रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण

                            मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार-रविवारीसुद्धा मनात आले, तर मी घरी जाऊन यावयाचा. परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे. त्या वेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता.

                            देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काही तरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वांत चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद? पैसे कोठून आणावयाचे? परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला.
कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे. पौष्टिकही आहे. कांद्यात फॉस्फोरस आहे, असे डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू. कारण नेहमी कांदा असेच. कांदा-भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला! शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यांस कांद्यापासून अपाय नाही. परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे.
कांद्याचे गुणधर्म काही असोत. माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदेपाक फार थंड असतो, असे सांगतात. आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली.
मी एक दिवस आईला म्हटले, "आई! आम्हांला कधी पाकातला कांदा देऊ नकोस, हो. मी तुझा नावडताच मुळी. दादाला कांदे नि बिंदे. त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हांला काही नाही. आम्ही जवळचे ना! आम्ही नेहमी घरी येतो. आम्हांला कोण विचारतो! जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे. आहे, बोवा! दादाची मात्र चमाण आहे. मला तरी देवी आल्या असत्या, तर बरे झाले असते! मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही-दूध, मिळाले असते गाईचे तूप!"

                            माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते. परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खट्याळ, खोडसाळ तो नव्हता. शांत व धीमा होता. समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो, तसा तो आत दुःखाने, अपमानाने जळे; परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे. तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे. स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या, असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, "खरेच, आई, मला एकट्याला खायला लाज वाटते, हो. उद्यापासून मला देऊ नकोस. साऱ्यांना देणार असशील, तरच मला दे. देवी बऱ्या झाल्या. आता काय? बरणीत आहे, तो चार दिवस आम्ही सारी मिळून खाऊ."
आई म्हणाली, "अरे, तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात. श्याम! असे, रे, काय घालून पाडून बोलतोस! अरे, त्याच्या तळपायांची, डोळ्यांची सारखी आग होत असते, रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही, हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा, म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे, मला का नाही देवी आल्या? श्याम, अरे, असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे; तर तुला नसती भुते आठवतात. असे करू नये. श्याम, तू का आता लहान आहेस? मग पोथ्या-पुराणे कशाला, रे, वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे-भरताचे किती प्रेम! उगीचच वाचायचे वाटते? काही त्यातला गुण घ्यावा. तुझाच ना तो भाऊ, का कोणी परका आहे? अरे, परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल, तर द्यावे. तू घरी आलास, म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत? कढत पाणी देत? तू घरी आलास, म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळीपाकाच्या वड्या, नाही तर दुसरे काही तरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पहाणार! असे नको हो करू श्याम!"
दादा आईला म्हणाला, "आई! तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हांला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून?"
आई म्हणाली, "जा रे, श्याम, फाळके काढून आण. सुर्याचे पाने नको हो कापू! ते पानकापे घे व वरची पाने काप, जा."
मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या. पाने नीट कापून घरी आणली. "अण्णा! टाटोळा मला वाजवायला दे. मी फटफटे करीन." बाबुल्या म्हणाला.
आई पानग्या करावयास बसली. कढत कढत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते. त्यामुळे फारच छान लागत होती. "अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणीसाखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या!" आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणीसाखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, "श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको, हो, पडायला. ऐकलेस ना, श्याम? आता शहाणा हो."
मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणीशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलाविले, मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, "दादा! त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या अंगातून रक्त काढतोस?"
दादा म्हणाला, "मग विटीदांडू खेळावयास येतोस?"
"माझे अडले आहे खेटर! मी नाही येत जा!"
फणकाऱ्याने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते; परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहात होतो! ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही, तो झाडावर काय करणार!

                            दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हातांनी कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्षे झाली, तरीही त्याच्या तळव्यांची आग होते; मग त्या वेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहात होता; मुकेपणाने मला बोलावीत होता. परंतु त्याच्या पायांवर पाय द्यावयाचे नाहीत, असे मी ठरविले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला, "श्याम! देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते, हो. रोज रोज तरी तुला किती सांगावयाचे? पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस, म्हणून सांगतो. दे रे जरा."

                            दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात. त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्या वेळेस मी ठरविले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही.

                            आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुऊन आली. मी जागचा हललो नव्हतो, हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, "गजू! मी देते हो, तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ सख्खे दाईद पक्के!" असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी-खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती; परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये, म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई! मोठ्या मनाची आई! एक शब्दही मला ती बोलली नाही; माझ्यावर रागवली नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले, "आई! तू जा. मी देतो पाय. आई, हो ना दूर."
आई म्हणाली, "द्यायचे असतील, तर नीट हळूहळू दे. धसमुसळ्यासारखे नको देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे. मग खेळायला जा. श्याम! तुझाच ना तो भाऊ?" असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली.

                            माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला, तसतसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवणे झाली. आईचे उष्टेशेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येताजाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती. परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो! दूर्वांची आजी, आईसुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकीवयनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, "आई! तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. 'पडला अभिमन्यू वीर रणी, चक्रव्यूह रचिला द्रोणांनी, पडला अभिमन्यू!' म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता, ते शोधावयास जातात; मुखाने 'कृष्ण कृष्ण' असा मंजुळ जप अभिमन्यू करीत असतो, त्या मंजुळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल, असे त्यांना वाटले. कसे छान आहे गाणे! आई! म्हण ना, ग!"
आई म्हणाली, "आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मीही पुष्कळ दिवसांत ऐकले नाही." आईने आजीस सांगितले.
दूर्वांच्या आजीला पुष्कळ गाणी येत असत, म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले, काही तरी 'पर्ह्यातली पातेरी कोण हुक् करी', अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पीतांबराचे तरी आजी म्हण, असे म्हटले.
आई म्हणाली, "श्याम! ऐक तर खरे. त्या चिंधीच्या गाण्यात पीतांबर पैठण्याच आहेत."
आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हालवून गाणे म्हणे, भावनामय होऊन गाणे म्हणे, विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे-ध्रुवपद असे होते.

