साहित्य :
१ कप गव्हाचे पीठ
०.५ कप तांदुळाचे पीठ
०.५ कप बेसन
०.५ कप ज्वारीचे पीठ (नसेल तर गव्हाचे पीठ घालावे)
१ मध्यम आकाराची काकडी खिसुन
...१-२ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे)
०.५" आले
१-२ पाकळ्या लसुण
१ टेबल्स्पून जिरेपूरड
१ टेबलस्पून धणेपूड
मीठ - चविप्रमाणे
हळद, चिरलेली कोथिंबीर, एक छोटा खडा गूळ
तेल लागेल तसे
पाणी लागेल तसे
कृती : सगळी पीठे एकत्र करुन एका बेकिंगडिशमधे ठेवावीत. ओव्हन ३५० डिग्री फॅरेनहाईट वर चालू करुन त्यात ही पीठाची डिश ठेवावी. ओव्हन प्रीहीट होत असताना एकदा मधे पीठ हलवावे. ओव्हन प्रीहीट झाला की बंद करुन टाकावा, अजुन एकदा पीठ नीट हलवावे आणि डीश तशीच अजुन ५ मिनीटे ओव्हनमधेच ठेवावी. दरम्यान मिरच्या, आले, लसूण एकत्र वाटावे. काकडी खिसुन घ्यावी. त्यात वाटण, गुळ, मीठ, कोथिंबीर, हळद, जिरे-धणेपूड घालुन नीट मिसळुन ठेवावे. ५ मिनीटाने बाहेर काढुन काकडीच्या मिश्रणात घालावे. चमच्याने सारखे करुन ५-७ मिनीटे तसेच ठेवावे. काकडीला सुटलेल्या पाण्यात बरेचदा पीठ नीट भिजते. पण गरज लागली तर थोडे पाणी लावून पीठ थापता येण्याजोगे भिजवावे. गॅसवर तवा तापत ठेवावा. पोळपाटावर ओले फडके/पंचा/रुमाल घालुन त्यावर एक मोठ्या लिंबाएवढा पीठाचा गोळा घेउन पाण्याच्या हाताने थालीपीठ थापावे. थापलेल्या थालिपीठाला मधोमध एक आणि त्याच्या कडेने ४ अशी ५ भोके पाडावीत. यामुळे थालीपीठ नीट भाजले जाते.आता फडक्यासहीत थालिपीठ उचलून तव्यावर उलटे टाकावे आणि हलक्या हाताने फडके सोडवून घ्यावे. पाडलेल्या छिद्रातून एकेक थेंब तेल तव्यावर सोडावे. गरज असेल तर कडेने ३-४ थेंब तेल सोडावे. एका बाजुने भाजुन झाले की उलटवून दुसरीबाजू देखील नीट भाजावी. मस्त खमंग थालीपीठ काकडीच्या कोथिंबीरीबरोबर, लोणच्याबरोबर खावे.
टीप -
१. दिलेल्या प्रमाणात ६ मध्यम आकाराची थालिपीठे होतात.
२. मिरची, लसूण न घालता नुसते आले आणि थोडे लाल तिखट घालून ही थालीपीठे करता येतात.
३. काकडीऐवजी कांदा घालुनही मस्त लागते.
४. अगदी बांगडीएवढी लहान थालीपीठे केली तर अपेटाईझर म्हणुन मस्त लागतात.