रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ

                            श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!
"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत?" रामने विचारले.
"राम! आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते, रे! हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे! जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग! लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत! कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले! पारतंत्र्य सर्वभक्षक आहे. सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही; शोक आहे, आनंद नाही; कृतघ्नता आहे, कृतज्ञता नाही; लोभ आहे, प्रेम नाही; पशुत्व आहे, माणुसकी नाही; अंधार आहे, उजेड नाही; अधर्म आहे, धर्म नाही; भीती आहे, निर्भयता नाही; बंधने आहेत, मोकळेपणा नाही; रूढी आहेत, विचार नाही. हे विराण दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये, तर काय करू?"
श्याम बोलेना. "श्याम! दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे; अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे, बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक." राम म्हणाला.
"परंतु मी वीर नाही; तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे, असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो; माझी ऐट उसनी असते; ती जिवंत आशा नसते." श्याम म्हणाला.
"निराश होणे म्हणजे देवाला विसरणे, निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल. अंधारातून उजेड येईल, असे मानणे म्हणजेच आस्तिक्यभाव." राम म्हणाला.
"परंतु निशा संपून आलेल्या उषेची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे, ते मला समजत नाही. जाऊ दे. फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल, ते करावे. दगड उचलावा; काटा फेकावा! फूलझाड लावावे; रस्ता झाडावा; कोणाजवळ गोड बोलावे; गोड हसावे; आजाऱ्याजवळ बसावे; रडणाऱ्याचे अश्रू पुसावे. दोन दिवस जगात राहणे! माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार!"
"अरे, आपण संघटना करू. नवविचार फैलावू; दैन्य हरू; भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे." राम म्हणाला.
                            प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थनामंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते. परंतु हा दिव्य, अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता? श्याम म्हणजे आशा-निराशांच्या द्वंद्वयुद्धाचे स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल. आज उड्या मारील व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते.
                            प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला-
"गड्यांनो! दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काही तरी बोलण्यासाठी मी गेलो होतो."
"आई! या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, 'अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली.' आई! आपण एकदा श्रीमंत होतो, ते लोकांना माहीत आहे; परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही; सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो."
"श्याम! तू आता शाळा सोडून दिली पाहिजे." आई शांतपणे म्हणाली.
"आई! आताशी तर पाचवी इयत्ता माझी पास झाली. एवढ्यात शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमावता येणार आहे?" असे मी आईला विचारले.
"तुला कोठेतरी रेल्वेत लावून देऊ, असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठे नोकरी, मिळाली, तर." आई म्हणाली.
"आई! एव्हापासूनच का नोकरी करावयास लागू? या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ? आई! माझ्या केवढाल्या उड्या, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने! मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन! आई! साऱ्या आशांवर पाणी ओतावयाचे? सारे मनोरथ मातीत लोटावयाचे?" मी जणू कवी होऊनच बोलत होतो; भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती.
"श्याम! गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात!" आई म्हणाली.
"आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे, असे तुला वाटते! मी मोठा व्हावे, असे तुला नाही वाटत?" मी आईला विचारले.
"माझ्या मुलाने मोठे व्हावे; परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे; पित्यावर विसंबून रहावयाचे तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे." आई म्हणाली.
"आई! मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकविलेस, या वेळेस काय करू? ते तूच सांग." मी आईला म्हटले.
"आईबाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले, तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा, उपासतापास काढ, आयाससायास कर, विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास, तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू?" आईने स्वावलंबनाचा उपदेश केला.
"आई! मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस! माझ्या हृदयात तू आहेस, म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई! तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे, तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे? तेथे कोणाला माहीत आहे? कोणाचे काही काम करीन; तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना?" आईला मी विचारले.
"जा. माधुकरी मागणे पाप नाही; विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नको, पाप करू नको. सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल, ती मदत देत जा. गोड बोलावे. हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको, हृदये दुखवू नको, अभ्यास झटून कर, आईबापांची आठवण ठेव; बहीणभावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील. सन्मार्गावर ठेवील. जा. माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर." आई प्रेरक मंत्र सांगत होती. तारक मंत्र देत होती.
"आई! तू भाऊंची परवानगी मिळव; त्यांची समजूत घाल." मी सांगितले.
"मी तुला ती मिळवून देईन. निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते." असे आईने आश्वासन दिले.
रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते. कुळिथांचे पिठले होते. "म्हटले, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला." आई वडिलांना म्हणाली.
"कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रुपये मोजले; परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालली नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये, असे का मला वाटते? आपल्या होतकरू, बुद्धिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये, असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय?" असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले.
"तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण, म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे, म्हणजे झाले." आई म्हणाली.
"काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर, असे काही माझे सांगणे नाही. फक्त, मी शिकवायला असमर्थ आहे, एवढेच. माझा आशीर्वाद आहे." वडील म्हणाले.
आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. "आई! मग अण्णा जाणार वाटते? लांब जाणार, लौकर परत नाही येणार?" धाकटा पुरुषोत्तम आईला विचारीत होता.
"हो, बाळ; तो शिकेल व मग तुम्हांला शिकवील. तुम्हांला शिकविता यावे, म्हणून तो लांब जात आहे." आई त्याची समजूत घालीत होती.
                            शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले.
वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता, तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो! इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुर्रकन आईजवळ उडून येत होते; परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे-जाणे थोडेच होणार! प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार! मला दहा रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो; पुढे आईबापांस सुख देता यावे म्हणून जात होतो; आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो; हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यांतील पाण्याला थांबवीत होतो. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? "श्याम! तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव, रे, माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही होत आहे." असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे, म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? "आई! मी थारोळे भरून ठेवतो." म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागरकळशी कोण भरून आणील? मी घरी गेलो, की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईन, याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण? मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई; तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया. साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच; एक तोच.
                            माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावयाची होती. आज रात्री जाणार, हो जाणार; आईला सोडून जाणार! आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या. एक घोंगडी काढली. मी आईला म्हटले, "घोंगडी कशाला मला? एक तरट खाली घालीन; त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे. मला नको."
"अरे तू परक्या मुलखात चाललास. तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले, तर असू दे आपली. बाळ! आमचे येथे कसेही होईल. माझे ऐक."
असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसांत ओठ फुटू नयेत, म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला; आगबोट लागू नये, म्हणून चार आवळ्याच्या वड्या दिल्या, चार बिब्बेही बरोबर असू देत, असे म्हणाली व लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणिले. माझी ममताळू, कष्टाळू आई! बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते.
                            रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटले, "आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो, बाळ. आईला आता तू!" असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली, ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरविला. ते काही बोलू शकले नाहीत. आणि आईच्या पायांवर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकीवयनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, "माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा." "जा, हो, श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू" त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. "सांभाळ!" ती म्हणाली. मी मानेने हूं म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते. कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचे होते. तिठ्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लाविले. त्याच्या चरणींचा शेंदूर कपाळी लावला. "माझ्या मायबापांना जप!" असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलाच्या पाया पडलो. "जप, हो, बाळ. सांभाळ." ते म्हणाले.
मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन-समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार? ह्या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील? तारू कोठे रुतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. "ध्रुवाप्रमाणे जा" आई म्हणाली! कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेंबडालेंबडा, पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम! मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई! तिची कृपादृष्टी असली, म्हणजे झाले. मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडले होती. ती लेवून मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो; कधी चिखलात रुतलो; कधी वाळूत पडलो; कधी लाटांनी बुडविले; परंतु पुनः पुनः मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत, असे नाही. अजूनही धोके आहेत. परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही, तरी तिची कृपा आहेच. आई मेली, तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणांस नेहमी आतून मिळतच असतो.


********************************************************************************************
 रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक           अनुक्रमणिका         रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी
********************************************************************************************

रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी

श्यामने सुरुवात केली:
                            "आमचे कर्ज दिवसेंदिवस वढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एकदोन मोठी शेते विकली असती, तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते; आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते; परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे.

                            त्या रात्री आईचे वडील-आमचे आजोबा-आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते; वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहारचतुर, हिशेबी व धोरणी ते होते; परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले, तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते, त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही; सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले, असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता.

                            माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले.
नानांनी सुरुवात केली व म्हणाले, "हे पाहा भाऊ, आज तुम्हांला शेवटचे सांगावयाला आलो आहे. मी तुम्हांला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते; परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले, आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे; याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका."

                            "परंतु माझी एवढी काळजी तुम्हांला कशाला? दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का? नाना! माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हांला पाझर फुटायला नकोत!" वडील औपरोधिक बोलत होते.

"भाऊ! माझ्याने राहवले नाही, म्हणून मी आलो. पोटतिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे, म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हांला दिलेली आहे, म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे, या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीस लागू नयेत, म्हणून मी आलो. लौकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत पंधराशे रुपयांस तो विसापूरवाला घेत आहे, देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारता येईल." नानांनी हृदय ओतून सांगितले.

"नाना! पायरे शेत कसे विकावयाचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरस्फोड करून फोडल्या. कातळास सुरुंग लावले व भातजमीन तयार केली. दहा मणांचे शेत तीन खंडींचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतांवर पोरांचा किती लोभ! मुले शनिवारी-रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची. तेथेच वांग्याचे भरीत व भात दूर्वांच्या आजीबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध! जमीन सुद्धा कशी आहे! सोने पिकेल तेथे, अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालिता येत नाही, तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची? आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणेही पाप! जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो!" वडील बोलले.

"भाऊ! मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई, कशी विकावयाची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्या वेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई! मला नका नीती सांगण्याचा आव आणू. एके वेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगारधंदा नीट लागला, तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही, तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलिस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल! म्हणजे मग बरे, की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे, हे बरे?" नानांनी विचारले.

"माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना?" भाऊ म्हणाले.

"माझीही आहे, म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात, हे विसरलात वाटते? लोक म्हणतील, अमक्याच्या जावयाच्या घरीची जप्ती झाली. तुमच्या अब्रुत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपलाच हेका मूर्खासारखा धरणे चांगले नाही!" नाना म्हणाले.

"मूर्ख म्हणा, काही म्हणा. तुम्हांला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा!" भाऊ म्हणाले.

"म्हणेनच. म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले! आम्ही म्हणे सरदार! सरदार घराण्यातले, म्हणून मुलगी दिली! हुंडा दिला! मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली! तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी! तुम्ही सरदार ना, हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला, ना खायला! हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहे, हेच का हेच का सरदार? नाही नीट घरदार! नाही काही! हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार! केवढी ऐट होती! तीस वर्षे संसार केलात, का धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवलीत! साऱ्यांनी तुम्हांला फसविले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे, सरदार! भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार! बरे, बोवा, स्वतःला अक्कल नाही, तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले. तेही नाही. हा काय चावटपणा चालविला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ! हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो, तसे करा!" असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली.

                            ती बोलणी घरात आईला ऐकवत ना; तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, "नाना! माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात; तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका! सारे जण खडे मारतात, म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना! तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी, म्हणून या भरल्या घराला अवकळा आली; वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट, असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले. ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही, तर नाही. काय व्हायचे ते होईल. परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते; परंतु मने मात्र दुखावलेली राहतात. नाना! फुटलेले मोती सांधता येत नाही, मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. त्यांचे मन, दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत; आमचे काय व्हायचे असेल काही ते होवो. ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे? मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे, असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. दोन गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या, बाकी काही नको. उपदेश नको, शिव्या नको. नाना! बोलते याची क्षमा करा! सरदार घराणे. नाना! नव्हते का सरदार घराणे! सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहोर येईल; झाड वाळून गेले, तर पुन्हा पालवी फुटेल. नाना! रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे होवो. परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून नका बोलू. माझे एवढेच मागणे आहे." असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली.

"बयो! ऊठ. तुझी इच्छा आहे, तर हा पाहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही. समजलीस! माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे!"

"नाना! असा अर्थाचा अनर्थ करू नका; त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी, तशीच त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्हीही हवेत व हेही हवेत. नाना! आम्हांला भाग्य सोडून गेले; भाऊबंद सोडून गेले; तुम्हीही सोडून जाणार का? नाना! तुम्ही येत जा, प्रेमाने आम्हांला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना?" आईचा गळा दाटून आला.

"नाही, मी आता येणार नाही, जेथे आपल्या शब्दाला मान नाही, तेथे कशाला जा?" असे म्हणत नाना निघून गेले.

"नाना! तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले. काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल." आई वडिलांना म्हणाली.

"या कपाळकरंट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा. मला एकटाच पडू दे." वडील त्राग्याने म्हणाले.

                            गरीब बिचारी आई! ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरूण सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे? तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते.



********************************************************************************************
 रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ           अनुक्रमणिका         रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन
********************************************************************************************

रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन

                            "मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो; परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल, तो मात्र मला सांगणे भाग आहे.
                            पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वांत धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला, असे आम्हां सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हांला सोडून गेला! "दत्तगुरू, दत्तगुरू" म्हणत गेला. "ते पाहा मला बोलावीत आहेत, मी जातो!" असे म्हणत तो गेला.
                            मी औंधला होतो, तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा; तेथेही प्लेग आहे, हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले, तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे, तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते.
                            प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे, असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली. काही चांगली पुस्तके विकली. पाच रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. दोन-तीन महिने शाळा बंद राहील, असा अंदाज होता.
                            मी हर्णे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुडपक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भूपाळ्या, कोठे वेदपठन ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल, अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे-
"गोकुळात खाशी तू दही दूध लोणी
परब्रम्ह होतासि नेणे परि कोणी
एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी
पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी"
हे गाणे म्हणत होती.
मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना. परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लकटले. थाप मारली,
"कोण?" आईने विचारले.
"मी. श्याम." असे उत्तर दिले.
"श्याम! आला रे माझा बाळ; आल्ये, हो!" असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले.
आईने मला पोटाशी धरिले. "देवांना नमस्कार कर. मी त्यांना गूळ ठेवत्ये. हो, आधी, बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लाविले होते! त्याला देवाने नेले, म्हटले दुसरा दृष्टीस पडतो, की नाही?" असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो.
                            वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली "म्हटलं, श्याम आला, हो, आपला, आताच आला!" ते पाय धुऊन घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. "श्याम! गणपतीवर आवर्तने करीत होतो. आलास शेवटी, खुशाल आहेस ना? सदानंद गेला!" असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले.
"नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज." आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे, असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या त्या पांघरुणात निजणे, ते अजून मला आठवते आहे. किती तरी वेळा रात्री असताना "मी माझ्या आईच्या कुशीत आहे," हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत, असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो.
                            घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली, ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, "तुला कवठ आवडते, रे?" मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर, सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले.
                            आता जवळजवळ महिना होऊन गेला होता तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही. म्हणून हात हलवीत परत आलो, असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेविले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली.
परंतु एकदम दचकून जागा झालो. कुठून तरी उंचावरून पडलो, असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो, तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला.
                            आई गोवाऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवाऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती.
"त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल, म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल?" असे वडील म्हणाले.
"तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात; तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही." असे आई माझी बाजू घेऊन बोलत होती.
"त्या वेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसांत नोकरी तरी कोठे आहे? परंतु तुम्हां मायलेकरांना पसंत पडले नाही." वडील पुन्हा म्हणाले.
"पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल. तो येथून जाईल, हो. तो घरबशा होणार नाही, खायला काळ व भुईला भार होणार नाही." आई म्हणाली.
"तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल, म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल." वडील आपलेच म्हणणे पुढे चालवीत होते.
शेवटी माझ्याने राहवेना; मी अंथरुणात उठून बसलो व म्हणालो, "भाऊ! मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो. माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही, तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशा मारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता, तरी मी तेथेच राहणार होतो, जाण्यायेण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यांस तेथे राहू देत ना, म्हणून आलो, मी उद्याच जातो. आई! उद्याच मी निघतो."
"त्यांचे नको रे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे. मग जा हो श्याम! माझे वेडीचे ऐक." आई म्हणाली.
"मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ पुन्हा एकदा दहा रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढे कृपा करून द्या. आई! चिंता करू नको. देव तारी, त्याला कोण मारी? ज्याला जगवावयाचे, त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवील, अफाट समुद्रातही तारील!" मी म्हटले.
"तू तरी त्यांचाच ना मुलगा! तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल! जा, बाबांनो! कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले-माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही, काही समजत नाही, चांगली सोन्यासारखी पोरे नेतो. आम्हांला रडावयाला राखतो!" असे आई रडत म्हणाली.
                            रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, "माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही, तर महिन्याभराने जावेच लागणार ना? तू परवानगी दे." शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका कधी धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते. स्वातंत्र्य देणारे होते.
                            वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार! बापलेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती.
मी आईच्या पाया पडलो. वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला.
मी गाडीत बसलो. गड्यांनो! आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन! त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात मी पाहिली! आईला मी त्या वेळेस कायमची सोडीत आहे, तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे, अशी मला कल्पनाही नव्हती.
परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवावयाचे होते. दुसरे काय!



********************************************************************************************
 रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी           अनुक्रमणिका         रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही!
********************************************************************************************

रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही!