'द्रौपदीसी बंधु शोभे नारायण'
हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप; म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व, अद्वैत आहे, असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही 'कृष्णा' नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर-सुभद्रेवर प्रेम कमी; परंतु द्रौपदी-ही मानलेली बहीण-हिच्यावर जास्त. असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे.
प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रम्हवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकांत म्हणजे सुर, नर, असुर या निन्ही लोकांत-सात्त्विक, राजस व तमस; श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा तरी दूर कर, कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले, तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असावयाचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे. कारण ते निःस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत.

                            या वेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमालिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, "देवा! आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निःपक्षपाती, असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, 'नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टी नि काय?' मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे. तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का, ते सांग."
कृष्ण म्हणाला, "नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील, तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे; परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही, त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली, त्यांच्या घरात वारा शिरला. त्यांच्या घरात प्रकाश शिरला, जितके दार उघडाल, तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसेच माझे. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. 'लोकी निःस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी' हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का? हे बघ, मी सांगतो, तसे कर. सुभद्रेकडे धावत-पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली, तर घेऊन ये. तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग."
नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, "ये रे नारदा! प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रम्हलोकी, पाताळात, कोठे काय पाहिलेस, सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस. तुला नारदा, कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस, अरे, एवढी घाई काय आहे?"
नारद म्हणाले, "सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. भळभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे."
"नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पीतांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू. हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मौल्यवान पैठणी. नारदा! चिंधी नाही, रे!" असे सुभद्रा म्हणाली.
"बरे तर, मी द्रौपदीताईकडे जातो." असे म्हणून नारद निघाले.
द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. "ये नारदा! हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे, म्हणून आलास नाही रे? याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावयाचे! पण माझा कृष्ण सारा लुटू नका, हो. मला ठेवा थोडा."
"द्रौपदी! थट्टा करावयाला वेळ नाही, बोलावयाला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. एक चिंधी दे, आधी." नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला.
"खरे का, नारदा! कितीसे रे, कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरेरे!" असे म्हणून नेसूचा पीतांबरच फाडून तिने चिंधी दिली.
भरजरी ग पीतांबर दिला फाडून
द्रौपदीस बंधू शोभे नारायण
माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की, मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढायचे विसरून गेलो होतो.
गाणे झाले. मला आई म्हणाली, "श्याम! आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट?"
आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, "आई! आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितलेस, ते ओळखू?"
"ओळख बरे. तू का मनकवडा आहेस?" आईने म्हटले.
मी म्हणालो, "आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना. तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावयाचे होते. होय ना? मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितलेस. खरे, की नाही सांग."
आई म्हणाली, "होय. तुला लाजविण्यासाठी नाही; तर तुला प्रेम शिकविण्यासाठी."
मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले "दादा! आजपासून मी तुला 'नाही' म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन. भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर."
दादा म्हणाला, "श्याम! हे काय रे? क्षमा नि बिमा कसची मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग. तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे, हेही मला माहीत आहे. आई! आम्ही कधी एकमेकांस अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो, तरी फिरून एकमेकांस मिठी मारू."
आई म्हणाली, "तुम्ही परस्पर प्रेम करा. त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद."


********************************************************************************************
 रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय          अनुक्रमणिका         रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय
********************************************************************************************

रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय

                            आमच्या घरात त्या वेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खर्वस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली.

                            "श्यामला खर्वस पाठविला असता, कोणी येणारे-जाणारे असते तर!" आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, "कोणी येणारे-जाणारे कशाला? मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खर्वस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील?"
"त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खर्वसाने भरलेले घेऊन जावे." आई म्हणाली.
आईने सुंदर खर्वस तयार केला. खर्वसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले.

                            शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत.

                            मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती. कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती. कोणी खेळत होती, कोणी झाडाखाली रेलली होती, कोणी वाचीत होती, तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होती; शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी, यांसारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूस एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस; तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत.

                            आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले "श्याम, अरे श्याम" अशी हाक मारत आली. त्यांतील एकजण मला म्हणाला, "श्याम! अरे, कुणीतरी तुला शोधीत आहे. आमचा श्याम कोठे आहे, अशी चौकशी करीत आहे." इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही.
मी विचारले, "भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो." वडिलांचा तो कसातरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांत मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखांचे कळू लागले होते. सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही! मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतरदृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भल्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची, जीवनाला सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे.

                            सहा कोस वडील चालून आले. का आले? तो खर्वस, ती एक खर्वसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात! हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खर्वस दिला असता तर? एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर? शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा, असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा?

                            परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजीत होते, म्हणून थोडेतरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्या वेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत, माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावीत होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे, ओसाड नाही, रूक्ष, भगभगीत नाही.

                            मुले मला हसतील. "ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट!" असे म्हणून चिडवतील, ह्याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे जण 'अहं वेद' असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे 'अहं!' सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू, सारे आपलेच. आपणांस म्हणून मोठे होता येत नाही. जो स्वतःस विसरू शकत नाही, तो काय प्रेम करणार?"
वडील म्हणाले, "श्याम! तुझ्या आईने तुला खर्वस पाठविला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या." त्यांनी खर्वसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, "श्याम! अरे, बघत काय बसलास? टाक उरकून! लाजायला काय झाले? या, रे मुलांनो! तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खावयाला लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी नयेच खाऊ. चारचौघांना द्यावे." इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. "ये रे श्याम! या रे आपण फन्ना करू. फडशा पाडू." असे तो म्हणाला. आम्ही सारे खर्वसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो, तर म्हणाले, "तुम्हीच खा. मुलांनीच खाण्यात गंमत आहे."

