मी नजरेला खास नेमले

मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी
तुला वाटले,ती भिरभिरते,तुला पहाण्यासाठी

म्हणून तू,जाहलीस माझी,माझी,केवळ माझी
किती बहाणे केले होते, तुला टाळण्यासाठी

घडीभराने मलूल होतो, गजरा वेणीमधला
खरेच सांगतो,खरेच घे हे,हृदय माळण्यासाठी

गुपचुप येऊन भेटत असतो, तुझी आठवण मला
तिचा दिलासा, मला पुरेसा आहे जगण्यासाठी

कधी कवडसा, बनुन यावे, तुझ्या घरी एकांती
उघडझाप करशील मुठीची, मला पकडण्यासाठी

तु म्हणजे ग, फ़ुल उमलते,गंध तुझा मी व्हावे
दवबिंदू, व्हावेसे वाटे, तुला स्पर्शिण्यासाठी

तुझी साधना करता करता,अखेर साधू झालो
निर्मोही झाला 'इलाही',तुला मिळविण्यासाठी


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे

चुकली दिशा तरीही

कणिका

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी कै. विंदा करंदीकर यांच्या काही कणिका सादर करत आहे.
कणिका म्हणजे चार ओळींची छोटीशी कविता...

उत्क्रांती

माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी

कवी - विंदा करंदीकर

दर्पण

परमेशाला गमलें, आपण
रुप पहावें अपुले सुंदर;
आणिक केला त्यानें दर्पण;
तोच समजतो आपण सागर!

कवी - विंदा करंदीकर

चंद्र आणि क्षय

चंद्र जाहला क्षयी कशाने?
शापबलाने, म्हणती कोणी;
कुजबुकला पण तो माझ्याशी;
या कवितांनी! या कवितांनी!

कवी - विंदा करंदीकर

नायक

रामायण वाचुनिया नंतर
बोध कोणता घ्यावा आपण
श्रीरामासम मिळता नायक
वानर सुद्धा मारिती रावण

कवी - विंदा करंदीकर