रक्तामध्ये ओढ मातीची

रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे


कवियत्री - इंदिरा संत

जशी ती

तो कधी येईल, कधी न येईलकधी भेटेल, कधी न भेटेल
कधी लिहिल, कधी न लिहिल
कधी आठवण काढील, कधी न काढील
असा तो. एक अनिश्चिती…………..
बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी.
म्रूत्युसारखी.

त्या अनिश्चितीच्या ताणांच्या धाग्यात
तिचे पाय गुंतणार, काचणार……..
कोलमडणार….
पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक
पीळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर
उभी राहून ती झोके घेऊ लागली
या अस्मानापासुन त्या अस्मानापर्यंत
अशी ती एक मूक्ता
वार्यासारखी. जीवनासारखी.

कवियत्री - इंदिरा संत

मामुली ऑपरेशन

 गणपतरावांच पायाच ऑपरेशन व्हायचं होत ; पण ऐन वेळेला ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी धूम ठोकली
आणि ऑपरेशन काही झाल नाही .

विलासरावांनी विचारलं 'का हो' अस का केलेत तुम्ही ?

मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेल . डॉक्टर मला भूल देण्याची तयारी करत होते .आणि नर्स म्हणाली ..........

'घाबरू नका , मामुली तर ऑपरेशन आहे' आणि ते ऐकून मी तिथून धूम ठोकली गणपतरावांनी सांगितलं .

ही मात्र हद्दच झाली ह गणपतराव . मामुली ऑपरेशन आणि नर्स एवढी धीर देत असताना तुम्ही पळालात ? विलासराव आशचर्य चकित होऊन म्हणाले .

'अहो तसं नव्हे ती नर्स डॉक्टरांना धीर देत होती ' गणपतरावांनी खुलासा केला .

ग्लोबलायझजेशन

ग्लोबलायझजेशन ग्लोबलायझजेशन
म्हणजे नेमक असत काय?

आमच्या गल्लीत त्यांची दुकाने
गावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय!
आणि दुसरे सांगा काय!

आमचा मळा, आमचा माळी
त्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली
याहून दुसरे सांगा काय?

 आमचे मास्तर त्यांच्या शाळा
त्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर
याहून दुसरे सांगा काय?

त्यांच्या कंपन्या आमची माणसे
बिनभांडवली व्याज आपले
असा ऍडव्हांटेज दुसरे काय?

होंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी
भेटवस्तू मेड इन चायना
ग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय?

जग म्हणजे एक लहान गाव
मात्र शेजाऱ्याचा नाही ठाव
हा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे
आणखी काय!

- मुक्तछंदा

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची…


कवियत्री - इंदिरा संत

आला केसराचा वारा

प्रभातीच्या केशराची कुणि उधळली रास
आणि वाऱ्यावर रंगला असा केशरी उल्हास!

रंगा गंधाने माखून झाला सुखद शितळ
आणि ठुमकत चालला शीळ घालीत मंजुळ!

हेलावत्या तळ्यावर वारा केशराचा आला
लाटा -लहरी तरंगानी उचंबळुन झेलला!

नीळे आभाळ क्षणात तळ्यामधे उतरले!
एकाएकी स्तब्ध झाले!!

नऊ सुर्याची मुद्रीका सीतामाईने टाकली
इथे काय प्रकटली!

तळ्याकाठी माझे घर , उभी दारात रहाते
हेलावत्या केशरात स्वप्ने सुंदर पहाते

केशराचे मंज माझा मनावर चमकले!
आली किरणे तळ्याशी दारातुन आत आले

मनातील बिंदु बिंदि निगुतीने गोळा केले
तळ्यावरच्य़ा शेल्यात घट्ट गाठीने बांधले


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - निराकार

चुकून चुकून

चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …

शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …

त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम