शिल्प

जे सांगायचे
ते हवे कसे अगदी घट्ट
बांधेसूद्;
प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द,
खुंट्या पिरगाळून
जागच्या जागी सुतंत्र
टांगलेला;
एकंदर ठाण कसे अगदी
वास्तुशिल्पित.
पण मध्येच
जे मधाचे पक्षी येऊन हलकारतात,
सळंग एखाद्या झाडाची सतारलेली
नक्षी वेल्हाळते,
वार्‍याची पताका चित्रावते,
त्याने सगळी आबोहवा वेगळून जाते
- मनासारखी.
शब्दांना
पटत नाही आपली पहिली ओळख.
ते बिथरतात
भलत्याच खुंट्या धरून बसतात्;
म्हणतात :
आम्हाला एक नवी भाषा
घालून द्या.
मी म्हणतो : हो, हो;
उगाच त्यांना चुचकारीत.


कवी -  पु.शि.रेगे

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही


कवी - कुसुमाग्रज

आधार

चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्या भोवती बांधते आहे
सरते पाश विरते नाते….
पुन्हा एकदा सांधते आहे

अहो माझे तारणहार
जांभळे मेघ धुवांधार
तेवढा पाऊस माघार घ्या
आकाशातल्या प्रवासाला
आता तरी आधार द्या
आधार म्हणजे
निराधार…



कवि -  कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

जखमांचं देणं

आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही.



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

सातवा

चमच्यांच्या स्टँडवर

सात चमचे होते

एक चमचा एक दिवशी

गहाळ झाला

उरलेल्या सहांच्या गळ्यातून

प्रथमच

अनावर हुंदका फुटला

‘ ती असती तर’ – ते उद्गारले,

तो हरवला नसता

मीही अनावरपणे

सातवा चमचा झालो

आणि त्याची रिकामी जागा घेउन

सहांच्या हुंदक्यात

सामील झालो – आणि

पुटपुटलो;

खरं आहे, मित्रांनो

ती असती तर

मी हरवलो नसतो.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

वास्तव

परवाच्या पेपरात एक बातमी वाचली
बातमी:
कालच्या पावसात
झोपडपट्टीतील एक मूल
वाहून गेले ,
बुडून मेले.

बुडाले तर बुडू द्या
मूल बुडाले म्हणजे काही पाच तारयांचे ताजमहाल
किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम नाही बुडाले

झोपडपट्टीतील एका उघड्या-नागड्या मूलाचे
असे मूल्य ते किती?
साधे गणित येत असेल तर करता येईल हिशेब
उत्तर अर्थात पैशातच
आणि हे मत तुमचे किंवा माझेच आहे असे नाही
त्याच्या आईचेही तेच असावे

कारण मुलाचे कलेवर मांडीवर घेउन
ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा
एक वार्ता वस्तीवर येऊन कोसळली.
यावेळी मात्र करुणामय मेघासारखी

वार्ता:
नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी
कुजलेल्या धान्याची पोती
ओतीत सुटला आहे उकिरड्यावर

बाईने आपला हंबरडा घशातच आवरला अर्ध्यावर
मूलाचे कलेवर जमिनीवर टाकून ती उठली
आणी घरातल्या सगळ्या पिशव्या गोळा करुन
बेफाम धावत सुटली
उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी.


कवी - कुसूमाग्रज