घाबरू नकोस

घाबरू नकोस
दारावरची अवेळी टकटक ऐकून
बघ दार उघडून…
अनाहूत अंगणात येऊन नाचणारा
मोर असेल कदाचित…किंवा
शेकडो वर्षांपूर्वी उगवता उगवता
जमिनीत गाडल्या गेलेल्या इच्छांमधून
उमललेल्या अनाम फुलांचा गंध असेल..!
किंवा असेल थकून परतलेला पक्षी
आकाश जाणण्याची इच्छा
व्यर्थ वाटायला लागली असेल त्याला
तुझ्या आस-याला आला असेल..!
किंवा असेल सकाळचं कोवळं ऊन
समुद्राच्या लाटांवर नाचून
काही निरोप द्यायला आलं असेल
दुपारच्या उन्हाची दाहक नजर चुकवून
रात्र व्हायच्या आत तुला भेटावं म्हणून आलं असेल..!
गोंधळू नकोस…
परकं कोणी नसेल तिथे…
शाश्वत सुख मिळवण्याच्या भ्रमात
लाख नाकारशील तू
अंतरंगी निनादणारी बासरीची धून
प्रतिध्वनी होऊन, परतत राहील ती पुन्हा पुन्हा
बंद दरवाजावर टकटक करत राहील
तू दार उघडेपर्यंत..!


कवी - आसावरी काकडे

एकटं

माती बाजूला सारत
उगवून येताना

आणि नि:संगपणे
गळून पडताना

अगदी एकटं असावं
दु:खागत निमूट गळणा-या
पागोळ्यांकडे
कुणी पाहात नसावं !


कवियत्री - आसावरी काकडे

मेणा

डोळ्यांत तरारून आला
अश्रूचा इवला थेंब
जग धूसर झाले तेव्हा
कायाही गेली लांब

मी होते तशीच होते
काही ना कळले कोणा
अश्रूच्या अल्याड होता
व्याकूळ सखीचा मेणा

तिज मीच घातली होती
ती साद आर्त हाकांनी
सामोरी जाऊ न शकले
पण मातीच्या हातांनी

डोळ्यात तरारून आला
नग थेंब अश्रुचा इवला
मी सावरले जग तेव्हा
तो मेणा निघून गेला.


कवियत्री - आसावरी काकडे

आपल्यामध्ये जुळू लागलेल्या

आपल्यामध्ये जुळू लागलेल्या
नव्या नात्याची चिमुकली नाव
संभ्रमाच्या अथांग पाण्यात घालताना
मी कसनुशी झाले आहे !
माझे सज्ज सुकाणू
मी सर्व ताकदीनिशी
हातात गच्च धरून ठेवले आहे.
अनेकांच्या सवयीचे असलेले
हे पाणी तितकेसे गढूळ नाही.
शिवाय
दुरुन दिसणारी आतली खळबळ
आणि बसणारे हेलकावे
यांना न जुमानता
आतापर्यंत अनेक नावा
पैलतीरापर्यंत सुखरुप गेल्याच्या
कितीतरी नोंदी
परंपरेच्या बासनात
स्वच्छ नोंदलेल्या आहेत !
तरीही
पाणी संभ्रमाचेच आहे
आणि आपली पुरती ओळखही नाही
आपल्या सुकाणूची ताकद
आपण आजमावलेली नाही
आणि आपल्या सामानाचेही
आपल्याला हवी तशी माहीती नाही !
एकमेकांच्या सोबतीनं
थोडं पुढे गेल्यावर,
आपले अंदाज चुकले
आणि नाव हेलकावे घेऊ लागली
तर कुणाच्या स्वप्नांचे ओझे कमी करायचे
हेही आपले ठरलेले नाही !
म्हणुन
मी जरा बावरलेच आहे
आपली चिमुकली नाव
या अथांग पाण्यात घालताना !


