डोक्यावर दाढी

गिराईक : केस कापायचे आणि दाढी करायचे किती पैसे?

नावी : केस कापायचे १५ रुपये, आणि दाढी करायचे ७ रुपये.

गिराईक : मग अस करा माझ्या डोक्यावर दाढी करा.

गरगरा फिरे भिंगरी

गरगरा फिरे भिंगरी – जशी – गरगरा फिरे भिंगरी !

लय गोड सखूचा गळा :
मैनाच म्हणू का तिला?
अंगावर नवती कळा
उरावर उडवीत आली सरी.

सारखी करी हुरहुरा
हाणते सखू पाखरा
सावरून पदरा जरा
मळाभर फिरते ही साजरी

ये पिसाटवारा पुरा !
अन् घाबरली सुंदरा
ये माघारी झरझरा
मिळाली संगत मोटेवरी

‘ये जवळ हरिण-पाडसा!’
लावला सूर मी असा;
अन साथ करित राजसा
सरकली जवळ जरा नाचरी

घेतला सखूचा मुका
(हं – कुणास सांगू नका!)
हलताच जराशी मका
उडाली वाऱ्यावर बावरी

गरगरा फिरे भिंगरी – जशी – गरगरा फिरे भिंगरी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तंत्रज्ञानाची प्रगती

वडिलांचा मुलाला ई-मेल.
बेटा तु कसा आहेस ?
मी व तुझी आई छान आहोत. आम्हाला तुझी फार आठवण येते.
चल तुझा कॉम्प्युटर बंद कर आणि जेवायला ये !

अपमृत्यू

होते चढते जीवन : झाली पण माती
आता ममतेच्या तुटल्या कोमल ताती
आता मरणाचा पडला निर्दय फासा
अतृप्तच गेली नवसंसारपिपासा

डोळे मिटलेले, पडली मान पहा ही
आहे उघडे तोंड, तरी बोलत नाही
छाती फुगलेली दिसते उंच जराशी
निर्जीव तरी हे धरले हात उराशी

अद्याप गताशाच जणू झाकत आहे
अद्याप उसासाच जणू टाकत आहे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कर्तबगारी

शत्रुंची दाणादाण उडवल्यावर मेजर बहद्दूरसिंगांनी संताला विचारले, "या लढाईत तू काय कर्तबगारी दाखवलीस?"

"सर", संता म्हणाला, "मी शत्रूच्या एका सैनिकाचा पायच कापला."

"पायाऎवजी तू त्याच मुंडकच उडवायला पाहिजे होतस." मेजर साहेब म्हणाले.

संता म्हणाला, "सर मुंडक आधिच कुणीतरी उडवल होतं...."

रानराणी

तू पूस डोळ्यातले पूरपाणी
रानराणी !

निमिषभर रहा तू
त्वरित परत जा तू
राहील चित्तातल्या गूढ पानी
ही कहाणी

करुण हृदयगाने
भर नंतर राने
दुरात येतील ते सूर कानी
दीनवाणी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सुंदरता

सुंदरतेचे मोहक दारुण
घडले दर्शन ओझरतेही
तर मग पुढते हे जग बुडते
एकच उरते ओढ अशी ही

क्षण बघतो जो कुणी बिचारा
चिन्मय तारा त्या गगनाची
तो वा-यागत जातो वाहत
छेडत छेडत तार मनाची

नभमुकुरांवर दुरांत दिसते
बिंबच नुसते हिचे जुगारी
उठतातच तर मग सिंधूवर
व्यथित अनावर लहरी लहरी

तिमिरामध्ये नीलारुण घन
मुकेच नर्तन ही करताना
मलय निरंतर करतो हुरहुर
सोडत वरवर श्वास पहा ना!

हे श्रावणघन-गर्जित सारे
वादळवारे, विद्युतरेषा -
ती मिळण्याची विश्वमनाची
कैक दिनांची व्यथित दुराशा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