गगनि उगवला सायंतारा

गगनि उगवला सायंतारा
मंद सुशीतळ वाहत वारा

हाक तुझी मज स्पष्ट ऐकु ये
येइ सखे ये, बैस जवळि ये
गगनि उगवला सायंतारा

घाल गळा मम तव कर कोमल
पसरु दे श्वासाचा परिमल
घेई मम हृदयात निवारा
गगनि उगवला सायंतारा

बैस जवळि ये, बघ ही पश्चिम
कोमल रंगी फुलली अनुपम
ये नेत्री ते घेउ साठवुनि
गालावरती गाल ठेवुनी
गगनि उगवला सायंतारा

उदासीनता विसर जगाची
तुझाच मी, तू माझि सदाची
विरले हृदयांतरि, बघ अंतर
तू अणिक मी जवळ निरंतर !
गगनि उगवला सायंतारा


कवी     -    अनिल
संगीत  -    गजानन वाटवे
स्वर    -    गजानन वाटवे

क्षण

क्षण एक आसुसलेला, शांत, गहिवरला,
क्षण एक उगाच थांबलेला, अडखळलेला,
क्षण एक पुरेसा स्वप्न पंखलाउनी उडायला,
क्षण एक पुरेसा धरेस कोसळायला,

क्षणाक्षणात क्षण निघाले,
जीव लावायला, जीव गुतायला,
रंग रांगोटयांनी आकाश रंगवायला,
क्षण एक बलत्तर, वादळ उडवायला,
सजवले घरटे मोडायला.

क्षण एक कोलमडलेला, तुटलेल.
क्षण एक उरी दाटलेला, लोचनी साठलेला,
क्षण एक ओठान पलीकडे दडलेला,
स्थिर,स्तब्ध, पण आत काहूर माजलेला.

क्षण विचारी, क्षणच सोडवी,
क्षण क्षणात रडवी, क्षणच क्षणात हसावी,
क्षण घायाळ करी, क्षणच औषधी,
क्षण एक प्रश्न, आणी तेच त्याचे उत्तर.

क्षण प्रेमाचे साठुनी, झाले आठवणी,
क्षण विरहाचे, गेले रात्र जागवुनी,

क्षण माझे, क्षण तुझे,

क्षण भेटीचे, लाजरे, लपलेली, बिथरलेले,
एकत्री घालावलेले, रमलेले, ज्वलंत पेटलेले.

चित्र कधी रंगवलेले, क्षणात अश्रू तून वाहले.
तरीही, शेवटी क्षणच राहले, हसरे, गोजिरे.
क्षण पुन्हा पुलवी जीवन, क्षणात पुन्हा बहरेल आंगण.
क्षण एक बल्तर,
बाकी सगळे निरुत्तर, बाकी सगळे निरुत्तर.

जुई

पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती
इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती

आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला
ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला

तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे
जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे

कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत
शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत

मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते
सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते!


कवी - अनिल

माणूस माझे नाव

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...


कवी - बाबा आमटे
कवितासंग्रह - ज्वाला आणि फुले

आठवून पाहायचो मी...

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णतेतही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

प्रीतिच्या फुला

वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला रे

तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला रे

वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला रे

माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली
कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतीच्या फुला रे

दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनांतच सुकुनी
कसे घालु तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला रे

प्रीतीवरी विश्वासून, घडीभरी सोसू ऊन
नको टाकु खाली मान, माझ्या प्रीतीच्या फुला रे

मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला रे


कवी     -   अनिल
संगीत  -   यशवंत देव
स्वर     -   उषा मंगेशकर
राग     -    खमाज

डोळ्यातून ओतलो इथे.

आज होऊन तमाशा मीच जगलो इथे
राहीलो एकटा सगळ्यास मुकलो इथे.

राहीली ताट मान त्या मोठ्या मनाची
मी तर कणा मोडलेला सदा वाकलो इथे.

आता कुठे सुरवात म्हणे झाली सुखांची
त्या सुरवाती आधीच मी तर संपलो इथे.

होती आशा मला वादळास मिठीत घेण्याची
तीच्या इवल्याशा श्वासात मी गुतंलो इथे.

ना कळाल्या तीच्या भाषा ना कळाल्या दिशा
मी वाट चुकलेला असाच भरकटलो इथे.

मागे वळून पाहता शुन्य होता सोबतीला
दमडीच्या मोलाने भगांरात विकलो इथे.

कोणी आल होत दुःखं विकत घेण्यासाठी
मी घेउन टोपली मग बाजारात बसलो इथे.

हो असच संपल जीवन उद्याच्या प्रतिक्षेत
उद्यासाठी आजचा प्रत्येक क्षण मुकलो इथे.

काल म्हणे तीला खरच माझी आठवण आली
आठवणीत तीच्या मग मीही डोळ्यातून ओतलो इथे.