पाणपोई

येइं भाई, येथ पाही घातली ही पाणपोई
धर्मजाती कोणती ती भेद ऐसा येथ नाही
संसॄतीचा हा उन्हाळा तल्खली होई जीवाची
स्वेदबिंदू, अश्रुधारा यांविना पाणीच नाही

वायुवीची भोंवतीं आंदोलुनी त्या वंचिताती
झोंबती अंगी झळा अन् मूर्छना ये ठायिंठायीं
सांवली नाही कुठेंही, तापतो मार्तंड डोईं
श्रांत पांथा ! बांधिली ही तूझियासाठीं सराई

आद्य जे कोणी कवी तत्स्फूर्तिच्या ज्या सिंधु गंगा
आणिल्या वाहून खांदीं कावडी त्यांतील कांही
पांथसेवासाधनीं हें व्हावयाचे गार पाणी
मॄत्तिकेचे मात्र माझे कुंभ, ही माझी नवाई

ओंजळी, दो ओंजळी, आकंठ घे ईं वा पिऊनी
हो जरा ताजा तवाना, येऊं दे सामर्थ्य पायीं
पावतां तॄप्ती मना, संचारतां अंगीं उमेदी
जो दुवा देशील पांथा तेवढी माझी कमाई


कवी - यशवंत

श्रावणबाळ

शर आला तो धावुनी आला काळ
विव्हळला श्रावण बाळ
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी

त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा

मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले
कावड त्यांची
घेवून मी काशिला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे
तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला

मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला
त्यां वृध्दपणी
मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा बघतील ते
वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होउनिया श्रावण बाळ

परी झांकुनी सत्य कसे हे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्यामागे
घ्या झारी... मी जातो.. त्याचा बोल
लागला जावया खोल
सोडीला श्वास शेवटला
तो जीव - विहंग फडफडला
तनु - पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी


कवी - ग.ह.पाटील

सांगाती

हाती हात धरुन माझा
चालवणारा कोण तू?
जेथे जातो तेथे माझा
काय म्हणून सांगाती?
आवडतोस तू मला
की नावडतोस?
माझे मला कळत नाही !
एवढे मात्र जाणवते की
माझा हात धरुन असे चालवलेले
मला मुळीच खपत नाही !
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना !
झिडकारुन तुझा हात
म्हणून दूर पळत जातो
बागडतो, अडखळतो, धडपडतो
केवळ तू कनवाळू पाठीशी उभा म्हणून
माझे दु:ख जाणवून
उगाच किंचाळत सुटतो
एरव्ही तू नसतांना
पडलो अन लागले तर
पुन्हा उठून हुंदडतो !

खांद्यावर हात माझ्या सदोदित
असा ठेवू नकोस ना
अशानेच माझी वाढ खुंटत जाते
असे मला वाटते ना !
बरोबरीचे वागणे हे खरोखरीचे आहे का?
खूप खूप माझी उंची एकाकीच
माझी मलाच वाढवू दे
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊ दे
तोवर असे दुरदुरुन, तुझा हात दूर करुन
मान उंच उभारुन
तुझ्याकडे धिटकारुन पाहू दे !


कवी - अनिल

एक दिवस

जीव लागत नाही माझा असा एक दिवस येतो
कधी अधुनमधुन केव्हा लागोपाठ भेट देतो

अशा दिवशी दुरावलेले उजाड सारे आसपास
घर उदास बाग उदास लता उदास फ़ुले उदास

वाटते आयुष्य अवघे चार दिवसांचेच झाले
कसे गेले कळले नाही हाती फ़ार थोडे आले

दोन दिवस आराधनेत दोन प्रतिक्षेत गेले
अर्धे जीवन प्रयत्नात अर्धे विवंचनेत गेले

आस हरपलेली असते श्वास थकले वाटतात
अश्रू बाहेर गळत नाहीत आत जळत राहतात.


कवी - अनिल [आ. रा. देशपांडे]

तळ्याकाठी [दशपदी]

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते

जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही

सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत

पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो

हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते !


कवी - अनिल [आत्माराम रावजी देशपांडे]

आणिबाणी [दशपदी]

अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो

वादळ असे भरून आले तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते

हरपून जावे भलतीकडेच इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान

असे पडत होते डाव सारा खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते जीव पुरा वीटून जावा

कसे निभावून गेलो कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते नुसते हाती हात होते!


कवि - अनिल [आ. रा. देशपांडे]

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा


कवियत्री - शांता शेळके