प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दोन धृवावर दोघे आपण

दोन धृवावर दोघे आपण
तूं तिकडे अन मी इकडे
वार्‍यावरती जशी चुकावी
दोन पाखरे दोहिकडे !!धृ!!

दिवस मनाला वैरि भासतो
तरा मोजित रात गुजरतो
युगसम वाटे घडीघडी ही
कालगती का बंद पडे  !!१!!

वसंतासवे धरा नाचते
तांडव भीषण मज ते गमते
गजबजलेल्या जगांत जगतो
जीवन एकलकोंडे  !!२!!

निःश्वसिते तव सांगायाला
पश्चिम वारा बिलगे मजला
शीतल कोमल तुझ्या करांचा
सर्वांगी जणु स्पर्श घडे  !!३!!

स्मृति-पंखांनीभिरभिर फिरते
प्रीतपाखरू तुझ्याच भवती
मुक्या मनाचे दुःख सागरा
सांग गर्जुनी तू तिकडे  !!४!!

तोच असे मी घर हे तेही
तोच सखी संसार असेही
तुझ्यावाचुनी शून्य पसारा
प्राण तिथे अन देह इकडे  !!५!!


कवि - एम. जी. पाटकर

न सांगताही प्रेम करावे.

न बोलता मनातले कोणीतरी ओळखावे,
न सांगताही कोणीतरी प्रेम करावे.

मनाला हवे तेच का सांगावे,
न सांगताही कधीतरी प्रेम करावे.

मनातल्या भावानांसोबत  भरभरून जगावे,
न सांगताही कधीतरी प्रेम करावे.

प्रेम आपल्याही वाट्याला यावे,
न सांगताही कोणीतरी प्रेम करावे.

नेहमीच बह्यसौंदर्य का पाहावे,
कधीतरी अंतरर्गातही  झाकावे,
न सांगताही  केव्हातरी प्रेम करावे.

नेहमी राग रुसवा आणि का भांडावे,
न सांगताही कोणीतरी प्रेम करावे.

तिने त्याला अन् त्याने तिला सहज ओळखावे,
न सांगताही कोणीतरी प्रेम करावे.

सांगता न येण्याएवढे कठीण का करावे,
 न सांगता बोलून सांगण्यायेवढे सोपे करावे.

इतरांपेक्षा थोडे वेगळे,
न सांगताही प्रेम करावे.
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे.


कवियेत्री - ज्योत्स्ना भासे

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कळ्लेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

राहिले जरी हे प्रेम अव्यक्त
मनी न उरली बोच हि फक्त
जगणे…..वाटणार ओझे नाही
ज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही !!

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

कधीच नाही म्हटंल की...

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कदाचीत माझ्या नजरेतला भाव तुला कधी कळलाच नाही म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
माझ्या डोळ्यातुन ओघळणारा अश्रू तु कधीच टिपला नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
भोवतालच्या मित्र-मैत्रिणींच्या गर्दीत मला कधी पाहीलच नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
आपल्या ह्रदयाच्या रेशीमगाठी कधी जुळल्याच नाहीत म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कारण मनातल्या भावना कधी ओठांपर्यंत पोहचल्याच नाहीत म्हणुन

पण आता मी बोलणार आहे
ह्रदयाचे सर्व बंध उलघडणार आहे
कारण मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन...

तिला कळतच नाही...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण ते शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुलं तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणंच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहीसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याचीच भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

जो पर्यंत आहे श्वास

("जब तक हैं जान" चे मराठी रुपांतर )

तुझ्या डोळ्यातील तेजस्वी हस्ती
तुझ्या हसण्याची बेफिकीर मस्ती
तुझ्या केसांची उडणारी दाट वस्ती
नाही विसरणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

तुझं हाथातून हाथ काढणं
तुझ्या आत्म्याने रस्ता बदलणं
तुझं पलटून पुन्हा न बघणं
नाही माफ करणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

पावसातील बेधडक तुझ्या नाचण्यावर
प्रत्येक गोष्टीवरून विनाकारण तुझ्या रूसण्यावर
छोट्या छोट्या तुझ्या बालिश खोडयांवर
प्रेम करेन मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

तुझ्या खोट्या शपथा आणि वचनांचा
तुझ्या जाळणार्या बैचैन स्वप्नांचा
तुझ्या न लाभणार्या प्रार्थनेचा
तिरस्कार करेन मी("जब तक हैं जान" चे मराठी रुपांतर )
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

प्रेम म्हणावं याला .... की भास

ती पाहते यार माझ्याकडे
जेव्हा मी पाहतो तिच्याकडे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

मी पहिले की ती नजर चोरून घेते
हलकेच मग गालावरील खळी खोल होते
एसीची हवा थांबून सुरु होतात गुलाबी वारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

बोलता बोलता माझ्याशी खोल पाहते डोळ्यामध्ये
बोललो जरी कामाचे तरी व्हायोलीन वाजतो मनामध्ये
ऑफिस मधील दिवे जणू वाटू लागतात धुंद तारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

जवळून फक्त जातानाही उगाचच नसलेली बट सावरते
नजरा नजर होताच लगेच स्वतःशीच बावरते
वाटते मला जे काही ... तिलाही जाणवत असेल का बरे?
खरच प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे ?