"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस?" भिकाने विचारले.
"आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले." गोविंदा म्हणाला.
इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. "अलिकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे." राम म्हणाला.
"सर्व सिद्धीचे कारण
मन करा रे प्रसन्न"
 असा तुकारामाचा चरण आहे.
"श्याम कोठे गेला आहे, गोविंदा?" रामने विचारले.
"ते मघा तर वरती होते." भिका म्हणाला.
"ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे, म्हणतात." गोविंदा म्हणाला.
"काय एकेक नाव? ऐलाबाई हे काय रे नाव?" भिकाने विचारले. "अरे, ऐलाबाई, म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो." राम म्हणाला.
त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला.
"काय रे करता गोविंदा?" श्यामने विचारले.
"काही नाही. ती ऐलाबाई कशी आहे?" त्याने विचारले.
"तिला गावाला पाठविली त्यांनी." श्याम म्हणाला.
"बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत." भिका म्हणाला.
"कोणाला माहीत? आपण तरी काय करणार?" श्याम म्हणाला.
"भिका! आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते." भांड्याकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला.
"जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते." भिका म्हणाला.
"का? आजचे पेळू चांगले नाही का झाले?" श्यामने विचारले.
"त्यांत पुष्कळ कचरा राहिला आहे." गोविंदा म्हणाला.
"माझे तर सूत तुटत नव्हते." श्याम म्हणाला.
"तुमचे पेळू पहिले असतील." भिका म्हणाला.
"नाही, रे; आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविलेले पेळू मी माझ्या पुडीत ठेवले होते."
"मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे मी सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल, म्हणून बदलले होते." गोविंदा म्हणाला.
"श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही." राम म्हणाला.
"झोप येत नाही, तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो." श्याम म्हणाला.
"झोप न यायला काय झाले? आम्हांला बरी झोप येते?" राम म्हणाला.
"तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसा तप करावे लागते. शरीर झिजवावे लागते." श्याम म्हणाला.
"तू नाही वाटते काम करीत? सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास." राम म्हणाला.
"परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये, असे तुम्हांला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ?" श्यामने विचारले.
"तुला बरे वाटत नव्हते, म्हणून काम करू दिले नाही, त्यांनी." राम म्हणाला.
"लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे." गोविंदा म्हणाला.
                            घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात साऱ्याचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारळ्यात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुद्धा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे. काय करील बिचारी! अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या-मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी.
त्या वेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते. परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राम्हणवस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता.
                            आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीणबाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखादे वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, "राधाताई! तुमच्याकडे काही काम असले, तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन. मला थोडी मदत होईल." राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय? परंतु करील काय? वडील पहाटे उठून बाहेर गेले, की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण दळून टाकी. "श्याम असता येथे तर सारे दळून टाकता." असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो, हे आठवून ती रडू लागे. दळता-दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत, त्यांतून आई तेल, मीठ आणी व क्षणाचा संसार सुखाने करी.
                            दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना! एक काळ असा होता, की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्या वेळेस लागत असत; परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करावयाची? आई त्या पेन्शनरीणबाईला म्हणाली, "तुमचे धुणेबिणे सुद्धा मी धुऊन दिले, तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा."
                            त्या पेन्शनरीणबाईची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, "आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला न्हाऊमाखू घालीत जाल का?"
आई म्हणाली, "हो. आनंदाने करीन. मला हो काम आवडते. मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे."
                            आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावावयाला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठरविली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे, असे आईला वाटे. त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल, लुबलुबीत टाळूवर तेल घालून "तो तो तो! बाळाची बायको यो यो यो!" असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई न्हाऊमाखू घालू लागल्यापासून त्या मुलाला बाळसे धरले; ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडाथोडा तजेला येऊ लागला.
                            राधाताईची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले. "दोन कशाला? एक पुरे, हो!" आई म्हणाली.
"घ्या, हो, यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो."
आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. "देवा! माझी लाज सारी तुला!" असे ती म्हणाली. दोन रुपयांतून तिने थोडे तेल, थोडे तूप आणविले, एक नारळ आणविला. थोड्या करंज्या व चार अनरसे तिने केले. दिवाळीच्या चार दिवसांत बाहेर दोन दिवल्या लाविल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळिले. चार आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटुकनळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली, तर पारिंग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही.
                            परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली-गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे. तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमाने घोरिवड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले, तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदीकुंकू वाहताना आई म्हणाली, "तुळसादेवी! माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा."

रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे

रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे

श्यामने आरंभ केला.