कवियत्री - आसावरी काकडे

समजावना

किती सहज उतरवून ठेवलीस तू
पिकलेली पानं
हिरव्याच्या स्वागतासाठी !
मी मात्र
उगीच केली खळखळ
नि आता आपसुक होत असलेल्या
पानगळीला घाबरते आहे !
किती सहज गृहीत धरलंस
तू हिरव्याचं आगमन
आणि गिळून टाकलीस पानगळ !
मला मात्र
पानगळच गिळते आहे !
आपसुकच होईल
हिरव्याचं आगमन
हे मलाही समजावना !


कवियत्री - आसावरी काकडे

समज

तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते!
तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधी तरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस
तुझ्या निशीगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही!
आपल्या हातून निघून गेलेल्या संवत्सरांनी
जाता जाता समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?
की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?



कवी - आसावरी काकडे

ग्लोबल मेंदीची नक्षी


माणसे रोजगारासाठी बाहेर पडल्यावर
दिवस मोहल्ल्यातल्या बायाबापड्यांचा,
गुलगुले विकल्यानंतरच्या
जब्बारच्या टोपलीसारखा.
मन भकास: लोडशेडिंग वेळेतल्या पिठगिरणीसारखे.


गरजाच्या चाकांनी धावणारे आयुष्य;
वाटा आव्हानांच्या नागमोडी;
विसावत नाही पळभरासाठी
लाकूड अपेक्षांचे भेदणारी कर्वत.
उजाडताच डोक्यांवर प्रश्नांचा पर्वत:
आदळाताहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा?
गेल्या नाहीत मोहल्ल्याला खेटून
बिगबाजाराच्या चकाचौंद वाटा.


न्याहाळतात बाया नजरेने अचंबित
उंच इमारतीवरच्या लबालब टाक्या,
चघळतात कुतूहलाने शॉवरच्या
थंड-गरम पाण्याच्या नळ्यांचा विषय.
गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी:
येते आठवडा उलटल्यावर नळाला पाणी.
पडझड वारसाहक्काने आलेली,
प्रवास माहेर ते सासरपर्यंतचा,
दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम,
उपासमारीचा रमझान रोज्याला सलाम.
दळणकांडण, भांडीकुंडी, धुणीधाणी, बाळंतपण
होत नाहीत जगण्याची मुळे पक्की;
गिळते स्वप्नांच्या पोष्टरला
वास्तवाची जळजळीत चिक्की.


वेस परिसरात सकाळी
टमरेल घेऊन जाणार्‍या बाया
पाने झडलेल्या एरंडासारख्या,
सांगतात पदराने डोळे पुसत
मारझोड दारुड्या नवर्‍याची,
छळवणूक सासरची जीवघेणी;
दाखवतात पाठीवरचे वळ काठीचे.
करते एक भार दुसरीचा हलका
खर्चून शब्द ठेवणीतले मायाळू;
दाटतो सांत्वन करणारीच्या डोळ्यांसमोर
पडदा धुक्याचा ओलसर.


तारुण्य बहरताना कोळपून गेलेले
जगणे वशिलाहीन विधवांचे होरपळून गेलेले,
निराधारांच्या तुटपुंज्या अनुदानासाठी
येरझारा तहसिलच्या मारणार्‍या
म्हातार्‍या मरणाला टेकलेल्या.
बंदुका कठोर शक्यतांकडे रोखलेल्या.
वागतो फटकून चंद्र पौर्णिमेचा,
पंख अमावस्येचे मोहल्लाभर पसरलेले.


काळजी जमान्याला शेअरबाजाराची,
वाहिन्यांच्या टीआरपीची,
स्टार्सच्या मानधनाच्या चढ-उतारांची.
बोकांडी प्राथमिक गरजांच्या स्कोअर क्रिकेटचा.


मोसमात पानगळीच्या वसंताचे कागदी नकाशे,
येताहेत कोणत्या वरातीसाठी डिजीटल ढोल-ताशे.
घेणार भरारी कशी पंखतुटले पक्षी?
कोरणार कोणत्या हातांवर ग्लोबल मेंदीची नक्षी?



कवी - अजीम नवाज राही