तीर्थाटण

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.


कवी - विंदा करंदीकर

देह मंदिर चित्त मंदिर प्रार्थना

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


कवी - वसंत बापट

या नभाने या भुईला दान द्यावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.

तसेच घुमते शुभ्र कबूतर

मनात माझ्या उंच मनोरे
उंच तयावर कबूतरखाना;
शुभ्र कबूतर घुमते तेथे
स्वप्नांचा खाउनिया दाणा.

शुभ्र कबूतर युगायुगांचे-
कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे?
अर्थावाचुन व्यर्थ न का रव?

प्रश्‍न विचारी असे कुणी तरि;
कुणी देतसे अगम्य उत्तर?
गिरकी घेऊन आपणाभवती
तसेच घुमते शुभ्र कबूतर.


कवी - विंदा करंदीकर

फुलात न्हाली पहाट ओली

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे

आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले

काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!


कवी - ना. धों. महानोर

प्रेम करावे असे, परंतू....

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.


कवी - विंदा करंदीकर

कविता

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!


कवियत्री - शांता शेळके