स्वप्नी गाढ निमग्न भोज असता, ये जागृती त्याजला
पाहे सुंदर मंदिरात भरली चंद्रप्रभा सोज्ज्वळा

जैशी कुंदलता फुलुन खुलते, ते स्थान शोभे तसे
योगी तेथ कुणी लिहीत बसला, भोजास तेव्हा दिसे

सोन्याच्या नवपुस्तकात लिहिता, योगींद्र हे कायसे?
राजा धीर धरून नम्रवचने त्याला विचारी असे

ज्यांचा भाव अखंड ईशचरणी नावे तयांची मुला
प्रेमे सद्वचने प्रसन्नवदने, योगी अशी बोलला

आहे ना मम नाव संतपुरुषा, मालेत त्या गोविले
प्रश्ना उत्त्तर त्या प्रशांत मुनीने राया नकारी दिले

माझे नाव नसो तयांत नसले, जे प्राणिमात्रांवरी
सुप्रेमा करिती तयांतची मला, द्या स्थान कोठेतरी

भोजाचे पुरवून ईप्सित मुनी तो होय अंतर्हित
रात्री तो दुसऱ्या दिनी प्रकटला, भोजा करी जागृत

यादी त्याजवळी कृपा प्रभुवरे केली तयांची असे
तीमध्ये पहिले स्वनाम नवले त्या रेखिलेले दिसे


वृत्त :- शार्दूलविक्रीडित

त्रिधा राधा

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा


कवी :- पु. शि. रेगे

श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन

स्वच्छ निळे, रिकामे अंबर,
नारद तुंबर, अभ्र विरे

कधी केले होते, गंधर्वांनी खळे,
स्वत:शीच खेळे, चंद्रबिंब

पांगले अवघे, वैष्णवांचे भार,
ओसरला ज्वर, मृदुंगाचा

मंदावली वीणा, विसावले टाळ,
परतुनि गोपाळ, घरी गेले


कवी - अरूण कोलटकर

तू ये

मी निशेने ग्रस्त होता
तू उषा होऊन ये
कोरशी प्राजक्त वेणी
कुंतली खोवून ये

संशयाच्या वायसांनी
टोचता माझी धृती
क्षेम द्याया शाश्वताच्या
चंदनी नाहून ये


कवी :- बा. भ. बोरकर

दोन कर्मकठीण गोष्टी

दोन कर्मकठीण गोष्टी आहेत ….
१. दुस-याच्या डोक्यात आपले विचार भरणे
२. दुस-याच्या पैशाने आपला खिसा भरणे
ज्याला पहिली गोष्ट जमते तो उत्तम शिक्षक ठरतो
आणि दुसरे काम करू शकणारा व्यवसायात प्रगती करतो.
.
जिला दोन्ही गोष्टी चांगल्या येतात ती असते …..
बायको
.
आणि ज्याला यातले काहीच जमत नाही तो ….
बिच्चारा नवरा. 

कविता

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"


कवी - कुसुमाग्रज