                            आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, "झाला, रे, खाऊन? आण ते भांडे. मी नदीवर घासून घेईन." ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, "अभ्यास नीट कर, हो. प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे." असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो.
                            मला माझी शरम वाटत होती; अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे, असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली; परंतु रुखरुख लागून राहिली. सहा कोस केवळ खर्वसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई! या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीणभावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन, तर त्यानेच थोडे अनृणी होता येईल. येरव्ही नाही.


********************************************************************************************
 रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण    अनुक्रमणिका    रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाऊस दे
********************************************************************************************

रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाऊस दे

                            त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला; परंतु मागून पडेना. लावणी झाली होती; परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कोठे काळा डाग दिसतो का, पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी 'जीवन' हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत, त्यांत केवढे काव्य आहे. पृथ्वीला 'क्षमा' हा शब्द ज्याने योजला, तो केवढा थोर कवी असेल! तसेच पाण्याला 'जीवन' हा शब्द ज्याने लावला, त्याचेही हृदय किती मोठे असेल! पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत! पाण्याला अमृत, पय, जीवन, अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते. पाण्याला अमृत नाही म्हणावयाचे तर कशाला? कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंडा, वाळलेल्या झाडाला पाणी घाला, सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू देत. म्हणजे पाहा कशी जीवनाला टवटवी तेथे येते ती. मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे. आई मुलाला दूध देते. परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरेपावेतो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी आहे, असे ऋषी म्हणतो. पाण्यात जीवनशक्ती आहे, तशी कशात आहे? पाण्याचा महिमा कोण वर्णन करील? पुन्हा निरुपाधी! ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही. जो रंग द्याल, जो आकार द्याल, तसे ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचे रूप आहे.

                            त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना. अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा, म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकावयाचा. भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हांडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात. सात दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. सात दिवसच नाही, तर पाऊस पडेपर्यंत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो, त्याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून ते देत. तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत.

                            शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या-त्या ऋषीच्या-डोळ्यांसमोर सर्व ब्रम्हांड आहे, असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्याच्या डोळ्यांसमोरून जात आहे, असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यांसमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे, असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री बारानंतर पाळी येत असे.

आई मला म्हणाली, "जा ना रे देवळात. तू पाणी आणावयास नाही का लागत, जा."
"मला नाही उचलणार हे हंडे. केवढाले हंडे व घागरी!" मी म्हटले.
"अरे, आपली लहान कळशी घेऊन जा. नाही तर तांब्या नेलास, तरी चालेल. विहिरीतून एकेक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा." आई म्हणाली.
"एवढासा तांब्या ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील की, झारी नाही तर पंचपात्रीच घेऊन जा. लोक हसतील तेथे!" मी नाखुशीने म्हटले.
"श्याम! कोणी हसणार नाही. उलट, तू मोठी घागर उचलू लागलास, तर मात्र लोक हसतील. आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईट; परंतु आपल्याला जेवढे करता येईल, तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट. हे साऱ्या गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही, तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. कामचुकारपणा वाईट. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला, तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या. या साऱ्यांची शक्ती सारखी का होती? तू उगीच वाचतोस मात्र. असले नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळेचीही नाही का गोष्ट? मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठेमोठे वानर पर्वत आणीत होते. परंतु ती लहानशी खार. तिला वाटले, आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते. त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिकटत, तिच्या केसांत अडकत, ते सेतूजवळ आणून ती टाकी. तेथे जाऊन ती अंग झाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती, त्याप्रमाणे ती काम करीत होती. तुला हंडा उचलत नसेल, तर कळशी घे. कळशीने दमलास, तर तांब्या आण. त्यानेही दमलास, तर फुलपात्र ने. जा श्याम? किती रे सांगायचे?" आई मला समजावून सांगत होती.

                            शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती, शंकराला कोंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यांत मिळालो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, "श्याम, आज आलास वाटते? तू इंग्रजी शिकतोस, म्हणून लाज वाटत होती वाटते?" मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हेत, हो, संस्कृत नव्हेत, हो. त्यांचे मंत्र मराठीत होते.
"सांब सदाशिव पाऊस दे
शेते भाते पिकू दे
पैशाने पायली विकू दे"
हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतभाते पिकोत, स्वस्ताई होवो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणावयास लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मीही मोठमोठ्याने 'सांब सदाशिव पाऊस दे' म्हणू लागलो; मीही त्या मुलांत मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो.

सामुदायिक कामात आपणांसही जे करता येईल, ते आपण निरलसपणे केले पाहिजे, त्यात लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे. हत्तीने हत्तीप्रमाणे.



********************************************************************************************
 रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय   अनुक्रमणिका   रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी
********************************************************************************************

रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी

                            आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यांतीलच ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हां मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, "श्याम! तुला पाहिजे की काय अंगठी?" त्यांनी असे विचारले, म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे; परंतु एकाही बोटात ती बसत नसे! ती खाली पडे. "अरे, जाडा हो जरा, मग बसेल हो ती." असे मग ते हसून म्हणावयाचे.

                            मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला. परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचीत असे; परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांचा लेखांचा फार परिणाम झालेला आहे. यांतील तेजस्वी, सोज्ज्वल, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केले होते. परंतु त्या वेळेस मला हे भाग मिळाले नाहीत. माझ्या कोणीतरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले, "तुला रे काय समजणार त्यात?" मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता. कारण मी सहृदय होतो. मी कविहृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्या- पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रद्धामय व भावमय झालेले होते. मला वाटले, "आपण भाग विकत घ्यावे." परंतु पैसे कोठून आणावयाचे! वर्गातील पुस्तकेही सारी मजजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो; परंतु एकही कोश मजजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थांचे भाग आपणांस पाहिजेतच, असे मला वाटले.

                            आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक लांबवावी, असे मी ठरविले. दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप होते; परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे, असे मला वाटले! माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवीत होतो.
'आस ही तुझी फार लागली
दे दयानिधे बुद्धि चांगली'
बुद्धि चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवीत होतो; परंतु चोरी करून बसलो होतो! माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक पाच रुपयांची नोट कमी!
"भाऊराव! पाच रुपये कमी भरतात. एक नोट नाही." ते पाहुणे म्हणाले.
"नीट पाहिल्यात का साऱ्या खिशांतून? कोणाला दिली तर नाहीत?"
माझे श्लोक शिकवणे सारे थांबले, चोराला कोठली झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो.
"आई! तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही, वाटते?" मी विचारले. "बाळ, इच्छा कोठे आहे? दोन घास कसेतरी बळेच पोटात दवडावयाचे. दोन धंदे झाले पाहिजेत ना? पाणीउदक करता आले पाहिजे ना? तुम्ही कधी मोठे व्हाल-इकडे लक्ष आहे सारे." आई म्हणाली.
"आई! मी खरेच मोठा होईन. पुष्कळ शिकेन. खूप वाचीन!" मी म्हटले.
"शीक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात, म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत, तरी मनाने चांगले राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील; परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते." आई म्हणाली. ती प्रेमळ, थोर माता किती गोड सांगत होती! माझ्या अशिक्षित आईला असे चांगले चांगले विचार कसे सांगता येत, याचे मला आश्चर्य वाटे. महंमदाला लोक म्हणत, "तू देवाचा पैगंबर असशील, तर चमत्कार करून दाखव." तेव्हा महंमद म्हणाला, "साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत. मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा काय चमत्कार नाही? त्या अफाट सागराच्या वक्षःस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुरीची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का?" असे सांगत शेवटी महंमद म्हणाला, "माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का?" मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आईसुद्धा कळकळीनेच मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते. हृदयगाभार्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी श्रुतिस्मृती होती.
                            "मोठा नाही झालास, तरी गुणी हो." थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो! इंग्लंडात ट्यूडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडेतिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे, की, "त्या वेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते." कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यातसुद्धा विंचू आहेत. ते तुम्हांस झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात, तरी ते गुप्त दूत आहेतच. सदसद्विवेकबुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे.
"घरात तर कोणी आले नाही. चमत्कारच म्हणावयाचा!" वडील म्हणाले.
"श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा यांशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम! अरे श्याम!" बळवंतरावांनी हाक मारली.
मी गेलो. "काय?" मी विचारले. बळवंतराव म्हणाले, "श्याम! तुझा कोणी मित्र वगैरे आला होता रे? एक नोट नाहीशी झाली आहे."
मी म्हटले, "नाही, बोवा. मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते."
वडील म्हणाले, "श्याम! तू तर नाही घेतलीस? घेतली असलीस तर सांग."
"छे, हो! तो कसा घेईल?" बळवंतराव म्हणाले.
आई हात धुऊन आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपुट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारले, "श्याम! अगदी खरेच नाही ना घेतलेस पैसे तू? कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपासपेटीसाठी पैसे मागत होतास."
आई म्हणाली, "श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला रुसला, तरी कोणाच्या वस्तूस हात लावावयाचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले, तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होतीन् त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, "मी घेतली हो, आई." श्याम घेणार नाही व घेईल, तर कबूल करील. "श्याम! तू नाही ना बाळ हात लावलास?"
आईचा माझ्यावर केवढा विश्वास! "आधी घेणार नाही. घेईल, तर कबूल करील." तिची माझ्यावर केवढी श्रद्धा! आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे
'विश्वासाची धन्य जाती' - ज्याच्यावर विश्वास टाकता येतो, त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझा असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला.

                            माझ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप-पर्वत पडला. "श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीस घ्यायचास. मला माहीतच आहे. उगी!"असे आई म्हणाली.
आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाणे रडत आईला म्हटले, "आई तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, आई!"
माझ्याने बोलवेना. आईला वाईट वाटले. "माझा मुलगा घेणार नाही!" केवढा तिचा विश्वास! स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला; परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रू राखली. "घेणार नाही; परंतु घेईल तर कबूल करील." तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही; परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला.
"श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. उगी!" आईने माझी समजूत घातली.
बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला एक रुपया दिला; परंतु तोही मी आईजवळ दिला.
"श्याम! तू का रे घेतले होतेस ते पैसे?" आईने विचारले.
"आई! मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी!" मी म्हटले.
"अरे, पण पहिलीच्या पुस्तकात 'चोरी कधी करू नये', असे वाचलेस, ते तर अजून शिकला नाहीस? मग आणखी दुसरी पुस्तके कशाला?" माझी आई बोलली; परंतु ते बोलणे फार खोल होते.
गड्यांनो! पतंजलिच्या भाष्यात, म्हणे एक असे वाक्य आहे, की "एकः शब्दः सम्यक् ज्ञातः स्वर्गे लोके कामधुग्भवति!' एकच शब्द; परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल, तर मनुष्याला मोक्ष मिळतो. "सम्यक् ज्ञातः" नीट समजलेला; वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले, ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते, कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, "लाव, लाव हात!" ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवितो, तेच ज्ञान.

                            "चोरी करू नये" हे वाक्य मी पढलो होतो; परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम अहिंसा, ब्रम्हचर्य-लहान शब्द. आपण पटकन ते उच्चारतो; परंतु त्यांची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत!


********************************************************************************************
 रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाऊस दे  अनुक्रमणिका   रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस... मनाने
********************************************************************************************

रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस... मनाने

                            मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे! नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. "गंधवती पृथ्वी" या वचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला.
                            घरून दापोलीस येताना या वेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, "तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको धरू हट्ट." मित्रांनो! माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसांत धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते. जाकिटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरांत तर विचारूच नका. परंतु खेड्यांतूनही कितीतरी कपडे लागतात. वारा, प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल, तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो! परंतु त्या सृष्टिमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणांस जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, "जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात." रशियातील मुले फार थंडी नसली, म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवीत आहे.
माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला दोनतीन गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा, असे मी ठरवून आलो होतो; परंतु पैसे कोठून आणावयाचे?

                            माझे वडील कोर्ट-कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्र्य येत होते, तरी कज्जेदलाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट-कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही. स्वतःचे संपले, तर दुसऱ्याचे खटले चालवावयास ते घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला, तर मला इतके पैसे; खटला फसला, तर झालेला खर्च सारा माझा." असे सांगून खटला चालविण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत.
                            वडील दापोलीस आले, म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे. खाऊच्या पैशातील एक पैही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरविले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेशचतुर्थीला तीन महिने होते. तेवढ्या महिन्यांत या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता, गणेशचतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असे मी मनात निश्चित केले.
ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेशचतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ एक रुपया दोन आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील; परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईन.

                            मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. दोन वार कापड घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला.
                            तो कोट हातात घेतला, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात; परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले.
                            मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो, ते म्हणाले, "पावसापाण्याचा जाऊ नकोस. नदीनाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्ह्या, सोंडेघरचा पर्ह्या यांना उतार नसेल; आमचे ऐक." मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता, तर नदीनाल्यास थोडीच भीक घालणार!
                            नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते, तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल, या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसा बाहेर आलो, देवाला माहीत! माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला! तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्याइतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो.

                            रस्त्यावरील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड् कडाड् आकाश गरजत होते. विजा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत हेते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो.
                            शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. "आई!" मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते.
"अण्णा आला, आई, अण्णा!" धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले.
"इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?" आई विचारू लागली.
"सोंडेघरच्या पर्ह्याला पाणी नव्हते का रे?" वडिलांनी विचारले.
"हो! परंतु मी आलो कसातरी!" मी म्हटले.
"त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून!" वडील म्हणाले.
"गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ. कढत पाण्याने आंघोळ कर." आई म्हणाली.
मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते, की काही तरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो.
परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट! तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते! ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती.
"अण्णा हा लहानसा कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे?" धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला.
"मग सांगेन. घरात जा घेऊन." मी म्हटले.
"आई! हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलान्. होय, आई?" धाकटा भाऊ आईला विचारू लागला.
आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो.
आई म्हणाली, "श्याम! हा कोणाचा कोट?"
"मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठविला असेल!" वडील म्हणाले.
"नाही. हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे." मी म्हटले.
"पैसे, रे, कोठले? कोणाचे कर्ज काढलेस? का फीचे दवडलेस?" वडिलांनी विचारले.
"कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?" आईने कातर स्वरात विचारले.
"आई! त्या दिवशी तू सांगितले होतेस "हा पहिला व शेवटचा हात लावलेला." ते मी विसरेन का? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत." मी म्हटले.
"मग उधार का शिवून आणलास, श्याम?" वडिलांनी विचारले.
"भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा, दोन आणे देत असा; ते मी जमविले. गेल्या दोन-तीन महिन्यांचे सारे जमविले. त्यांतून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, "तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट." मी मनात ठरविले होते, की गणपतीला नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का?" मी म्हटले.
"अण्णा! हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा! आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई, बघ!" पुरुषोत्तम आईला दाखवू लागला.
                            मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली, "श्याम! तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस; परंतु मनाने मोठा आजच झालास, हो. हेच प्रेम, बाळांनो, पुढेही ठेवा. या प्रेमावर, देवा, दृष्ट नको कुणाची पाडू!"
वडिलांनीही माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या.
"आई, याला कुंकू लावू?" पुरुषोत्तमाने विचारले.
"बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून, देवांना नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणायला जा, हो." आई म्हणाली.



********************************************************************************************
 रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी     अनुक्रमणिका     रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ
********************************************************************************************

रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ

                            राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात, असे नाही; तर चांगल्या गोष्टींचेही असतात.

                            "श्याम! आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम! तू ज्या आठवणी सांगतोस, त्या असतात साध्या; परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले; तसे तुझ्या या लहान गोष्टींत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम! काल मी रामजवळ म्हटले, की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टीरूपाने तू धर्म सांगत आहेस; धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणांस ओतता येईल, हे तू दाखवीत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीणभावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम! तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले! त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास. त्या वेळेस मला गहिवरून आले होते. श्याम! आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही?"
                            "राजा! अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे; तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो, तेव्हा संगीतगायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने व कळकळीने भरून काढतो. राजा! मजजवळ दुसरे काय आहे? काही नाही. खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता. मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्दवेल्हाळ मी; परंतु तुम्ही कार्यवेल्हाळ आहात. राजा! मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात! तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी मजजवळ काही नाही, हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात." श्याम बोलत होता.
इतक्यात राम आला.
"काय, रे, राम? गाडी आली की काय?" श्यामने विचारले.
"नाही. बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा! रात्री जा, काही उशीर होणार नाही!" राम म्हणाला.
"देवाची इच्छा!" राजा म्हणाला.
                            सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदीतीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातांत घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते.
"श्याम! चला परत जाऊ." राजा म्हणाला.
"राजा! असे भव्य सृष्टिदर्शन झाले, म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा." श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती.
शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एकेक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एकेक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती.
श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.

