रंकाची राणी

आनंदी, स्वच्छंदी गंधर्ववाणी
प्रीतीच्या दोघांनी नांदावे रानी;
लंघावे मोठाले नाले;
झेलावे झाडांचे पाले;
हौशीने गुंफाव्या पुष्पांच्या माळा:
आता, गऽ, लोकांचा कंटाळा आला!

हौशीने सोसावे दोघांनी धोके
हौशीने घ्यावे, गऽ, वेलींचे झोके!
दोघेही दोघांचे चाकर
वेळेला लाभावी भाकर
प्रीतीने प्राशावे ओढ्याचे पाणी
हसावी आनंदी रंकाची राणी

दुर्वांचे गालिचे विश्रांतीसाठी
भोताली रानाची चंदेरी शांती;
देवाची विश्वासू माया:
कोठेही टेकावी काया;
निद्रेने झाकावा जिवात्म सारा;
अंगाला लागावा रानाचा वारा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

आता

अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले गऽ!
एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले गऽ!

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू :
रंगले आभाळ पूर्वी : तेच आता फाटले गऽ!

चांदण्या रात्रीत मागे हिंडलो एकत्र दोघे :
चंद्रिकेने थाटले जे ते तमाने दाटले गऽ!

एकदा जी दो थडीने वाहिली होती, सखे त्या
जान्हवीचे शुद्ध पाणी संशयाने बाटले गऽ!

एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते, स्नेहतंतू आतले गऽ!

शेवटी मंदावलेल्या वादळी वा-याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे, गीत गाणे कोठले गऽ!

यातना दुःखांतली अन चेतना गेली सुखाची
झाकल्या नेत्रात आता अश्रुबिंदू गोठले गऽ!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

गणपती बाप्पा मोरया

जीवनकथा

चुकीच ही झाली
नको पण रागवू आता:
अनेक ठिगळांनी
पुरी कर ही जीवनकथा

नको दोष लावू:
मनोदौर्बल्यच हे माझे
नको अंत पाहू :
माझे झाक दैन्य जे जे

उप-या जगताला
करु दे विचार समतेचा
विकलित ह्र्दयाला
भरवसा तुझ्याच ममतेचा

खडतर वाट अती:
काटे फार दाटले, रे!
जागोजाग किती
माझे वस्त्र फाटले, रे!

हताश हाताने
कसे या छिद्रांना लपवू?
उघड्या लाजेने
कसे या जगामधे मिरवू?

चुकी जरी झाली
नको पण रागावू आता:
अनेक ठिगळांनी
पुरी कर ही जीवनकथा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

"तो काळा मेघ...."

डोळ्यांच्या कक्षात मावेना
आकाशीचा हा मेघ सावळा
मिठी मारुनी चढवुनी गेला
निळ्या आभाळा रंग काळा !

पिउनी निळाई आकाशाची
भरून घेई गाठोडी थेंबांची
क्षितिजावरती करून जाई
क्षणात उधळण सप्तरंगांची !

एका गावाहून दुसऱ्या गावा
सैरसपाटा करी मंद गतीने
पाहता सरस कुणा त्याहुनी
धुवूनी टाकतसे रूप तयाचे !

व्यापून उरला नभास साऱ्या
परि म्हणवितसे प्रत्येकाचा
उरी मेघाच्या असे दडलेला
पाऊस कैकांना सुखावणारा !

घडली क्षणाची भेट तयाची
ओघळला बनुनी पुसट रेघ
इवल्याश्या थेंबांत समेटला
विशालकाय तो काळा मेघ !


कवियत्री - प्रीत