उघड दार उघड दार

उघड दार उघड दार
प्रियकरास आपुल्या
उघड दार, उघड दार

मध्यरात्रिच्या नभात
शांत चांदणे खुले
पांघरूनी रश्मिजाल
गाढ झोपली फुले

अजुन हा निजे न भृंग
मरंद-गुंगिने भुलून
मंजु गुंजनात दंग
अधिर त्या नको सकाळ
त्या दिशाहि उजळल्या
मध्यरात्रिच्या निळ्यांत
उघड उघड पाकळ्यां


कवी      -    अनिल
संगीत    -   जी. एन्‌. जोशी
स्वर     -    जी. एन्‌. जोशी

फ़क्‍त तुझ्यासाठी

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी
ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

वाटेवर काटे वेचीत [दशपदी ]

वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो

खांद्यावर बाळगिले ओझे सुखदुःखाचे
फेकून देऊन अता परत चाललो


कवी     -    अनिल
संगीत  -    यशवंत देव
स्वर     -    पं. वसंतराव देशपांडे
झेपावणार्‍या पंखांना क्षितिजं नसतात,
त्यांना झेपेच्या कवेत येणारे आकाश असते.
सृजनशील साहसांना सीमा नसतात,
त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते.
अशी सृजनशील साहसे हवी आहेत,
जी बीजे पेरून बाट पाहू शकतील,
जी भाग ठेऊन भविष्य आखतील,
अन् बेभान होऊन वर्तमान घडवतील.....


कवी - बाबा आमटे

काव्यात

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

पाऊस

आज सार्या देहावरी तिने झेलला पाऊस
देहाच्याही आत आत जणू पोचला पाऊस

देह झाला कस्तुरीचा केवडाही घमघमे
इथेतिथे ठायीठायी गंधभारला पाऊस

देह मनाच्या या रेषा किती धुसर अस्फ़ुट
मनाच्या या अंगणात मस्त फ़ुलला पाऊस

आभाळाने दान द्यावे धरित्रीच्या पदरात
सोसाट्याने घेता दान किती झुलला पाऊस

पावसाच्या धुंदवेळा मन तिचे सावरेना
स्वातीच्या या शिंपल्यात बघ रुजला पाऊस.

कळत जाते तसे

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?


कवी - बा. भ. बोरकर