तोवर तुला मला

याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे
नगरवेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जागत राहिले पाहिजे

तुझे कुंतलहि आताच विंचरून ठेव
अंबाडय़ाच्या पेडात फुले मी खोवीन
माझ्या डोळ्यांच्या ऐन्यात पाहून घे रूप
तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवीन

कालच्या सभेत गाईलेले मी गीत
ज्यात तुझ्या-माझ्या आशांचे खजिने होते
त्या ओळीहि ओठांवर घोळवून ठेव
ज्यात तुझ्या-माझ्या सुखाचे छबिने होते

आणखी एक काम करावे तू लगेच
फाटक्या कोटासहि टाके घालून ठेव
फुले हुंगीतच जाऊ दोघेहि गर्दीतून
तुझी रेशमासम बोटे दंडात ठेव

याच वस्तीतून आपले सुख येईल
तोवर तुला- मला जागलेच पाहिजे
दारावर येतील सोनेरी मनोरथ
तोवर प्रिये वाट पाहिलीच पाहिजे.


कवी - नारायण सुर्वे

माझी आई

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंडय़ा जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मज्जा म्हणून सांगू
शब्दसाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.


कवी - नारायण सुर्वे 

क्षितीज रुंद होत आहे

आज माझ्या वेदनेला
अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर
थाप बिजली देत आहे

आज मरण आपुल्याच
मरणाला भीत आहे
आणि मृत्युंजयी आत्मा
पुन्हा धडक देत आहे

आज शुष्क फांद्यावर
बहर नवा येत आहे
भूमीच्या गर्भामधुनी
बीज हुंकार देत आहे

आज सारे गगन थिटे
नजरेला येत आहे
काळोखाच्या तबकडीत
सूर्य गजर देत आहे

आज तडकलेले मन
एकसंध होत आहे
आणि उसवलेले धागे
गुंफूनीया देत आहे

आज माझ्या कोरड्या गा
शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे
क्षितीज रुंद होत आहे.


कवी - नारायण सुर्वे

असाच

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऍक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऍकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.


कवी - ना. घ. देशपांडे

मानस

मानस माझ्या मनीचा केवळ
सांगण्या इथे आलो मी
दोन मनांचा सुरेख संगम
घडवण्या इथे आलो मी

अर्थातूनही अर्थ निघाया
शब्द सांडतो येथे मी
बीज फुलांचे येथ रोवण्या
शाब्दिक सुमने खुडतो मी

कवनाला या बंध न कसले
पाशही सारे सोडून मी
कवित्त्वतेची चढवूनी वस्त्रे
कवनमंदिरी रमतो मी

दोन झरोके दोन क्षणांचे
येथ उघडूनी पाहतो मी
कवनवराला प्रणाम करूनी
काव्य दालनी येतो मी


कवियत्री - सौ. जुई जोशी.

निष्काम कर्म

सांगशी निष्काम कर्म, कृष्णा अरे वेदांत तू
समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू
मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे
तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे?

भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी
सन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी एच्छा तुझी

निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या
धावूनी सार्‍या येता, आमच्याकडे गोपी तुझ्या

अरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू?
मंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु

प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे
सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे


कवी - भाऊसाहेब पाटणकर

वाट पाहतोय

वाट पाहतोय अल्लड क्षणांची
स्वप्नातल्या तुझ्या सोबतीची
न उमगलेल्या अनामिक नात्याची
भूरळ पडणाऱ्या त्या हास्याची

वाट पाहतोय तुझ्यात हरवून जाण्याची
मिठीत तुझ्या सहज विरून जाण्याची
निवांत तुझ्या कुशीत निजण्याची
नितांत बडबडनारे होठ पाहण्यची

वाट पाहतोय माझी होण्याची
हळुवार पाऊलांनी तुझ्या येण्याची
अनामिक्तेला एक नाव देण्याची
फक्त तुझाच होऊन जाण्यची

आता फक्त वाट पाहतोय..
आता फक्त वाट पाहतोय..
तुझी त्या क्षणांची आणि माझी..
आता फक्त वाट पाहतोय.