वामांगी

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट

मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण


कवी - अरुण कोलटकर

जीवनाचा प्रवास

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात
म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलं कोमेजतात....

पायंजणा

त्या दिसा वडा कडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुजी गो पांयजणा

मौन पडले सगल्या रानां
शिरशिरून थांबलिं पानां
कंवळी जाग आयली तणा झेमता झेमतना

पैसुल्यान वाजलि घांट
दाटलो न्हयेचो कंठकांठ
सांवळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा

फुललो वैर चंद्र ज्योती
रंध्रांनी लागल्यो वाती
नवलांची जावंक लागलीं शकून लक्षणा

गळ्यान सुखां, दोळ्यान दुकां
लकलकली जावन थिकां
नकळटना एक जालीं आमी दोगाय जाणा

वडफळांच्या अक्षतांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुपले कितले चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगले जिणेक आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजली पांयजणा

कानसुलांनी भोंवता भोंवर
आन्गार दाट फुलंति चंवर
पडटी केन्ना सपनां तींच घडटी जागरणा


गीत : बाकिबाब बोरकार (बा. भ. बोरकर)
संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी
स्वर : अजीत कडकडे

जाता जाता गाईन मी

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे


कवी - कुसुमाग्रज

ऋणमुक्त

 सहज सहज टाकुन गेलास
ओंजळीमधे
एक ऋणाचा क्षण..एका जन्मासाठी.

दहा बोटांची उधळली फुलपाखरे
आणि,
पांच प्राणाचे झाले संपुष्ट….

कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल;
कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल;

झुंजु मुंजु धुक्यातुन
कधीच का फिरला नाहीस?
जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून
कधिच का गेला नाहीस?
त्या फुलावरचा दवाचा थेंब
कधिच का पाहिला नाहीस ?

कधिही
न ढळणारा तो दवाचा थेंब
तुझ्यासाठी.
तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी.
कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल
फुल चिमणिने सांगितले असेल..


कवियत्री – इंदिरा संत

उखाणे

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
गरूडाच्या पंखामध्ये
डोंगरांची रांग

निळे निर्झरिणी
अगे सारणीचे राणी
खडकाच्या डोळ्यालाही
येते कसे पाणी?

जाईबाई सांगा
तुम्ही मनातले पाप
कळ्यांचीही फुले
कशी आपोआप?

दावणीस गाय
धूळ काळजाला आली
सूर्य फेकून नदीत
कुठे सांज गेली?

खांद्यावर बसे
त्याचे रंग किती ओले
पाखरांच्या सारखाच
वारियाने डोले

झाड मधे आले
होई वाट नागमोडी
उडे पोपटाचे रान
पिंजर्‍याला कडी

दगडाचा घोडा
त्याला अंधाराचे शिंग
शुभ्र हाडांनाही फुटे
कसे काळे अंग?

संध्याकाळी आई
देवघरात रडते
तिच्या पदराच्या मागे
केवड्याचे पाते

आम्ही भावंडेही
भय डोळी वागवितो
चांदण्यात आईसाठी
वारा दारी येतो

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?


कवी - ग्रेस

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


कवी -  ग्रेस