आजोबा

जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं
भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"

मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस
धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी
होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे
होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

- मंगेश पाडगांवकर

विझता विझता स्वत:ला

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही।

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही।

कवी - नारायण सुर्वे

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.

कवी - नारायण सुर्वे

माझा घोडा

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके

केळीचे सुकले बाग...

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

अशी कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली

कवी    - अनिल
संगीत -    यशवंत देव
स्वर   -    उषा मंगेशकर

लावण्य

असे काहीतरी आगळे लावण्य केव्हा कधीकाळी दिसून जाते
वेगळ्या सौंदर्य-पर्युत्सुक जीवा जन्मांतरीचे सांगत नाते

नसते निव्वळ गात्रांची चारुता त्याहून अधिक असते काही
ठाव त्याचा कधी लागत नाही आणि आठवण बुजत नाही

रुप रेखेत बांधलेले तरी मोकळी खेळते त्यातून आभा
डोळ्याआडाच्या दीपज्योतीहून निराळी भासते प्रकाशप्रभा

आधीच पाहिले पाहिले वाटते पहिलेच होते दर्शन जरी
स्मरणाच्या सीमेपलिकडले कुठले मीलन जाणवते तरी

पुन्हा तहानेले होतात प्राण मन जिव्हाळा धाडून देते
जागच्या जागी राहून हृदय प्रीतीचा वर्षाव करून घेते !


कवी - अनिल [आ. रा. देशपांडे]

अजुनी रुसून आहे...

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।


कवी     –    अनिल
संगीत  –    पं. कुमार गंधर्व
स्वर     –    पं. कुमार गंधर्व