चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥१॥

चोखा सुखाचा सागर । चोखा भक्तिचा आगर ॥२॥

चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ॥३॥

चोखा मनाचें मोहन । वंका घाली लोटांगण ॥४॥


- संत वंका/ संत बंका
सर्व हा गोपाळ भरियेला.
काढले कुटाळ वासना वरळ ।
सर्व हा गोपाळ भरियेला ।।१।।

गेले पै परते शरीर दिसे ।
नाशिवंत भूते दूरी केली ।।२।।

स्थावर जंगम स्थावरिला राम ।
सर्वगत शाम नि:संदेहे ।।३।।

सोपान निवटे परब्रह्म घोटे ।
प्रपंच सपाट निवाटियेला ।।४।।


- संत सोपानदेव

वासुदेव

टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन ।
आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥ १ ॥

रामकृष्ण वासुदेवा । जाणवितों सकल जिवा ।
द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥ २ ॥

आलों दुरुनी सायास । द्याल दान मागायास ।
नका करूं माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥ ३ ॥

एक भाव देवाकारणें । फारसें नलगे देणें घेणें ।
करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥ ४ ॥

नका पाहूं काळ वेळां । दान देई वासुदेवा ।
व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणीं लागला गा ॥ ५ ॥




- संत सेनान्हावी
संपवून कामधाम यावें तुझियाजवळ

पापणीशीं झेपलेंलें जरा सारावें जावळ

आवराया बाळचाळे कवळावें दोही हातीं

रागारागावत गाल कुस्करावे भुक्या ओठीं

घ्यावें बळेंच कुशींत गात अंगाई लाडकी

काऊ चिऊंची धाडावी हट्टी झोपेला पालखी !

गंध पाकळींत रात सांजावल्या क्षितिजांत

तशी यावी नीज डोळां रेशमाच्या पावलांत

जड मिटतां पापणी घ्यावें ओढून उबेंत

मायकुशीला लाभावें शिंपपण भाग्यवंत !

मंगलाष्टक

दारी मंडप हा असे सजविला लावुनिया तोरणे
वाद्ये सुस्वर वाजती सुखवती आलाप आवर्तने
येती सर्व सुवासिनी प्रमुदिता लेउनिया भूषणे
आहे मंगल कार्य आज सदनी, "कुर्यात सदा मंगलम

कुणी टाकला डाका

कुणी टाकला डाका तर कोणी लुटलेले आहे
ह्या शहराचे शटर सारखे उचकटलेले आहे

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे

काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता
शर्टापेक्षा कपाळ ज्याचे कळकटलेले आहे

नवीन दुनिया सापडेल पण सवाल इतका आहे
काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे

कुठे न माझा मागमूस मी कसा पोचलो इथवर
मला कोणत्या जनावराने फरफटलेले आहे


कवी - चित्तरंजन भट

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?

केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा

नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा

रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?

आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !

भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा

"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा


कवी - चित्तरंजन भट