कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?


कवी - आचार्य अत्रे

अनामवीरा

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा


कवी - कुसुमाग्रज

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका

कवी - कुसुमाग्रज

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

कवी - कुसुमाग्रज

स्मृति

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट!

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग!

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

वादळवेडी

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात...

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात

कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात

तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात


कवी - कुसुमाग्रज