                            शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा, असा निकाल देण्यात आला.
त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती! आईला दोन दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. "आई जगदंबे! शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना? या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची! माझे प्राण ने ना ग आई! नको हा जीव!" अशी ती प्रार्थना करीत होती.
पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती.
                            सकाळी नऊ वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून "आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे," वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी. दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते.
                            महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत.
                            "पुर्षाच्या घराची जप्ती होणार, ढुमढुमढुम!" असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, "मी घरी जाऊ का?"
मास्तर म्हणाले, "कोठे चाललास? बस खाली! अर्ध्या तासाने शाळाच सुटेल." मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयातील कालवाकालव समजली का नाही?
                            दहा वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या "ढुमढुमढुम" करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला.
                            "आई! सारी मुले मला चिडवतात! का ग असे? म्हणतात, "तुझ्या घराची जप्ती होणार. शेणाचे दिवे लागणार." आई! सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणांस येथून बाहेर काढणार का ग? आई! काय ग झाले?" असे आईला विचारू लागला.
                            "बाळ! देवाची मर्जी; मी तरी काय सांगू तुला?" असे म्हणून पडल्यापडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. मायलेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, "जा बाळ; हातपाय धू; आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे."
लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला.
                            त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले. देवाची पूजा केली. लाज वाटत होती, तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारीत नव्हते! ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली, तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसेबसे अब्रूने दिवस काढले होते; परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या, आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छीत होता. संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत. अमावस्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती.
                            दुपारी पोलिस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकविली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणिमंगळसूत्र काय ते राहिले होते. होते नव्हते, ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले. सील केले. आम्हांला राहावयाला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या.
                            ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप! आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली. "आई आई!" असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, "ज्याला भीत होत्ये, ते शेवटी झाले! आता जगणे व मरणे सारखेच आहे!"

रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार

श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता.
"श्याम! पाय चेपू का?" गोविंदाने विचारले.
"नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार! राम राम म्हणत मी शांत पडून राहीन." श्याम म्हणाला.
"श्याम! कोणी आजारी पडले, तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला, तर त्याच्याजवळ नको का बसायला?" रामाने विचारले.
"अरे, इतका का मी आजारी आहे! तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो, तरी पोटभर जेवलो, असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे, असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात, काही वातबीत झाला, तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात, तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा!" श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले.
सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता.
सुचो रुचो ना तुजवीण काही
जडो सदा जीव तुझ्याच पायी
तुझाच लागो मज एक छंद
मुखात गोविंद हरे मुकुंद
तुझाच लागो मज एक नाद
सरोत सारेच वितंडवाद
तुझा असो प्रेमळ एक बंध
मुखात गोविंद हरे मुकुंद
"काय रे? आतासे आलात?" श्यामने विचरले.
"तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट?" एका लहान मुलाने विचारले.
"हो, सांगेन. तुम्ही या." श्याम म्हणाला.
"पाहा, तुम्हांला छानछान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो." एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले.
"खरेच, किती सुंदर आहेत हे! या, आपण त्यांची चित्रे करू. मी पोपट करतो हां!" असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला.
मुले एकेक खडा देत होती.
"आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा," श्याम म्हणाला.
"हा घ्या, हा पाहा चांगला आहे." एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लाविला व सुंदर राघू तयार झाला.
"आता मोर बनवा मोर." दुसरा एक मुलगा म्हणाला.
"तुम्हीच बनवा मोर." श्याम म्हणाला.
"आम्हांला चांगला येत नाही." तो म्हणाला.
"पण आता तुम्ही घरी जा. लौकर जेवून या." श्यामने सांगितले.
"चला, रे, जेवण करून येऊ." एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली.
श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला. या लहान खड्यांत किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती.
गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले.
"श्याम! काय आहे तुझ्या हातांत? फूल का?" रामने विचारले.
"अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो." श्याम म्हणाला.
"मग काय आहे हातांत?" नामदेवाने विचारले.
"देवाच्या मूर्ती." श्याम म्हणाला.
"तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला?" भिकाने विचारले.
"हो, पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहेत." श्याम म्हणाला.
"पाहू दे, कसली आहे?" असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक-मोत्ये बाहेर पडली.
"हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात, समुद्राच्या तळाशी मोत्ये असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोत्ये दिसतात. पाहा रंग कसे आहेत!" असे म्हणून श्याम दाखवू लागला.
"श्याम, आज बोलणार ना तू?" रामने विचारले.
"हो, त्या मुलांना मी सांगितले आहे, जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता दोन ताससुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना?" श्यामने विचारले.
प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरूण घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला.
जप्तीच्या वेळी आमची दूर्वांची आजी घरी नव्हती. ती कोठे गावाला गेली होती, ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार! आजीला होईल तेवढं आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत. कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकीवयनी, नमूमावशी वगैरे येत असत.
परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार? आई जे दोन रुपये मिळवीत होती, ते आता बंद झाले. वडील आले, म्हणजे दूर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे.
"मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा? चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचे खांड नाही; भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही. का नुसता भाजीभात उकडून वाढू?" दूर्वांची आजी बोलत होती.
माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, "नुसते तांदूळ उकडून आम्हांला वाढ, द्वारकाकाकू! आमची अब्रू गेलीच आहे. ती आणखी दवडू नका."
                            त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली, "पुरुषोत्तम! तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये; नाहीतर इंदूलाच मी बोलावत्ये, म्हणून सांग. तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण."
पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली.
"यशोदाबाई! जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा?" ती प्रेमळ मुलगी म्हणाली.
"नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला. तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे, म्हणून लिही. कसे लिहावे, ते तुलाच चांगले समजेल." आई म्हणाली.
इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली.
"बाळ, पाणी दे रे!" आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. "चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर." असे आईने सांगितले. आईने सांगितले, तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले.
"या जानकीबाई, या हो, बसा." जानकीबाई समाचाराला आल्या होत्या.
"पाय चेपू का जरा?" त्यांनी विचारले.
"चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले." आई म्हणाली.
"आवळ्याची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल." जानकीबाईंनी विचारले.
"द्या तुकडा आणून." क्षीण स्वरात आई म्हणाली.
"चल पुरुषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो आईला आणून दे." असे म्हणून जानकीवयनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता.
"जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?" असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली.
पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला.
                            तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी-बोरखड्याने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती. एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिलासुद्धा मधूनमधून बरे नसे.
"ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आहे?" आईने नमूला विचारले.
"बरे आहे. चाफ्याच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण, तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला?" नमूमावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली.
"नमू, तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल, त्याच्या बरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारकाकाकू ओरडते. तुला सारे समजते. मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले." आई म्हणाली.
"बरे हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर." नमू म्हणाली.
"आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहाळे तेवढे पुरेत." आई म्हणाली.
"तिन्हीसांजचे असे नको ग बोलू. उद्या की नाही, तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन. खाशील ना?" नमूमावशीने विचारले.
"नमू! डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजिरवाणे हे जिणे!" आई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली.
"हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का?" नमूने विचारले.
"महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रुपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रुपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल." आई सांगत होती.
"श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे?" नमूने विचारले. "त्याला कळवू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ? येथे आला, म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे; परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो, म्हणजे झाले. माझे काय?" आई म्हणाली.
                            नमूमावशी निघाली. "कुंकू लाव, ग. तेथे कोनाड्यात करंडा आहे." आईने सांगितले. नमूमावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली.
"आई! हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले. वाचू मी?" असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली.
"इंदू! उद्या येणार हो सखू. तू पत्र लिहिले होतेस ना! हे बघ तिचे पत्र. दे रे इंदूताईला." आई पुरुषोत्तमास म्हणाली.
इंदुताईने पत्र वाचले व ती म्हणाली, "मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे, की केव्हा त्यांना बघेन." इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. "पुरुषोत्तम! चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल." इंदू म्हणाली.
"जा बाळ, त्या परक्या नाहीत, हो." असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला.
"माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला-प्यायलाही मला देता येत नाही. मी अभागी आहे, काय करू मी तरी?" वडील आईजवळ बसून म्हणत होते.
"हे काय असे? तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलेत, तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे? पुरुषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. तुमच्या जिवावर मी पूर्वी उड्या मारल्या. सारी सुखे भोगली. वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत चार कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही, तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहा. तुमच्या डोळ्यांत मी येऊन बसेन हो." असे आई बोलत होती.
"तू सुद्धा बरी होशील. सखू येत आहे, ती तुला बरी करील." वडील म्हणाले.
"कशाला खोटी आशा आता! आतून झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हातांनी मी जाईन. सुवासिनी मी जाईन. तुम्हांला कोण? म्हणून फक्त वाईट वाटते; नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात." असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता.
"पाणी, थोडे पाणी द्याना तुमच्या हाताने." आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले.
"तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा; अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ नका कोठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो." असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन, आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे, पावन असे ते दृश्य होते.
इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या.
"या. इंदूच्या आई, या." म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरविला. केस जरा सारखे केले. "पहाटे येणार वाटतं तुमची बहीण?" त्यांनी विचारले. "हो पत्र आले आहे. इंदूने वाचले." आई म्हणाली.
"तिनेच सांगितले. बरे होईल. प्रेमाचे माणूस जवळ असले, म्हणजे बरे वाटते." राधाताई म्हणाल्या.
"सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहेत, तुमचा शेजार आहे, आणखी काय पाहिजे?" आई म्हणाली.
थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या.
                            मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली, असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही. परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली.
"आपल्याच बेड्याशी थांबली रे!" आजी म्हणाली. दूर्वांची आजी पोतेरे घालीत होती. पुरुषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय. मावशीच आली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला.
"आई, मावशी आली ना! ही बघ, खरेच आली." आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला, पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते.
"आली? माझी वाट मोकळी झाली!" असे आई म्हणाली. अर्धवट शुद्ध, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती! आईची दशा पाहून, तो अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले.
"अक्का!" मावशीने हाक मीरली. त्या हाकेत, त्या दोन अक्षरांत मावशीचे प्रेमळ व उदार अंतःकरण ओतलेले होते.
"आलीस सखू, बस. तुझीच वाट पाहत होत्ये. म्हटले, केव्हा येतेस! पण आलीस लौकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं, तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन. सखू!" आई रडू लागली.
"अक्का! हे काय वेड्यासारखे. मी आल्ये आहे. आता बरी होशील हो. तुला बरे वाटू दे; मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन. आता मला नोकरी लागली आहे." मावशी म्हणाली.
"नको हो आता कोठे येणे-जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे. या मठीतच कुडी पडू दे. मी आग्रह करकरून झोपडी बांधविली. ही स्वतंत्र झोपडी बांधविली. येथेच, माझ्या राजवाड्यातच देह पडू दे. त्यांच्या मांडीवर, तू जवळ असता, मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगो, असे म्हणतात, ते खरे ठरो. सखू! तुला ना मूल, ना बाळ. तुझा संसार देवाने आटपला; जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो!" आई बोलत होती.
"अक्का! हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पड. मी थोपटते हं." असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लअँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते.
मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते.

