वाटा

हरवलेल्या वाटा....
चुकलेल्या वाटा....
रुळलेल्या वाटा....
पहिली धरते एक हात;
दुसरी धरते दुसरा;
पाय ओढून तिसरी म्हणते
आता इथेच पसरा !


कवियत्री - पद्मा गोळे

पोपट आणि ड्रायव्हर !

एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.

त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.

तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्‍यात ठेवतो.

ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्‍यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो," अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."

चार होत्या पक्षिणी त्या

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाळा एक होती सावली

तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपिली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, त्यात सारे पावले



कवी - कुसुमाग्रज
(वीज म्हणाली धरतीला)

राष्ट्रपिता

एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.

नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.

त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.

हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले. लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?"
गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात?"

हदग्याच्या एखाद्या पावसात

हदग्याच्या एखाद्या पावसात
उलगून जाते विस्मरण
आणि नादावल्या काळाचे अंगण पुन्हा दिसू लागते
पाय नाचू लागतात
जुनी हरवलेली गाणी मिळतात
आभाळाच्या हत्तीभोवती फेर धरण्याइतके
पुन्हा लहान होतो आपण
हातावर टेकवलेली खिरापत, तसे हसावे कुणी
आणि गोड व्हावा सरता दिवस
असे आपसूक मिळतात सुखाचे क्षण
सगळ्या भवतालावरचा बाळविश्वास
नकळत आपल्यात रुजून मोठा झालेला दिसतो पुन्हा
आणि करावासा वाटतो परत एकदा
आभाळाएवढ्या आयुष्याभोवती फेर धरत
आतबाहेर चिंब भिजण्याचा सचैल गुन्हा


कवियत्री - अरुणा ढेरे

आधार

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही.
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
माणसाला उपकार आणि आणि त्याची
निर्व्याज परतफेड करता येत आहे,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा
सहजच नमस्कार करतो आहे
तोवर आम्हाला एकमेकांबरोबर
अबोला धरण्याचा अधिकार नाही.
आम्ही आमच्या पडजिभेइतकेच
सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत.
कालच प्रत्येक क्षण उष्टावतो
तरी काल ताजा टवटवीत आहे.

ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येकजण
बारा दिवसाच्या अर्भकाइतक्याच
हळुवारपणे सर्व तर्‍हांनी धूत राहतो,
आपापल्या मापाचे पापपुण्य बेतून
सगळे आयुष्य कारणी लावतो.
म्हणून कधीतरीची प्रसन्नताही
मनाची उन्हे करते आणि सारा ताप
उन्हातला पाऊस होऊन टपटपतो.
धरेच्या पोटात पाणी आहे,
घशाखाली त्याची तहान आहे,
माणसाच्या पोटात आनंद आहे
म्हणूनच नेहमी भूक लागते,
इंद्रियांची वेल पसरत पसरत
झोपेचा गारेगार मोगरा फुलतो.

शेतकरी पिकाला जपत असतो
पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस
कायावाचामनाचा पावसाळा करुन
मातीच्या कणाकणातून झिरपतो,
अशा वेळी आकाशाच्या कोनन कोनाचा
स्पर्श त्याला झुळकाझुळकातून होतो,
हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो.
दाण्यादाण्यातील धारोष्ण दुधाची जाग
पाखरांच्या पिसापिसातून जाते,
थव्याथव्यांनी आनंद उतरतो,
शेतमळा डुलतो, वारा डुलतो,
शेताचा पिका पिका दरवळ
झुळझुळत्या झर्‍यासारखा
शेतकर्‍याच्या मनातून वाहतो,
सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.

जीवनावर प्रेम करणारे सगळे जण
एकमेकांना नमस्कार करीत करीत
सुखदुःख वाटतात जिवाभावाने.
सर्वांना पोटाशी धरुन सर्वांवर
स्वत:च्या आयुष्याची सावली धरतात,
एखादा अनवाणी चालणारा विरक्‍त पाहून
सांगतात : सर्वांच्या पायतळी जमीन आहे.
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात.

सखीने सजणाल्या दिलेल्या गुलाबाच्या
गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच
कधीतरी मन दिले - घेतलेले असतो;
सखी-सजणाच्या संकेतस्थलासारखेच
हे आयुष्यही एकमेकांचेच आहे.

या जगण्यात खोल बुडी मारुन आलेला
एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
रमेश : माझ्या प्रेयसीने अशी मागणी केली ज्यामुळे मी तिला सोडून दिले .
दिनेश : पण तिची मागणी तरी काय होती ?
.
.
.
... .
.
.
.
.

रमेश : लग्नाची !