                            आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते, त्या वेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामस्तीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस्तीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्याइतकी सशक्त राहिली नव्हती, तरी हिंडू-फिरू शकत होती, दोन धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडीची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ, वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरास जावयाचे, असे ठरले होते.
                            आई केव्हा येते, याची मी वाट पाहात होतो. किती तरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती! बारा वर्षांत पालगडच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवापालट, ना कधी थारेपालट. आई आली. दापोलीहून लाडघरास जाण्यासाठी मी गाडी ठरविली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर तीन कोस होते. तीन तासांचा रस्ता होता.
                            पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरविले होते. सकाळी सात आठ वाजता पोचू, असे वाटत होते.
गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टिमंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या! फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टिमंदिरात काकड-आरती सुरू झाली होती.
                            गाडीमध्ये मी व माझी आई दोघे जणच होतो. मी व माझी आई; माझी आई आणि मी. दोघे, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय चौदा-पंधरा वर्षांचे होते; तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली, असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती.
"किती रे भरभरीत शेंडी? श्याम? तेलबील नाही वाटते लावीत कधी?" आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो.
सुखावले मन
प्रेमे पाझरती लोचन
अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी, आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे, आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी. होय. आम्हां दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही; तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन, वगैरे मनोरथ मी मनात मांडीत होतो. मनोरथाचे मनोरे रचावयाचे व पाडावयाचे, हा मनाचा चंचल स्वभावच आहे.

आई मला म्हणाली, "श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली?"
"आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई, मला थोपट. आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे, असेच मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण." माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धो धो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडांवरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती; परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती. तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ; परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. या वेळेसही तोच अनुभव आला.
घनदाट या रानात
धो धो स्वच्छ वाहे पाणी
माझ्या श्यामच्या जीवनी
देव राहो
आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो.
आईने विचारले, "काय, रे, उठलाससा? कंटाळलास, वाटते? नीज, हो. माझी मांडी दुखायची नाही."
मी म्हटले, "आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का?"
                          
                            दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा, की तिथे हा आनंद तुम्हांला भेटेल.

                            दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैलरहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कुऊ कुऊ आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळीपोफळीचे-नारळींचे आगर. मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी.

                            आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हांस माहीत नव्हते. विचारीत विचारीत चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते.

                            सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुद्धा किती तरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती.

                            आईला एकदम पाहताच चकितच झाली. "वयनी! ये. किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत!" अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. "आणि हा कोण?" तिने माझ्याकडे पाहून विचारले.
आई म्हणाली, "सुभ्ये! हा श्याम हो. लहानपणी हट्ट करणारा. सर्वांशी भांडणारा तो हो हा. तुला नाही का आठवत?"
"बराच की रे मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते?" सुभाताईने विचारले.
"हो, मी चौथ्या इयत्तेत आहे." असे मी उत्तर दिले.
त्या प्रेमळ, भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, "वयनी, समुद्रावर आताच स्नाने करावयास जा; म्हणजे दहा-अकरा वाजायला परत याल. दुपारी जेवणे-खाणे झाल्यावर देवीला जाऊ; म्हणजे सायंकाळी तुम्हांला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढी आल्यासारखी आठ दिवस राहतीस, तर किती चांगले झाले असते! मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का?"

"सुभ्ये, ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आल्ये आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो." आई म्हणाली.

                            आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोरात निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस्तीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो! अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र.

                            आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे, ते त्यांनी आम्हास दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. "येथेच लाल पाणी का बरे?" असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला.
ते म्हणाले, "देवाचा चमत्कार; दुसरे काय?"
आई म्हणाली, "येथे देवाने राक्षसास मारले असेल, म्हणून हे पाणी लाल झाले!" सुभाताईचे यजमान म्हणाले, "हो! तसा तर्क करावयास हरकत नाही."

                            लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुऊ लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत खेळत-खिदळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपासमुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते, तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदकुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली; चार आणे समुद्रात फेकून दिले! मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने चार आणे दिले! ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने, निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काही तरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहात असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकावयाला?
                            कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली, तो बारा वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नानसंध्या, देवतार्चन, पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या, आगराच्या कामास लागत असत.

                            आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा आंगरस काढला होता; नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकढे तूप होते.

"श्याम, श्लोक म्हण चांगलासा." आई म्हणाली.
मी "केयूरा न विभूषयन्ति पुरुष" हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला.
"इंग्रजी शाळेत जातोस, तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते? अलीकडच्या मुलांना चार श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे, श्याम!" त्यांनी मला विचारले.
"दुसरा." मी सांगितले.
"वा! चांगला हुशार दिसतोस!" ते म्हणाले.
सुभाताईचा मुलगा पाच वर्षांचा होता व मुलगी दोन-अडीच वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखविला.
"श्याम! खांडवी घे हो आणखी. लाजू-बिजू नकोस." सुभाताई म्हणाली.
"श्याम मुळी साऱ्या जगाचा भिडस्त. येथे नको हो लाजायला! श्याम!" आई हसत म्हणाली. माझी आईही जेवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली, "वयनी! तू आपली सावकाश जेव. त्यांना जाऊ दे उठून."

                            साऱ्यांची जेवणे झाली. ओल्या पोफळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे; परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवराआवर केली. दोघी जणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलग्याबरोबर मी आगरात गेलो. आगरातील मजा पाहात होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात. परंतु फार असले, म्हणजे त्यांना कोण विचारतो! केळफुलाची एकेक पारी उघडत होती व केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते. त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुभाताईने हाक मारली, म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला.

"श्याम! त्या पपनशीवरची दोन-तीन पपनसे तोडून आण. दोन येथे फोडू व एक बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल." सुभाताईने सांगितले.
"कोठे आहे झाड?" असे मी विचारताच "चल, मी दाखवितो, मामा!" असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुखडीएवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती; परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून दोन-तीन पपनसे पाडली, पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली, की रानात देवाला जावयाचे तेथेच पपनसे फोडावी. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, "रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा." पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे.

                            देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायांवर वाहिल्या. खणनारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोर्यात आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते, मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने, तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो.

                            देवीच्या पाया पडून आम्ही घरी आलो. आम्हांला आता परत दापोलीस जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला.
"तू दापोलीस जवळच आहेस; एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे, तर येथे येत जा. ऐकलेस ना, श्याम!" सुभाताई म्हणाली.

                            तिचे यजमान म्हणाले, "श्याम! येत जा, रे. आम्ही काही परकी नाही. अरे गेल्या-आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार. ये हो!" मी 'हूं' म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली. पपनसेही दोन घेतली.

                            "सुभ्ये, येते हो!" आई म्हणाली. आई निरोप मागू लागली.
"वयनी! आता पुन्हा, ग, केव्हा भेटशील?" सुभाताई भरल्या मनाने म्हणाली.
आई म्हणाली, "सुभ्ये! देवाला माहीत, केव्हा भेटू, ते. बारा वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडल्ये. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे दोन भाऊ पुण्या-मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेल्ये तर! परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी? सुभ्ये, गेली पाच वर्षे सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला, की पडावे अंथरुणावर; घाम येऊन ताप निघाला, की उठावे कामाला. घरात तरी दुसरे कोण आहे? गरिबाला दुखणी येऊ नयेत हो. पापच ते. जिभेला चव मुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कसे तरी दोन घास घशाखाली ढकलायचे. असो. देवाची इच्छा! आपण माणसे तरी काय करणार दुसरे. आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा. हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दुःख उगाळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस; तुझा प्रेमळ स्वभाव, म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू. चंद्री नि तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू, म्हणून बोलत्ये. जरा दुःख हलके होते. बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो, हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे." असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईनेही डोळ्यांना पदर लावला.

"वयनी! आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वयनी! श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही हो ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी!" सुभाताई म्हणाली.

आई म्हणाली, "हो. तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला, की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे, येत्ये हो!" असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात एकेक रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला.
"वयनी! रुपया कशाला?" सुभाताई म्हणाली.
"राहू दे, ग! मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुभ्ये, तुझी वयनी आता श्रीमंत नाही, हो. असू दे हो तो रुपया." असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली.

                            आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली.
                            सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामस्तीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तास जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या-भागलेल्या सूर्याला सहस्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. बुडाला, सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्या वेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता.

दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्रांची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली.
"आई! पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई! तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे, असे वाटते." मी आईचा हात हातात घेऊन म्हटले.

                            आई म्हणाली, "तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका, सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुद्धा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर! आपल्यात म्हण आहे ना? "काशीस जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे." जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी हो सोय आहे. बाळा! आपण कोठे जावयाचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिणे! पुरे हा संसार! कोठल्या यात्रा नि बित्रा! अरे, ही संसारयात्रा हीच मोठी यात्रा, हो! या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रूनिशी मला डोळे मिटू दे, म्हणजे झाले."

डोंगरावर धो धो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यांतूनही शांत प्रवाह होता. गालांवर घळघळत होता. त्या पवित्र गंगा-यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले.
"आई, तू मला हवीस, आम्हांला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस, तर कोणासाठी शिकावयाचे, कोणासाठी जगावयाचे? आई! तुला देव नाही हो नेणार!" असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेविले. जणू त्या वेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवीत होतो.
"देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले." आई म्हणाली.

                            आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेविले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले, "आई! तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील चार दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई! आपलेही तसेच सारे चांगले होईल. नाही का? आपले दारिद्र्य जाईल. चांगले दिवस येतील."

"श्याम! देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो. विषाचे अमृत करतो, सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसाराची माणसे. आपली कोठे तेवढी लायकी आहे?" आई म्हणाली.

"आई! देवाची कृपा नेहमीच असते. होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हालपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच, असे म्हणतात, ते खरे का ग?" मी प्रश्न विचारला.

"बाळ! तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे. देव जे जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले, ते तुझ्या बऱ्यासाठी ना? मग माझ्याहून, किती तरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रद्धा असावी." आई जणू श्रद्धोपनिषदच गाऊन राहिली होती.

                            एकदम माझे लक्ष समोर गेले. "वाघ! आई! वाघ!" मी घाबऱ्या घाबऱ्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा! काय ती ऐट! उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो. तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यावयाला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत. गाईगुरे, मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता.
                            हळू हळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री नऊ वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही. दुसऱ्या दिवशी गेली.
                            मित्रांनो! तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कोठे गेलो नाही. तो एकच दिवस! त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टिमाऊलीच्या-समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो. प्रेमात डुंबलो. हृदये हृदयांत ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने, अस्सल शंभर नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती.