रात्र एकोणचाळिसावी : सारी प्रेमाने नांदा

                            श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती. "सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी, ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला, तर कोलनवॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेणकापडावर कागद घालून त्यावरच आईला शौच करावयास ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणे शक्य होते, तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ते गाळून घेई; नाहीतर लोणी यावयाचे. असे ते अदमुरे ताक मावशी आईला द्यावयाची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून पुरवून त्यांचा रसही ती देत असे. साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती, अशी मावशीने ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले; परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ व सेवा! अत्यंत निरलस व व्यवस्थित.
"ती मथी सारखी म्यांव म्यांव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास?" आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते. मथी दुधाणीला कधी तोंड लावीत नसे. तिला थेंबभर दूध घातले, म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे.

                            "अक्का, तिला भात घातला; परंतु ती नुसते तोंड लावी. दुधा-तुपाचा भात; परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीरबिंदीर." मावशी म्हणाली.
"नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुकी बिचारी! बोलता येत नाही; सांगता येत नाही." आई म्हणाली.
आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून माझा मोठा भाऊ चार दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीने चार दिवसांची रजा मिळाली.
                            आईला पाहून त्याला भडभडून आले. "आई! काय, ग, ही तुझी दशा! तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई! आम्ही तिकडे खुशाल खात होतो; परंतु तुला घास मिळत नव्हता!" असे म्हणून तो रडू लागला. धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पिटली, ते सारे त्याने सांगितले. दादाचे हृदय दुभंग झाले.
                            आई म्हणाली, "चाललेच आहे. बाळांनो, या देहाला चांगले दिले काय, वाईट दिले काय, जोपर्यंत देवाला यंत्र चालवावयाचे आहे, तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतो. तू पाच रुपये पाठविलेस, मला धन्य वाटले. तू एकोणीस रुपयांतून त्यांना पाच रुपये पाठविलेस-खरेच मूठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनीऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हांला तयार करणे एवढेच माझे काम! तुम्ही गुणी निघालात-चांगले झाले. तुम्हांला पैसे मिळोत वा न मिळोत; तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे-आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे; ह्या पुरुषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या. परस्परांस विसरू नका." आई जणू निरवानिरव करीत होती.
                            "आई! मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची ती नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल, तर नोकरी कशाला? आई! मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई! तुझे पाय, तुझी सेवा यांतच माझे कल्याण, माझे भाग्य, माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई! तू सांगशील, तसे मी करीन. राजीनामा मी लिहून आणला आहे. देऊ का पाठवून?" दादा गहिवरून बोलत होता.

                            आई विचार करून हळूच म्हणाली, "गजू! सध्या सखूमावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव. त्यांना पाच रुपये पाठवीत जा. दोन पाठविलेस, तरी चालतील. परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही. तितके माझे भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले, तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ."
दादा परत मुंबईस जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन, अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून, डोक्यावरून आपला कृश हात, प्रेमाने थबथबलेला हात फिरविला, तो मंगल हात फिरवला. "जा, बाळ; काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे, असेच पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकांस कधी अंतर देऊ नका!" आईने संदेश दिला.
जड अंतःकरणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला, संसार मोठा कठीण, हेच खरे.