दुपार

या ग्रंथसंग्रहालयात
निःशब्दाच्या हातातील
ते कोरे पुस्तक
पहा कसे पेंगत आहे
डोक्यावरच्या या वेडपट पंख्याला मात्र
दुपारची कधीच
झोप येत नाही!
सूर्यफुलासारखी उमलणारी
उन्हाचा स्कर्ट घातलेली बॉबकट केलेली
ती मुलगी
केव्हापास्नं घुटमळते आहे
कवितासंग्रहाच्या कपाटांपाशी!
(पण तेही बेटे झोपी गेलेले दिसतात ढाराढूर...)
समोरच्या टेबलावर बसलेला
आईन्स्टाईनसारखे केस पिंजारलेला
तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर
घेतो आहे लिहून भराभर
झोपाळू बोटांनी
गलेलठ्ठ पुस्तकातले काहीतरी
झोपेला आलेल्या अक्षरांत...


बाहेर...
उन्हाच्या झाडाखाली
कलंडलेली सावली

घेऊ लागली आहे डुलक्या
अन् तिच्या हातांतली
ती पेंगुळलेली कादंबरी म्हणते आहे :
आता पुरे ग!
मला झोप येते आहे!


कवी - सदानंद रेगे
कवितासंग्रह -  गंधर्व

वैराग्याचा मेळा

मृत्यू इतक गूढ काही नाही. अंत्य यात्रेत सुद्धा  मनाची  एक वेगळीच अवस्था होते. ह्या विषयावर हि कविता आहे.

जमला जन समुदाय अपार
मूक, उदास, गंभीर
कोणी उधळती अबीर बुक्का
कोणां  मुखी राम

राग, लोभ, नाती, गोती
काम, क्रोध न उरला काही
सर्व संग परित्याग करुनी
निजला जणूकि संन्यासी

आयुष्य भरी जो दिसला
तो देह समोर निजला
गेला सोडून जो देहाला
तो न कधी बघितला

अज्ञाताच्या या प्रवासाला
आत्मा नंगाच गेला
तिरडी वरी केवळ पसरला
देह रुपी अंगरखा

जमविला गोतावळा जरी
सारे प्रवासी घडीभरचे
अज्ञाताच्या या वाटेवर
अखेर एकटेच निघायचे

असतील अनेक जरी
सखे, मित्र, सोबती
संपणार साथ तयांची
स्मशान प्रवेश द्वारी

प्रवासी आपण घडीभरचे
पाव्हणेच या जगी
काढले तिकीट परतीचे
जन्मा आलो ज्या क्षणी

ना  रद्द व्हायचे तिकीट
ना गाडी कधी चुकायची
परतीच्या प्रवासाची ती
वेळ कधी न टळायची

उगवतील चंद्र तारे
चालेलच जग रहाटी
राहतील अंधुक आठवणी
भिंती वर फोटो जोवरी

मृत्यूचीच असे ओढ जीवा
तोच शाश्वत मित्र त्याचा
भेटता देती आलिंगन दोघे
जीव तत्काळ सोडी काया

चिंतेनी किती जाळला, देह
न जळला आयुष्य भरी
होता मुक्त चिंतेतून
तो, देह जळला  चिते वरी

राखले शरीर जन्म भरी हे
राख करण्याच स्मशानी
राख पसरता मनावरी ती
राखण्याची जिरली उर्मी

धडाडून पेटली चिता
वैराग्य धूर उडाला
कोण म्हणे हि अंत्य यात्रा
जमला वैराग्याचा मेळा


कवी - केदार
कवितासंग्रह - गमन

बाई या पावसानं !

बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !

दिनभर देई ठाणं, रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं कोवळं ऊन छान
बाई या पावसानं !

फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
मातीत पखरण
बाई या पावसानं !

नदीनाले एक झाले, पूर भरुनीया चाले
जिवलग कोठे बाई पडे अडकून
नच पडे चैन !
बाई या पावसानं !


कवी     -    अनिल
संगीत    -  जी. एन्‌. जोशी
स्वर    -    पु. ल. देशपांडे

निर्दयी

तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.

गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.

तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.

शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.

मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.

कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.

थकले रे डोळे

थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता

सुकला रे कंठ माझा
तुज आळविता
तुज आळविता रे
नाम तुझे जपता

आटले रे अश्रु माझे
वाहता वाहता
वाहता वाहता रे
आठवणी काढता

शिणला रे जीव माझा
तुजविण राहता
तुजविण राहता रे
तुज नच भेटता


कवी     -    अनिल
संगीत   -    यशवंत देव
स्वर    -    उषा मंगेशकर

गगनि उगवला सायंतारा

गगनि उगवला सायंतारा
मंद सुशीतळ वाहत वारा

हाक तुझी मज स्पष्ट ऐकु ये
येइ सखे ये, बैस जवळि ये
गगनि उगवला सायंतारा

घाल गळा मम तव कर कोमल
पसरु दे श्वासाचा परिमल
घेई मम हृदयात निवारा
गगनि उगवला सायंतारा

बैस जवळि ये, बघ ही पश्चिम
कोमल रंगी फुलली अनुपम
ये नेत्री ते घेउ साठवुनि
गालावरती गाल ठेवुनी
गगनि उगवला सायंतारा

उदासीनता विसर जगाची
तुझाच मी, तू माझि सदाची
विरले हृदयांतरि, बघ अंतर
तू अणिक मी जवळ निरंतर !
गगनि उगवला सायंतारा


कवी     -    अनिल
संगीत  -    गजानन वाटवे
स्वर    -    गजानन वाटवे

क्षण

क्षण एक आसुसलेला, शांत, गहिवरला,
क्षण एक उगाच थांबलेला, अडखळलेला,
क्षण एक पुरेसा स्वप्न पंखलाउनी उडायला,
क्षण एक पुरेसा धरेस कोसळायला,

क्षणाक्षणात क्षण निघाले,
जीव लावायला, जीव गुतायला,
रंग रांगोटयांनी आकाश रंगवायला,
क्षण एक बलत्तर, वादळ उडवायला,
सजवले घरटे मोडायला.

क्षण एक कोलमडलेला, तुटलेल.
क्षण एक उरी दाटलेला, लोचनी साठलेला,
क्षण एक ओठान पलीकडे दडलेला,
स्थिर,स्तब्ध, पण आत काहूर माजलेला.

क्षण विचारी, क्षणच सोडवी,
क्षण क्षणात रडवी, क्षणच क्षणात हसावी,
क्षण घायाळ करी, क्षणच औषधी,
क्षण एक प्रश्न, आणी तेच त्याचे उत्तर.

क्षण प्रेमाचे साठुनी, झाले आठवणी,
क्षण विरहाचे, गेले रात्र जागवुनी,

क्षण माझे, क्षण तुझे,

क्षण भेटीचे, लाजरे, लपलेली, बिथरलेले,
एकत्री घालावलेले, रमलेले, ज्वलंत पेटलेले.

चित्र कधी रंगवलेले, क्षणात अश्रू तून वाहले.
तरीही, शेवटी क्षणच राहले, हसरे, गोजिरे.
क्षण पुन्हा पुलवी जीवन, क्षणात पुन्हा बहरेल आंगण.
क्षण एक बल्तर,
बाकी सगळे निरुत्तर, बाकी सगळे निरुत्तर.