माझे पहिले प्रेम

माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता

प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती

पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेल
अशी शंका येउन गेली

काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली

काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?

रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो

करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नही खरे

तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे

आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते

असे काही घडेल

"कधी विचारही केला नव्हता की असे काही घडेल,
सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल,
तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती,
ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा 'ती' माझी नव्हती,

ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता,
नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता,
अशातच जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले,
विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले,

तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे,
काळजाच्या कप्प्यात साठवले सगळे,
मग तिची आठवण होताच मला पड़े भ्रांत,
बोलायचे म्हटले तर, तिचा स्वाभाव शांत,

काय कराव तेच कळत नव्हते,
कसही करून तिचे मन जिंकायचे होते,
हिम्मत करून शेवटी तिला प्रेमपत्र लिहिले,
विचार करण्यास मुदत म्हणुन काही दिवस दिले,

महिना होउन सुद्धा तिचा होकर नाही आला,
होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव व्याकुळ झाला,
समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा नकार आहे,
तिला विसरने हाच एकमात्र उपाय आहे,

शेवटी करायला नको ते धाडस मी केले,
होकर आहे की नकार थेट तिलाच विचारले,
मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली, हे काय आहे..?,
'तुझ्या एव्हडेच माझे तुझ्यावर्ती प्रेम आहे,

एकून तिचे उत्तर, 'मन' बेभान होउन नाचले,
अतिआनंदाने डोळ्यात पानी साचले,
ध्येय मिळाले जीवनाला, ध्यासही गावला,
माझ्यावरचा विश्वास मी तिच्या डोळ्यात पहिला,

आता दीवसही माझा तिच्या नावाने उगतो,
स्वप्नातला चंद्रही तिच्यासाठी झुरतो,
रक्तासारखी माझ्यात ती सामावली सर्वांगी,
साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी..."

तुझ्या भेटीस अर्थ होता...

तुझ्या भेटीस अर्थ होता नाजूक या कळ्यांचा

कळ्यानाही गंध होता या लाजऱ्या प्रेमाचा

काजव्यांनी चोरून मनी हार मांडलेले

चांदण्यांनी जणू हे आभाळ सांडलेले

स्पर्शतुनी जणू हि लाखोली वाहिलेली

निशाब्ध शांततेला जणू शब्द हि सुचेना

वारा निशब्ध झाला आईकून श्वाश माझे

फुलेही स्तब्ध झाली घेऊन गंध ओला

जुईच्या गंधाने आवेग मुग्ध झाला

चोरट्या या भेटीला नवाच अर्थ आला

उमलत्या या कळीला नवाच गंध आला

भेटीचा अर्थ उमगला कळीचे फुल झाले

परसातल्या कळ्याचे आयुंष्य सार्थ झाले


- अशोक खेडकर

प्रेमसाठी हेही


तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय..
कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय..

तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला..
त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय..

बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय..
साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय ..

तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय..
जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय..

म्हणतात प्यार मे
दिल मे दर्द होता है ..
आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है..

बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात...
आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात..

नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत...
वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत..

खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला..
करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय..

एक दिवस तर कहर झाला..
मला पाहून वार्ड बॉय ओरडला..

अरे खाट
तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ...
नेहमीचा कस्टमर आलाय....

बहारो फुल बरसावो..
किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है..

त्याचा पाऊस तिचा पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात


कवी- सौमित्र

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !

आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !

दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !


कवी - मंगेश पाडगावकर

तुमचं काय गेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?


त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?


कवी - मंगेश पाडगावकर

प्रेमात पडलं की असंच व्हायचं

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं
अचानक स्वप्नात दिसणं !

खटयाळ पावसात चिंब न्हायचं
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं

केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो

ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो

आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर,
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली

माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात

उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते
अखेर ती उगवते !

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही,
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं, तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी
तिच्यासोबत भुलत जायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


एकच वचन
कितीदा देतो आपण
एकच शपथ कितीदा घेतो आपण ?

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात;
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


कवी - मंगेश पाडगावकर

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं…

तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवून झालं ?
देणार काय ? घेणार काय ?
हुंडा किती ,बिंडा किती ?
याचा मान , त्याचा पान
सगळा मामला रोख होता ,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं ,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

मग एक दिवस,
चंद्र, सूर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणार्‍या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येऊन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं


कवी - मंगेश पाडगांवकर

आज पुन्हा मला प्रेम होत आहे....

शब्द दडले होते माझे
आज पुन्हा मजसी दिसत आहेत
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा प्रेम मला होत आहे ♥

भावना सुखद प्रेमाची ती
आज पुन्हा मनी दाटत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

विचार मनातील सारे माझ्या
आज काव्यात उतरत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

प्रेमाचा गंध हृदयाला स्पर्शुनी
मन उल्हासित आज करत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

सुखद स्पर्श मनाला आज असा
चटका लावूनी खिलवत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

प्रेमाची साथ सदा सोबत राहावी
साथ तुझी भावी कधी न सुटावी
मागणी प्रेमाला घालत मी आहे
ना ठाऊक मलाही....आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