कुणी जाल का सांगाल का,
सुचवाल का त्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला तो श्वास साहून वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळीला.
सांभाळूनी माझ्या जीवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा ती झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली.
कवी - अनिल
संगीत - यशवंत देव
स्वर - डॉ. वसंतराव देशपांडे
हाती हात धरुन माझा
चालवणारा कोण तू?
जेथे जातो तेथे माझा
काय म्हणून सांगाती?
आवडतोस तू मला
की नावडतोस?
माझे मला कळत नाही !
एवढे मात्र जाणवते की
माझा हात धरुन असे चालवलेले
मला मुळीच खपत नाही !
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना !
झिडकारुन तुझा हात
म्हणून दूर पळत जातो
बागडतो, अडखळतो, धडपडतो
केवळ तू कनवाळू पाठीशी उभा म्हणून
माझे दु:ख जाणवून
उगाच किंचाळत सुटतो
एरव्ही तू नसतांना
पडलो अन लागले तर
पुन्हा उठून हुंदडतो !
खांद्यावर हात माझ्या सदोदित
असा ठेवू नकोस ना
अशानेच माझी वाढ खुंटत जाते
असे मला वाटते ना !
बरोबरीचे वागणे हे खरोखरीचे आहे का?
खूप खूप माझी उंची एकाकीच
माझी मलाच वाढवू दे
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊ दे
तोवर असे दुरदुरुन, तुझा हात दूर करुन
मान उंच उभारुन
तुझ्याकडे धिटकारुन पाहू दे !
कुठून येतो हा हुरुप मला? खाली घातलेली मान वर होते हारलेले हात पुन्हा लागतात मुठी आवळू खचली कंबर पुन्हा ताठ होते पेलण्यास ओझे पावले थकली चढू पाहतात अडल्या वाटा कुठून येतो हा हुरुप मला !
शिणलेला आणि वैतागला मी गोळा करताना वाळली पाने मातीमध्ये हात मळवीत होतो आहे का ह्या सुप्त मातीमध्येच असे सामर्थ्य स्पर्शानेच जागणारे चैतन्य ?
चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..
अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस
निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!