मावळतीला

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणिक मजला घेरित आले

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे

जाणिव विरते तरीही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय


कवियत्री - शांता शेळके

लाडकी बाहुली

लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख

किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले

हासती केसही सुंदर काळे कुरळे

अंगात शोभला झगा रेशमी लाल

केसांवर फुलले लाल फितीचे फूल

कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी

पण तीच सोनुली फार मला आवडती

मी तिजसह गेले माळावर खेळाया

मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या

किती शोध-शोधली परी न कोठे दिसली

परतले घरी मी होऊन हिरमुसलेली

वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी

शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी

जाणार कशी पण पाऊस संततधार

खल मुळी न तिजला वर झोंबे फार

पाऊस उघडता गेले माळावरती

गवतावर ओल्या मजला सापडली ती

कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला

पाहुनी दशा ती रडूच आले मजला

मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान

केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून

पण आवडली ती तशीच मजला राणी

लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी



कवियत्री- शांता शेळके

सखेसोबती

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी

अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे

तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ

मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?


कवियत्री- शांता शेळके

बरसात

संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत
त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुळझुळनितळ जिव्हाळा
जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा.

संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून,
जसे हिवाळ्यातल्या झोंबऱ्या पहाटगारठ्यात
अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह.

संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता....
एक धागा... जपून ठेवावा खोल हृदयात
एखादे रखरखीत तप्त वाळ्वंट तुडवताना
माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात...


कवियत्री - शांता शेळके

सहजखूण

सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वास
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास
सुवास, पाकळ्या, पराग, देठ - फुल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही

दोन पावलांपुरते जग तेच अखेर असते खरे
हिरवीगार हिरवळ तीच, त्याच्यापुढे काय उरे?
पुढे असते वाळवंट फक्त, करडे, रेताड आणि भयाण
निर्वात पोकळीमध्ये अश्या गुदमरून जातात प्राण

फुल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा
वाळूइतकाच खरा आहे वाळूमधला खोल झरा
थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखूण
सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून?


कवियत्री - शांता शेळके

अज्ञात प्रदेश

काळजातले अनेक अज्ञात प्रदेश
ज्यांचे अस्तित्वही ठावूक नव्हते आजवर,
हलके हलके दिसत आहेत मला
पावलांखाली नव्याच वाटा, आतबाहेर, सर्वभर.

हररोज हरघडी अचानक नवे प्रश्न समोर
जुन्या संबंधांची तेढीमेढी अतर्क्य वळणे
चक्रव्यूहात आपले आपल्याला जपणे जोपासणे
अनेक गोष्टींचे अर्थ आयुष्यात प्रथमच कळणे

माझा मीच आता किती शोढ घेते आहे
अज्ञाताशी जुळवते आहे रोज नवी नाती
आतल्या आत घडत, मोडत, पुन्हा घडत
अपरिचीत रुपे घेत आहे माझी माती.


कवियत्री - शांता शेळके
बऱ्याच दिवसांनंतर हॅंगरवरचा कोट काढला
कॉलरवर केवढा लांबलचक केस सापडला

आठवते आहे, गेल्या हिवाळ्यात घातला होता अंगात!