चंद्र आणि क्षय

चंद्र जाहला क्षयी कशाने?
शापबलाने, म्हणती कोणी;
कुजबुकला पण तो माझ्याशी;
या कवितांनी! या कवितांनी!

कवी - विंदा करंदीकर

नायक

रामायण वाचुनिया नंतर
बोध कोणता घ्यावा आपण
श्रीरामासम मिळता नायक
वानर सुद्धा मारिती रावण

कवी - विंदा करंदीकर

इतिहास

इतिहासाचे अवघड ओझे
डोक्यावर घेउनी ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा

कवी - विंदा करंदीकर

खळी

स्वर्गामधुनी येता बालक
अमृत त्याचे काढुन घेती
उरे रिकामी वाटी जवळी
ती खळी ही गालावरती

कवी - विंदा करंदीकर

मला टोचते मातीचे यश

श्रावणातले ऊन रेशमी
आकाशाला बांधून ठेवी
घट्ट धरेशी
सह्याद्रीच्या गळ्यात पडती
श्रावणतल्या सरी सराईत
ओलेत्याने
आणि ओणव्या माळालाही
हंबरणारा अवखळ वारा
ढुशी मारतो भलत्या जागी
अडचणीतल्या पाऊलवाटा
अंग चोरुनी हळूच पळती
माझ्या जवळून
मजला टाळून
- ब्रम्ह जाहले धरणीला वश
अशा प्रसंगी
आत कुठेसे
मला टोचते मातीचे यश
संकलक Kshipra वेळ ८-२७ म.नं. 4 अभिप्राय या पोस्टचे दुवे
वर्ग विंदा करंदीकर
सोमवार ७ फेब्रुवारी २०११
असेल जेव्हा फुलावयाचे - विंदा करंदीकर
असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याचसाठी फुल सखे तू
फुल सखे तू फुलण्यासाठी;
फुल मनातिल विसरून हेतू.

या हेतूला गंध उद्याचा;
या हेतूची किड मुळाला;
फुल सखे तू फुलण्यासाठी;
या हेतूचा चुकवून डोळा.

फुल सखे होउन फुलवेडी;
त्या वेडातच विझव मला तू.
विझव नभाच्या आळवावरचे;
स्थळ-कालाचे हळवे जंतू.


कवी - विंदा करंदीकर

मानवाचे अंती । एक गोत्र

मिसिसिपीमध्ये। मिसळू दे गंगा;
र्‍हाइनमध्ये "नंगा"। करो स्नान.

सिंधुसाठी झुरो। ऍमेझॉन थोर,
कांगो बंडखोर। टेम्ससाठी.

नाईलच्या काठी। "रॉकी" करो संध्या;
संस्कृती अन्‌ वंध्या। नष्ट होवो.

व्होल्गाचे ते पाणी। वाहू दे गंगेत;
लाभो निग्रो रेत! पांढरीला.

माझा हिमाचल। धरो अंतर्पट,
लग्नासाठी भट। वेदद्रष्टा!

रक्तारक्तातील। कोसळोत भिंती;
मानवाचे अंती। एक गोत्र.

छप्पन भाषांचा। केलासे गौरव
तोचि ज्ञानदेव। जन्मा येवो.

जागृतांनो फेका। प्राणांच्या अक्षता
ऐसा योग आता। पुन्हा नाही!


कवी - विंदा करंदीकर

फ्रॉईडला कळलेले संक्रमण

हल्ली हल्ली फुलू लागल्या
शेजारील सान्यांच्या पोरी
उन्निस वर्षांच्या अभयेला
येऊ लागली मधेच घेरी


सतरा वर्षांची सुलभाही
हुळहुळणारे नेसे पातळ
मधेच होई खिन्न जराशी
मधेच अन ओठांची चळवळ


पंधरा वर्षांची प्रतिमापण
बुझते पाहून पहिला जंपर
तिला न कळते काय हवे ते
तरी पाहते ती खालीवर


हल्ली हल्ली फुलू लागल्या
शेजारील सान्यांच्या पोरी
बाप लागला होउ प्रेमळ
आई कडवट आणि करारी


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - स्वेदगंगा