हीच दैना

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.

आकाशाची निळी भाषा
ऍकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध

अर्धीच रात्र वेडी

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी


गीत – विं. दा. करंदीकर
कवितासंग्रह - जातक
संगीत – यशवंत देव
स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

ऋणाईत

स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...


कवी - केशव तानाजी मेश्राम

ते देशासाठी लढले

ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !


कवी - वि. म. कुलकर्णी

पिंपळाचे पान

वसंतात गळतात पिंपळाची पाने,

रंग संपून हिरवा, पान पान होते जुने...

प्रेम वाटले पानाला... काही दिवस लोटले,

’जाळीदार’ पानामुळे बालमन आनंदले...

पुन्हा फुटेल पालवी - पिंपळाच्या फांदयांतून,

पान पुस्तकामधले पाहील हो डोकावून....

एका शहाण्या मुलाने एक पान उचलले,

आणि नव्या पुस्तकात हळू जपून ठेवले...

’जुन्या-नव्याचा हा खेळ’ कधीपासून चालला,

दोन्हींवर प्रेम करु - पाहू आपण सोहळा !


कवी - वि.म. कुलकर्णी

हरपलें श्रेय

( उदात्त बुद्धीला संसारांत राम नाही. अलीलिक असें जें कांहीं तिला
पाहिजे असतें, तें तिच्या हक्काचें असून देखील, त्याच्या प्राप्तीकरितां
तिला झुरत पडावें लागत नाहीं काय ? )

त्रिखंड हिंडुनि धुंडितसें,
“ परि हरपलें तें गवसे ! ॥ध्रु०॥
हेत्यें अजाण माहेरीं
तों खेळ खेळल्यें परोपरी
लटूपटीच्या घरदारीं
लटकीच जाहल्यें संसारी;
तेव्हांचें सुख तें आतां
खर्‍या घरींहि न ये हाता !

चुकचुकल्यापरि
वाटे अन्तरि,
होउनि बावरि

निज श्रेय मी पाहतसें,
न परि हरपलें तें गवसे !
प्राप्त जाहले तें तुजला
तूं मागितलें जें देवाला,
ज्याचें मोल तुवां दिधलें
तेंच तुझ्या पदरी पडलें ---
या वचनें चुकला सौदा
उमगुनि ह्र्दया दे खेदा !

दिलें हिरण्मय,
हातीं मृण्मय;
हा हतविनिमय

परत मला मम मिळे कसें ?
न परि हरपलें तें गवसे !
किरण झरोक्यांतुनी पडे,
अणूंसवें त्यांतून उडे
परोक्षविषयीं मन माझें
विसरुनियां अवघीं काजें;
हयगय त्यांची मज जाची
परि न मला पर्वा त्याची !
वेडी होउन
बसल्यें अनुदिन
एकच घेउन ---

मज माझें लाभेल कसें ?
न परि हरपलें तें गवसे !
जेथें ओढे वनराजी
वृत्ति रमे तेथें माझी;
कारण कांहीं साक्ष तिथें
मम त्या श्रेयाची पटते;
म्हणुनी विजनीं मी जात्यें,
स्वच्छन्दें त्या आळवित्यें.

स्वभाव दावुनि
परि तें झटदिनिं
जाई लोपुनि !

मग मी हांका मारितसे !
न परि हरपलें तें गवसे !
भीडभाड माझी फिटली,
जग म्हणतें कीं, ’ ही उठली !’
जनमर्यादा धरुनि कसें
अमर्याद तें मज गवसे ?
एक शब्द बोलेन जरी
सकलीं कुष्ठित करिन तरी !

अशी आगळी
परी बावळी
आहे दुबळी ;

कांकीं त्याविण सुचत नसे !
न परि हरपलें तें गवसे !
स्वपतिचितेवरि उडी सती
संसृतिविमुखीं घेई ती;
दीपशिखेवरि पतंग तो

प्रेमें प्राणाहुति देतो;
मी न करिन का तेंवि तधीं
माझें मज लाभेल जधीं !

मजपासोनी

हाय ! हिरोनी
नेलें कोणीं !---

म्हणुनि जीव पाखडीतसे
न परि हरपलें तें गवसे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- चिपळूण, २५ मे १९०५

केशवसुत