जन पळभर म्हणतील, हाय हाय!

जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
मी जातां राहील कार्य काय ?

सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?

मेघ वर्षतील, शेतें पिकतील,
गर्वानें या नद्या वाहतील,
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?

राम-कृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
मग काय अटकलें मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावें ?
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शांतींत काय ?

कवी - भा.रा.तांबे[भास्कर रामचंद्र तांबे]

या बाळांनो, या रे या

या बाळांनो, या रे या
लवकर भरभर सारे या

मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया

खळखळ मंजुळ गाती झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसही गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया


कवी - भा. रा. तांबे

सायंकाळची शोभा

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्यांचे

अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.

झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?

कवी - भा. रा. तांबे

मरणांत खरोखर जग जगते

मरणांत खरोखर जग जगते
अधीं मरण अमरपण ये मग ते

अनंत मरणे आधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारील मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते

सर्वस्वाचे दान आधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरी
रे! स्वयें सैल बंधन पडते

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काही मिळते?

सीता सति यज्ञीं दे निज बळी
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देऊनी बळी हो बळी
यज्ञेच पुढे पाऊल पडते

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो
स्वसत्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते

प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां
उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर!'गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी काही का मिळते?


कवी - भा.रा.तांबे[भास्कर रामचंद्र तांबे]

कळा ज्या लागल्या जीवा...

कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.

नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.

कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.

पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !


कवी - भास्कर रामचंद्र तांबे

श्रावण मासि

श्रावण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत


कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

ती फुलराणी

हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !


कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)