शेवटी...!

'हेच' चाले पहा शेवटी..
'तेच' झाले पहा शेवटी !

सभ्य मी, संत मी, चांगला..
लोक 'साले' पहा शेवटी !

शब्दकोशात नाही मजा..
हे कळाले पहा शेवटी !

ज्या घरासाठि भांडायचो..
ते जळाले पहा शेवटी !

शेवटी काय सारे 'झिरो'..
'ते' म्हणाले पहा शेवटी !

कैकदा मी मला पेरले..
पिक आले पहा शेवटी !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

अहवाल..!

हे हळूच किलकिलती ..झोपेचे दरवाजे..
हा श्वास म्हणावा की..आभास तुझे ताजे ?

उजवे, डावे, मागे..सारेच बुरुज गेले..
किल्ल्यात फितुरीचे हुंकार कसे वाजे ?

हे युद्ध कुणी जिंको..हे युद्ध कुणी हारो..
कानून तुझा चाले..आम्ही कसले राजे ?

सारेच तुझे आहे..अहवाल पहा ताजा..
जोडून तुझ्यापुढती..बघ नाव दिसे माझे !

आभाळ उडाले का ? वाराच तसा आला..
रेषेतून जगण्याचा..इतिहास कुठे गाजे ?

झाले ते झाले ना..तू लोड नको घेवू..
मुर्खाला सांग जरा..का गाल तुझा लाजे..?


कवी - ज्ञानेश वाकुडकर

डोळे

तिची सोनियाची काया..
तिचं लाजाळूच झाड..
याचे आतुरले डोळे..
तिची खुलेना कवाडं !

तिच्या देहाला कुंपण..
याचे देहभर डोळे..
तिच्या श्रावणाच्यासाठी..
याच्या देहाचे उन्हाळे..!

जीव नदीकाठी त्याचा..
तहानला सोडू नये..
तिच्या धारेला जगाने..
उगा फाटे फोडू नये !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

मी गाणे म्हणू का?

एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर प्रवचन ऐकण्यास जात असे, पण 'सू..' आली की, तो जोरजोरात ओरडायचा. त्यामुळे इतर लोक त्या बाईंवर रागवत असत.

एकदिवस त्या बाईने मुलास युक्ती सांगितली. की तुला 'सू..' आली की तू मला म्हण 'आई मी गाणे म्हणू का?' दुसर्‍या दिवशी त्याने तसे केले. लोक म्हणाले, बाई इथे प्रवचन सुरू आहे, त्याला बाहेर घेऊन जा.

एकदा तो मुलगा आपल्या बाबांबरोबर परगावी गेला. रात्री सर्व लोक झोपले आणि मुलास 'सू..' आली. तो वडिलांना म्हणाला, बाबा.. बाबा.. मी गाणे म्हणू का?

वडील म्हणाले, अरे सगळे लोक झोपले आहेत. तुला म्हणायचे असेल तर माझ्या कानात म्हण...मुलाने त्यांच्या काणात काय केले असेल हे तुम्हाला आता सांगण्याची आवशक्यता आहे काय?

चांदणे अंथरू..

चांदणे अंथरू..चांदणे पांघरू..
देह माझा तुझा..चांदण्याने भरू !

आज दोघामधे ही हवाही नको..
बांध दोघातले दूर सारे करू !

पाहू दे, वेचू दे हा अजिंठा तुझा..
शोधता शोधता..तू नको थरथरू !

धबधब्याला कशी झेलते ही दरी..
कोसळू कोसळू अन पुन्हा सावरू !

दूर फेकून दे सर्व पाने फुले..
श्वास आता जरा रोखुनीया धरू !

ठेव राखुनिया सर्व खाणाखुणा..
निर्मितीचे उद्याच्या पुरावे ठरू !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

यक्षरात्र

पाण्यासारखेच, वाहते सदाचे
आयुष्य नावाचे, खुळे गाणे

किनारे धरुन, अखंड चालला
दुःखांचा काफिला, मस्तपणे

सुखाचेही तळ, जाताना घासून
अस्तित्वाची खूण, कळे मला

दिव्यापरी आता, प्राक्तन जोडून
प्रवाही सोडून, श्‍वास दिला

आणि रंगगर्द, क्षितिज पेटले
रात्री उजाडले, क्षणमात्र

तमाने टाकली प्रकाशाची कात
झाली काळजात, यक्षरात्र !


कवियत्री - अरुणा ढेरे

लेणी

समोर, धुकं पांघरुन,
कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड
रोज पहातो माझ्याकडे रोखून,
आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस ?
आपणच उत्तर देतो, हो विसरणारच.
मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड !
असं सगळं विसरता येत असतं,
तर तुझी ही भाषा कळली असती का मला ?
अन हे भोळं मन भळभळलं असतं का असं
वेळीअवेळी ? तुझ्या शेजारीच लेणी आहेत की !
मग तुला कसं कळत नाही वेड्या !
की माणसाच्याही मनात
काही सुंदर लेणी असतात म्हणून !


कवियत्री - पद्मा गोळे