मन मोकळं करायचं...

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.


कवी – मंगेश पाडगांवकर

खाली डोकं, वर पाय!

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !


कवी - मंगेश पाडगावकर

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं…

तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवून झालं ?
देणार काय ? घेणार काय ?
हुंडा किती ,बिंडा किती ?
याचा मान , त्याचा पान
सगळा मामला रोख होता ,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं ,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

मग एक दिवस,
चंद्र, सूर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणार्‍या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येऊन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं


कवी - मंगेश पाडगांवकर

को-या को-या कागदावर...

को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

ती मनात झुरते आहे
तुम्ही पहात राहणार
कल्पनेच्या पावसात
नुसतं नहात राहणार
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
घट्ट जवळ घेतल्याशिवाय
माणुस नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

शब्द शब्द रीते शब्द
त्यांचं काय करणार?
तळ फुटक्या माठामधे
पाणी कसं भरणार?
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आपण ओठ लावल्याखेरीज
पाणी नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

करुन करुन हिशेब धुर्त
खुप काही मिळेल
पण फुल का फुलतं
हे कसं कळेल
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
फुलपाखरु बनल्याखेरीज
फुल नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

मातीमधे बीजाला
एकचं अर्थ कळतो
कोंब फुटुन आल्यावर
हीरवा मोक्ष मीळतो
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आतुन आतुन भीजल्याखेरीज
रुजणं नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

कवी - मंगेश पाडगावकर

आजोबा

जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं
भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"

मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस
धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी
होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे
होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

- मंगेश पाडगांवकर

विझता विझता स्वत:ला

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही।

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही।

कवी - नारायण सुर्वे

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.

कवी - नारायण सुर्वे