लग्नाचं गाण

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या नथासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या डुलासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या पैंजनासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या बांगडीसाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या लेणसाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या चोळीसाठी, मोडं खजिना.

जॅकरांडा

जॅकरांडा जॅकरांडा
वाट भरून घाट भरून
बागांमधून जागा धरून
इथे तिथे जिथे तिथे
वळणावरून फिरून फिरून
खूप खूप जॅकरांडा !

उन्हामधे कात टाकून
अंगणामधे न्हाऊन माखून
सावलीमध्ये जांभळी झोकून
रंगानेच अंग झाकून
उंच-नींच जॅकरांडा !
ओठी चित्रपंखा धरून
छत्रीखाली जॅकरांडा !


कोपर्‍यावरती खुणा करीत
आव्हान देत जॅकरांडा ..
पक्के शिक्के जॅकरांडा
डोळेभर जॅकरांडा
डोकेभर जॅकरांडा !

हाडांमधून घसरणार्‍या
नसाभर पसरणार्‍या
मणक्यांमधे मणीमणी
वरवर सरकणार्‍या
रंग-रस जॅकरांडा !

इथेतिथे जिथेतिथे उघड उघड जॅकरांडा !
फुफ्फुसांच्या कप्प्यांमधून लप्पेछप्पे जॅकरांडा !

जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा !


कवी - वसंत बापट

केळी साठी नापास

बन्डु नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकांना बोलवितात.

गुरुजी : मी बन्डुला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातील मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही.

बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.

आठवणी

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,
काय देणार ?
मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच...
मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या,
पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे --
दुसरी म्हणेल, हात द्या
न धरता आम्हाला पकडून ठेवणारे --
तिसरी म्हणेल, शब्द द्या,
इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे --

पण कुणाला काहीच देऊ नये;
शब्द तर मुळीच देऊ नयेत !
चवथी, पाचवी -- सगळ्या होतील पुढं;
पण मधभरल्या गळ्यानं नुसतंच हूं म्हणावं.
डोळे मिटून घ्यावेत
अन सगळ्यांना कुरवाळीत, कुरवाळीत
मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं
-- पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी


कवियत्री - पद्मा गोळे

वाटा

हरवलेल्या वाटा....
चुकलेल्या वाटा....
रुळलेल्या वाटा....
पहिली धरते एक हात;
दुसरी धरते दुसरा;
पाय ओढून तिसरी म्हणते
आता इथेच पसरा !


कवियत्री - पद्मा गोळे

पोपट आणि ड्रायव्हर !

एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.

त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.

तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्‍यात ठेवतो.

ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्‍यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो," अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."

चार होत्या पक्षिणी त्या

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाळा एक होती सावली

तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपिली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, त्यात सारे पावले



कवी - कुसुमाग्रज
(वीज म्हणाली धरतीला)