जिना

कळले आता घराघरातुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेऊनी
हळूच जवळी ओढायाला.

जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड.

मूक असाव्या सर्व पाय-या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा.

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहूनी
चुकचुकणारी पाल असावी.

जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी.

मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...


कवी - वसंत बापट

माझे गाणे

माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे,
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे

सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे,
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे

आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गाता.

ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.

"निरध्वनी हे, मूक गान हे" यास म्हणो कोणी,
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी.

सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले,
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले

शांतहि मत्सर, प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला,
चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला.

ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला,
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.

हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली.


कवी - बालकवी

तुझी वंचना, साधना

तुझी वंचना, साधना, होत आहे
तुलाही आता, वेदना, होत आहे

पुन्हा मेघ आलेत, आश्र्वासनांचे
पुन्हा एकदा, गर्जना, होत आहे

जशी लागली, ओहटी आसवांना
मनाचा किनारा, सुना होत आहे

जरा कुंडलीला, विचारून बघ तू
मनोकामना, वासना होत आहे

नवा क्षण, नवा क्षण, नवा क्षण कशाचा
नव्याने म्हणेतो, जुना होत आहे

कशाला उगी, फुगवटा पाहिजे रे
तुझे बोलणे, वल्गना होत आहे

शिळा एक होती, घडविलीस मूर्ती
मलाही अता, भावना होत आहे

तुला स्पर्श केला, असा भास झाला
किती गोड, संवेदना होत आहे

जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू
दुरावा `इलाही', गुन्हा होत आहे


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे

पत्र

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

सार्तथा संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे

कवी - भाऊसाहेब पाटणकर

पावसा

पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?

पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे

पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा

पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून...


कवी - अनिल

फटका

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको

चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

नास्तिकपणि तुं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको

मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारमधि फसूं नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करु नको ॥ १ ॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको

मी मोठा शाहणा, धनाढ्यहि, गर्वभार हा वाहू नको
एकाहून चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको

हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको

विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको

कष्टाची बरी भाजिभाकरी, तूपसाखरे चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधिं विटू नको

असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आता तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकु नको

सुविचारा कातरू नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥

कवी - अनंत फंदी

'विरामचिन्हे'

जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!

आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.

अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !

झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !

आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश -
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला !


कवी - गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी