जरा अस्मान झुकले

ज़रा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले

ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले ...
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !


कवी - ना. धो. महानोर

रुद्रास आवाहन

डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभैरवा, करीत कर्कश खा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां !

पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती,
झाड खटखट तुझें खड़ग क्षुद्रां !

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
"शांति ही!" बापुडे बडबडति जन-कीडे !
धडधडा फोड तट! रुद्र ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा !

पूर्वी नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयीं अन्य गृहीं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा!


कवी - भा. रा. तांबे

झाशीची राणी

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll


कवी - भा. रा. तांबे
जाति - महाकाली
स्थळ - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२९

लतांनो सांगू का तुम्हां !

लतांनो सांगू का तुम्हां, उद्या श्रीराम येणार!
वनाला सर्व ह्या आता, खरा आनंद होणार

तुम्हा कोठूनीया ठावा, कसा श्रीराम तो आहे
सुखशांती झरा तेथे, सदाचा वाहतो आहे
उद्या पाहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम
मुखे लागाल भुकाया, जय श्रीराम श्रीराम

बघूनी नाथ हर्षाने, मला उन्माद येईल
नका आणू मनामाजी, चुकोनी दोष होतील
लतांनो ध्याल ना पुष्पे, झर्‍यांनो ध्याल ना पाणी
पहा ही अर्पीली कैसी, फळे या घोर वृक्षांनी

नव्हे कोठून ही उष्ठी, जरासी सावलेली ही
कडू कच्ची फळे रामा, कशी देईन गं बाई
उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हांला मीच दावीन
फळे ही त्यास अर्पुनी, सुखे त्या पायी लोळेन
जय श्रीराम श्रीराम, जय श्रीराम श्रीराम


कवी - वा. गो. मायदेव

गाइ घरा आल्या

गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।

गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।

गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।

गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।

गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।

गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।

गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।

गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।

गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।

गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का?    ।।११।।

गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।


कवी - वा. गो. मायदेव

थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
ㅤㅤㅤㅤㅤㅤआई, थोर तुझे उपकार॥ध्रु॥
वदत विनोदें, हांसत सोडी
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण दुधाची धार॥१॥
नीज न आली तर गीत म्हणे
ㅤㅤㅤㅤㅤㅤप्रेम जिचे अनिवार॥२॥
येई दुखणें तेंव्हा मजला
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण करी उपचार॥३॥
कोण कडेवर घेउनि फिरवी
ㅤㅤㅤㅤㅤㅤचित्तीं लोभ अपार॥४॥
बाळक दुर्बळ होतों तेंव्हा
ㅤㅤㅤㅤㅤㅤरक्षण केलें फार॥५॥
त्वांचि शिकविलें वाढविलें त्वां
ㅤㅤㅤㅤㅤㅤआहे मजवर भार॥६॥
स्मरण तुझ्या या दृढ ममतेचें
ㅤㅤㅤㅤㅤㅤहोतें वारंवार॥७॥
नित्य करावें साह्य तुला मी
ㅤㅤㅤㅤㅤㅤहा माझा अधिकार॥८॥


कवी - भास्कर दामोदर पाळंदे

मीच का?

मी या जगांत भरल्या, दु:खास का पुसावे?
अनमोल आसवांना, ऐसेच का वहावे?

राधा न मी न मीरा, ना ती अनारकलि मी
का मीच विष प्यावे? बेड्यांत जोखडावे?

नजरांत खोट त्यांच्या, शापीत भाव सारे
सौंदर्य मीच माझे, मग शाप का म्हणावे?

सारेच ओळखीचे, दिसले ठसे हजारो
मीही तशीच का त्या, वाटेवरून जावे?

धर्मासही न चुकले, जर वागणे अधर्मी
ते पाश संस्कृतीचे मग मीच का जपावे?

भाळी कधीच माझ्या, रेखा न पाहिल्या मी
मग जे घडून गेले, संचीत का म्हणावे?

सृष्टीस निर्मिताना, ना 'तो' मुहूर्त पाही
माझ्या मनांत का मी, पंचांग बाळगावे?

ते सावलीत जाती, टाळूनिया उन्हाला
तेजोनिधीस, माझ्या मी सावलीत घ्यावे