हायकू

एक तळ... जुनाट... स्तब्ध
एक बेडूक बुडी घेतो त्यांत
जराशी खळबळ आणि पुन्हा शांत


कवयित्री - शिरीष पै

हायकू

उडत जाताना बगळ्यान
किंचित स्पर्श केला पाण्याला
उठलेला तरंग वाढतच गेला

कवयित्री - शिरीष पै

हायकू

पायापाशी फुटली लाट
पाणी आले... गेले
मी... फक्त पहात राहिले
दुसरे आपण फार काही करूही शकत नाही....


कवयित्री - शिरीष पै

हायकू

उदास झालेलं माझ मन
इतकं प्रसन्न कसं झालं
साधं पाखरू तर बागेत चिवचिवल

कवियत्री - शिरीष पै

रुपे श्यामसुंदर

रुपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा ।
सखीये स्वप्नी शोभा देखियेला ॥१॥

शंखचक्र गदा शोभती चहुकरी ।
सखीये गरुडावरी देखियेला ॥२॥

पितांबर कटी दिव्य चंदन उटी ।
सखीये जगजेठी देखियेला ॥३॥

विचारता मानसी नये जो व्यक्तीसी ।
नामा केशवेसी लुब्धोनी गेला ॥४॥


रचना – संत नामदेव
संगीत – प्रभाकर पंडित
स्वर – सुरेश वाडकर

प्रेमपिसें भरलें अंगीं

प्रेमपिसें भरलें अंगीं ।
गीतेसंगें नाचों रंगीं ॥१॥

कोणे वेळे काय गाणें ।
हे तों भगवंता मी नेंणे ॥२॥

वारा वाजे भलतया ।
तैसी माझी रंग छाया ॥३॥

टाळमृदंग दक्षिणेकडे ।
आम्ही जातो पश्चिमेकडे ॥४॥

बोले बाळक बोबडे ।
तरी ते जननीये आवडे ॥५॥

नामा म्हणे गा केशवा ।
जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥


रचना  –  संत नामदेव
संगीत – वसंत देसाई
स्वर   – वाणी जयराम

देवा करी गा निःसंतान

ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥
करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३ ॥
माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥


रचना - संत सावता माळी