                            असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंतःकरणाने गेली.


********************************************************************************************
 रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस... मनाने           अनुक्रमणिका         रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
********************************************************************************************
 

रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक

                            त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे; परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते; भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा. दीनपणा.

                            सावकाराचा माणूस! वडील त्याची बरदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेविली. "कढी कर व कढीत कढीलिंब टाक, म्हणजे वास लागेल." अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती; तरी शेजारून आई घेऊन आली. चहापानानंतर आईने कढत पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली; परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर! श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास २५ रुपये दंड झाला, असे मी वाचले होते! शेतकरी! शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम! साऱ्या खुशालचेंडूंना पोसणारा तो जणू पशू! असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो? मित्रांनो! हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे, कावळे चालतील; घरात पोपट-मैना चालतील; परंतु हरिजन खपणार नाही! पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत, तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार?
                            त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा, असाही ईश्वराचा हेतू असेल! परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य असे, कोठून करवून घेईल, याचा नेम नसतो.

                            माझे वडील शेतावरून आले. "तुमचे स्नान वगैरे झाले का?" असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो 'होय' म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्या जवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावयाचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन, असे तो म्हणाला. "बरे, मी स्नान करतो; लौकरच पूजा वगैरे आटोपतो. तुम्ही थोडी विश्रांती घ्या." असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, "त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून? कोठून आणून द्यायचा होतास." आई म्हणाली, "सारे काही दिले. त्याचे धोतरही धुऊन वाळत घातले आहे. एकदाची धिंडका जाऊ दे येथून लवकर."
                            आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते, तरी त्यांची मनातील, खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लौकरच देवळातून परत आले.
                            "उठा, वामनराव, हातपाय धुवा." असे वडील त्यांना म्हणाले.
"या, बसा येथे. सोवळे नसले तरी चालेल. काही हरकत नाही." असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हांस सोवळ्या- ओवळ्यासाठी बोलावयाचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदोउदो करणे, एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्त्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्नमुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने; पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने; ह्या खोट्या कुलाभिमानामुळे; आंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे; भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्टकचेर्यांमुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे; कर्ज उरावर बसत होते, तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे! गड्यांनो! तुमच्या बायकामाणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल, तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच, तर शेतभात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा.
                            पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. "पुरुषोत्तम! छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील, असा म्हण." वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला; परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय मोठे नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदार होत चालले होते; आढ्यताखोर व दिमाखबाज होत चालले होते.
                            "संकोच नका करू वामनराव; भाजी घ्या आणखी, वाढ ग आणखी एक पळीभर." असे आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल! चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी, लवंग देण्यात आली. त्यांना प्यावयाला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवावयास बसली.
                            "मग काय, भाऊराव! व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज पंचाहत्तर रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दवडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावयाला म्हणून आलो." वामनराव बोलू लागले. "हे पाहा, वामनराव! दहा मण भात होते ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून पंचवीस रुपये तुमच्यासाठीच बांधीव तयार ठेविले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी चार शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठी होऊ देत-मिळवती होऊ देत-एक यंदा प्रीव्हिअसमध्ये गेला आहे. हे पाहा, वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात? तेही बाहेर पडतात." माझे वडील अजीजी करून सांगत होते.
"ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधलेत, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकविण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत; फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो! सावकारांचा वसूल आला नाही, तर आम्हांला तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही. आम्हांलाही मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते. रुपये द्या." वामनराव रागाने, बेमुवर्तखोरपणे बोलत होता. तो तरी काय करील? तोही गुलामच!
"वामनराव! काय सांगू तुम्हांला? घर ते काय? अहो केंबळी घर. मापाच्या भिंती! तिचा आग्रह म्हणून बांधली मठी, उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधावयासही तिच्या हातांतल्या पाटल्या विकाव्या लागल्या!" वडील शरमिंदे होऊन सांगत होते.
वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यांतील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता, भात गिळवत नव्हता.
"घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका." असे वामनराव निर्लज्जपणे बोलला.
                            विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुऊन ती बाहेर आली. तिच्या डोळ्यांतून शोकसंतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, "या ओटीवरून चालते व्हा! बायको विका, असे सांगायला तुम्हांला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हांला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा, की घरादाराचा लिलाव करा. परंतु असे बोलणे ऐकवू नका. खुशाल. दवंडी पिटा, जप्ती आणा. परंतु पोराबाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका."
"ठीक आहे. आम्ही तरी त्याचीच वाट पाहात आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली, तर मी वामनराव नव्हे! एका बाईमाणसाने, भाऊराव, आमचा असा अपमान करावा का?" वामनरावांनी वडिलांस विचारिले.
"तू घरात जा. जातेस की नाही?" माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता पंचवीस रुपये घेऊन कारकून निघून गेला.
                            वडील घरात आले. "तुम्हां बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हांला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो! त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे, एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडीगुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना?" वडील आईला बोलू लागले.
                            "पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीसफिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव, आपणही मोलमजुरी करू, मथुरीच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूरसुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला, आपण मोलमजुरी करू, धरित्रीवर निजू, झऱ्याचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला." आई भावनाविवश झाली होती.
"बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली, म्हणजे समजेल सारे!" असे बोलून वडील बाहेर गेले.
धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, "आई! रडू नकोस. तू रडलीस, म्हणजे आम्हांला रडू येते. आई! तू सांगशील, ते काम आम्ही करू. रडू नकोस, आई!"

लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती! फुले झाडाला आधार देत होती! करुण असे ते दृश्य होते.


********************************************************************************************
 रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ           अनुक्रमणिका         रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ
********************************************************************************************