वाघ्या

अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी ।
सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥

मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥

इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी ।
बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥

आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी ।
एकाजनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥३॥ 


रचनाकर्ते - संत  एकनाथ

रामाचा पाळणा

जोजोजोजो रे कुलभुषणा ॥ दशरथनंदना ॥
निद्राकरिबाळा ॥ मनमोहनारामालक्ष्मणा ॥ धृ० ॥

पाळणा लावियेला अयोध्येंसी ॥
दशरथाचे वंशीं पुत्र जन्मले हृषिकेशी ॥
कौसल्येचे कुशीं ॥ १ ॥

रत्नजडीत पालख ॥ झळके अमोलिक ॥
वर ते पहुडले कुळदीप ॥ त्रिभुवननायक ॥ २ ॥

हालवी कौसल्या सुंदरी ॥ धरूनी हस्तीं दोरी ॥
पुष्पे वर्षती सुरवर ॥ गर्जति जैजैकार ॥ ३ ॥

विश्वव्यापका रघुराया ॥ निद्रा करि रे सखया ॥
तुजवरी कुरवंडी करूनिया ॥ सांडिन आपुली काया ॥ ४ ॥

येउन वसिष्ट सत्वर ॥ सांगे जन्मांतर ॥
राम परब्रह्म साचार ॥ सातवा अवतार ॥ ५ ॥

याग रक्षुनियांअबधारा ॥ मारुनि निशाचरा ॥
जाईल सीतेच्या स्वयंवरा ॥ उत्धरि गौतमदारा ॥ ६ ॥

परणील जानकीस्वरूपा ॥ भंगुनियां शिवचापा ॥
रावण लज्जित महाकोपा ॥ नव्हे पण हा सोपा ॥ ७ ॥

सिंधूजलडोहीं अवलीला ॥ नामें तरिली शिळा ॥
त्यांवर उतरूनी दयाळा ॥ नेशी वान्नरमेळा ॥ ८ ॥

समुळ मर्दुनी रावण ॥ स्थापिला बिभीषण ॥
देव सोडविले संपूर्ण ॥ आनंदेल त्रिभुवन ॥ ९ ॥

ऐशीं चरित्रे अपार ॥ करील मनोहर ॥
इतुकें ऐकोनी ॥ उत्तरा राहिलें रघुवीर ॥ १० ॥

रामभावाचा भुकेला ॥ भक्ता अधिन झाला ॥
दासविठ्ठले ऐकिला ॥ पाळणा गाईला ॥ ११ ॥

जाणिव

सांध्यरसाने रंगत रंगत
वाहत होता कोमल वारा
अवकाशाचे अंतर उजळत
उमटत होती एकच तारा

तू आणिक मी बसून तेथे
बोलत होतो सहजच काही
सहजच सारे वाटत नव्हते
त्या दिवशी पण तुला मलाही

उमजत नव्हते हे की ते वा
ती तर सजणे; होती प्रीती
होती प्रीती; परंतु तेव्हा
जाणिव नव्हती, जाणिव नव्हती!

दैवगतीने वाहत वाहत
अनेक वर्षांनंतर सजणी
असेच आलो, बघ अनपेक्षीत
आपण दोघे एक ठिकाणी!

पुन्हा तू नि मी बसलो येथे
बोललीस तू, मी पण काही
सहजच वाटत नाही पण ते
आज खरोखर तुला मलाही

अजाण होतो मागे आपण
नव्हती जाणिव होती प्रीती
उरली आहे आज, सखे पण
जाणिव नुसती, जाणिव नुसती !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तूंच भिला तर

कुजबुजतो तो आहे विकृत
मुकाच बसला आहे तो मृत

कर हिरिरीने अन त्वेषाने
आवेशाने उंच तुझा स्वर
गगन धरेला कंपवून तू
प्रतिरोधाचे आवाहन कर

चिडून आता तुझ्या सकलही
शक्तीने अन या दुष्टांवर
न घाबरता न चळताना
घाल तुझा हा घाव अनावर

भिऊ नको रे! तूच भिला तर
बुडेल लवकर जग हे सारे
हे होतीलच विजयी दुर्जन
अगणित सज्जन अगतिक सारे

तूच भिला तर या जगतावर
दिसेल सत्यच खोट्यावाणी
तूच भिला तर कपटी खोटे
ख-याप्रमाणे म्हणेल गाणी

तूच भिला तर बघ वाढेलच
मत्त खळांची रुधिरपिपासा
विश्वजयाची खळ अधमांची
न शमणारी दुष्ट दुराशा

सत्य पुकारत झगडत झगडत
हाका मारत जागोजागी
ही चिरनिद्रा जगदांतर्गत
नीतिमती कर सत्वर जागी

कुजबुजतो तो आहे विकृत
मुकाच बसला आहे तो मृत


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

देवधर्म

तुला न कळले, मला न कळले, तरी वाढली प्रीत अशी
चंद्रकोर शुद्धात जशी!

हळूहळू हळुवार सख्या, तू प्रेमबोल लागला म्हणू
सारंगीचे सूर जणू!

भिरभिर फिरते प्रीत आतली, प्राणसख्या अनिवार अशी
आभाळावर घार जशी!

मनांतले अन जनातले हे दुवे, सख्या, जुळतील कधी?
सांग मळे फुलतील कधी?

मलाही कळते सगळे पण हे मन होते भयभीत तरी
कशी त्यजू जनरीत तरी?

तशात आहे मी कुलवंता पापभीरु सुकुमार अशी
देवधर्म सोडूच कशी?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हसेल रे जग

लगबग लगबग
लगबग लगबग
चल लगबग, साजणा!

फारच आता उशीर झाला
लवकर ने परत घराला
करते तगमग
करते तगमग
चल लगबग, साजणा!

घाबरले मी: झाकड पडली
वीज तश्यातच वर कडकडली
झगमग झगमग
झगमग झगमग
चल लगबग, साजणा!

सूडच साधत वै-यावाणी
थयथय नाचत आले पाणी
मी भिजते, बघ
मी भिजते, बघ
चल लगबग, साजणा!

तूच चुकविली वाट खरोखर
उगाच आले तुझ्या बरोबर
हसेल रे जग
हसेल रे जग
चल लगबग, साजणा!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

नील जलांनो!

ओसाड दऱ्यांतून वहा, नील जलांनो !
रानातच हसून फुला, रानफुलांनो
प्राशून पुराणी मदिरा धुंद रुपेरी
अज्ञात विदेशात फिरा ,चंद्रकलांनो

सौंदर्य, उषे, झाक तुझ्या रम्य तनुचे !
हे रंग, ढगांनो, लपवा इंद्रधनुचे
हे सर्व तुम्ही दूर रहा, दूर रहा, जा !
पापीच निघाले सगळे पुत्र मनुचे

आचार विरोधी सगळे जाचक यांचे
हेतूच मुळाशी सगळे घातक यांचे
यांना नसते कोमलता वा ममताही
जाळील जगाला सगळ्या पातक यांचे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