पतंग उडवूं चला

पतंग उडवूं चला
गडयांनो, पतंग उडवूं चला
रंग ढगांवर मावळतीचा
लाल पिंवळ्सर किती मजेचा
झुळझुळ वारा नदीकांठचा
बाजुस डोंगरमळा.

करु चला सुरवात बरोबर
सोडा सोडा रीळ भराभर
पंतग चढवा हे वार्‍यावर
ढगांस भेटायला.

मउ वाळुंत पाय रोवुनी
देउं झटका दोरा ओढुनी
पतंग जातील वर वर चढुनी
पंख नको त्यांजला.

जशीं पाखंरें आभाळांत
पंख पसरुनी तरंगतात
दिसतील तैसे पतंग रंगीत
खेळ किती चांगला !

सूर्य डोंगराआड लपेल
काळा बुरखा जग घेईल
खेळ तोंवरी हा चालेल
मजेदार आपुला.


कवी - अ.ज्ञा. पुराणिक

घननिळ

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया


कवी - विद्याधर करंदीकर

कादरखां

[ मुंबईत झालेल्या हिंदू -पठाणांच्या दंग्यात गारद झालेल्या एका पठाण विरास उद्देशून सदरहू 'विलापिका' रचिली आहे ]

हा कोण इथे पडलेला ! 'कादरखां काबुलवाला' ! धृ.

धिप्पाड देह हा अडवा ! पसरला सहा अन् फूट !
पालथे पलिकडे पडले ! विक्राळ खिळ्यांचे बूट !
चुणिदार चोळणा आतां ! फाटून होय चिरगूट !
बैसला पठाणी बडगा ! बाजूला दूर निमूट !

चिखलांत बुडाले कल्ले !
त्यां ओढिति चिल्लें-पिल्लें !
खिसमीस खिशांतिल उरलें
कुणी मारि तयावर डल्ला ! 'कादरखां काबुलवाला' !.....।।१।।

अफगाण दर्‍यांतिल आतां ! डुरकाळ्या फोडिति शेर !
बुरख्यांतुनि कंदाहारी ! उठलासे हाहा:कार !
तो शर्बत पीतां-पीतां ! दचकेल मधेंच अमीर !
'क्या हुवा!' ओरडुनि ऐसें ! बडवतात सगळे ऊर !

ते हेरतचे अक्रोड
ते बदाम-पिस्ते गोड
रडरडुनी होती रोड
अल्बुखार अंबुनि गेला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।२।।

तो हिंग काबुली आतां ! विकणार यापुढें कोण ?
व्याजास्तव बसुनी दारीं ! गरिबांचा घेइल प्राण ?
खाणार कोण यापुढतीं ! तीं कलिंगडें कोरून?
सजवी नूर नयनांचा ! कीं सुरमा घालुनि कोण ?

रस्त्यावर मांडुनि खाटा
हुक्क्यासह मारिल बाता-
हिंडेल कोण वा आतां
घालून चमेलीमाळा ? ! 'कादरखां काबुलवाला' ! .....।।३।।

करुं नका गलबला अगदीं ! झोंपला असे हा वीर !
जन्मांत असा पहिल्यानें ! पहुडला शांत गंभीर !
राहणें जितें जर, मागें ! व्हा दोन पावलें दूर !
हा बसेल मानगुटीला ! ना तरी होउनी पीर !

जा पळा-पंचनाम्याला
तो आला डगलेवाला,--
अडकवील कीं साक्षीला,
मग म्हणाल "पुरता भंवला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।४।।


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !


कवी - माधव ज्यूलियन

झाल्या तिन्हीसांजा

अजुनी कसे येती ना, परधान्या राजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हीसांजा ll ध्रु.ll

उशिर होई काढाया गाईंच्या धारा
शालु हिरा कालवडी देती हुंकारा
टवकारिती कान जरी वाजे दरवाजा ll१ll

वाट तरी सरळ कुठें पांदितिल सारी
त्यांतुनी तर आज रात्र अंधारी भारी
आणि बैल कसल्याही बुजती आवाजा ll२ll

'जेवणार मी पुढ्यात' घाली मधु रुंजी
झोपेने पेंगुळली तरी न नीजे मंजी
आणि किती करती आंत-बाहेरी ये-जा ll३ll

निवल्यावर हुरडयाच्या उसळीस न गोडी
लवकर कां सोडिती न मोट तरी थोडी
अधिकाधिक खाली-वर होई जीव माझा ll४ll

गुरगुरला जो पिसाळ काल जरा कांही
म्हणती त्या मेल्याला काळिज कीं नाही
परि पाठीराखी ती आहे अष्टभुजा ll५ll


कवी - यशवंत

मामाच्या गावाला जाऊया

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया


गीत      -    ग. दि. माडगूळकर
संगीत   -    वसंत पवार
स्वर      -    आशा भोसले
चित्रपट  -    तू सुखी रहा (१९६३)
राग       -    भैरवी

आला क्षण!

गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो; पण
गंभीरपणे घड्याळ बोले-
'आला क्षण-गेला क्षण!'

घड्याळास या घाई नाही,
विसावाही तो नाही; पण
त्याचे म्हणणे ध्यानी घेई-
'आला क्षण-गेला क्षण!'

कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमीत व्हावयास मन,
घड्याळ बोले अपुल्या वाचे-
'आला क्षण-गेला क्षण!'

कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणित घण,
काळ-ऐक! गातो अपुल्याशी-
'आला क्षण-गेला क्षण!'

लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करिती-
'आला क्षण-गेला क्षण!'


कवी -  केशवसुत