कुजबुजते आरामखुर्ची.

“आठवते का अजुन तुला ती
कातरवेळा.
माहित नव्हते तुजला,
वाट तुझी तो पहात होता
मिटून डॊळे.
होते दाटुन असह्य ओझे;
होती धुमसत विद्युत काळी;
अजुन होते मजला जाणिव
निबिड वनांतिल….
मध्यरात्रिच्या वावटळीची
-झपाटल्याची”

“ऐक जरा ना “
कौलारांतुन थेंब ठिबकला
ऒठांवरती.

“ऐक ना जरा….एक आठवण.
ज्येष्ठामधल्या – त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षित से
तया कोंडले जलधारांनी
तुझ्याच पाशी.

ऊठला जेंव्हा बंद कराया
उघडी खीडकी,
कसे म्हणाला…….
मीच ऐकले शब्द तयाचे…
’या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय’

-धडपडले मी, उठले तेथुन;
सुटले धावत
त्या वस्तुतुन , त्या पाण्यातुन,
दिशादिशातुन,
हात ठेवुनी कानावरती;
ऐकु न यावे शब्द कुणाचे;
“ऐक जरा ना”
“ऐक जरा ना”
“ऐक जरा ना”


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - म्रुगजळ

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा

   
    कवियत्री  – इंदिरा संत
    संगीत     – कमलाकर भागवत
    स्वर        – सुमन कल्याणपूर