तिलगूळ

देणे घेणे इथे कुणी हो कुणाला ?

गुणांनी गुणांला गुणायचे !

अधिकाची पेठ इथे उण्यातून

इथे कडूतून गोडपना

पिकल्या शेताचे सुरू इथे खेळ

मापणार खूळे मापोते ते !

अवघ्या भावांचा झाला इथे काला

अवघ्यांचा धाला जीव इथे

तरी हा एवढा घ्यावा तिलगूळ

हवे तर खूळ म्हणा माझे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बळ

दुबळ्याचे बळ माझे ते कितीक !

तरी कवतुक झाले किती !

दरिद्र्याचे घरी लुटिले भांडार

देउन कुबेर-मोठेपना

अज्ञानाचा बुक्का लावून कपाळा

ज्ञानाचा सोहळा केला तुम्ही

वाळवंटी तुम्ही पिकविला मळा

माझी किती कळा जाणे मीच !

जड झाले भारी भलाईचे ओझे

कसे रीण माझे फिटणार?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नाहीतर उरी फुटशील !

चिमुकल्या अरे गोजिर्‍या पाखरा,

झाला का पिंजरा नकोसा हा ?

का रे थरथर असा कापतोस?

का रे पाहतोस दीनवाणे ?

छळ होतो तुझा ठाऊक हे मला

परी तुझा गळा थांबला का?

कधीतरी तुझी होणार सुटका

निःश्वास असा का सोडितोस ?

गाऊ ह्रदय मोकळे तू करी

नाहीतर उरी फुटशील !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जिद्दी कोंबडी

चम्प्याने एकदा कोंबडी विकत घेतली..

आणि तिला एका पिंजर्यात बंद केलं..

पण कोंबडी तर जिद्दी होती..लगेच मागच्या बाजूने निघून गेली..

चम्प्याने तिला पकडला आणि परत पिंजर्यात टाकलं..

पण कोंबडी तर जिद्दी..परत मागच्या बाजूने निखून गेली..

चम्प्याला आला राग..त्याने त्या कोंबडीला पकडलं आणि कापून खाऊन टाकलं..

पण कोंबडी तर जिद्दी होती........

चुल्हा पेटता पेटेना !

घरीं दाटला धुक्कय

कसा हाटतां हाटेना

माझे डोये झाले लाल

चुल्हा पेटतां पेटेना

चुल्हा किती फुका फुका

लागल्या रे घरामंधी

अवघ्याले भुका भुका

आतां सांपडेना हातीं

कुठे फूकनी बी मेली

कुठे पट्टवकरीन-

'नूरी, पयीसन गेली.

आतां गेल्या सरीसनी

पेटीमंधल्या आक्काड्या

सर्व्या गेल्या बयीसनी

घरामधल्या संकाड्या

पेट पेट धुक्कयेला,

किती घेसी माझा जीव

आरे इस्तवाच्या धन्या !

कसं आलं तुले हींव !

तशी खांबाशी फूकनी

सांपडली सांपडली

फुकी-फुकीसनी आग

पाखडली पाखडली !

आरे फूकनी फूकतां

इस्तो वाजे तडतड

तव्हां धगला धगला

चुल्हा कसा धडधड

मंग टाकला उसासा

थोडा घेतला इसावा

एकदांचा आदयला

झट चुल्ह्यावर तावा

आतां रांधते भाकर

चुल्ह्यावर ताजी ताजी

मांघे शिजे वजेवजे

मांगचुल्हीवर भाजी

खूप रांधल्या भाकरी

दुल्ळी गेली भरीसनी

मंग हात धोईसनी

इस्त्यावर पडे पानी

इस्त्यावर पडे पानी

आली वाफ हात लासे

तव्हां उचलता तावा

कसा खदखदा हांसे !


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

कुर्‍हाडीच्या दांड्या

कुर्‍हाडीच्या दांड्या, सांभाळ सांभाळ

का रे होसी काळ गोतास तू ?

किती झाले ठार, किती जायबंद

तुझे भाईबंद शस्त्रे तुझ्या !

वृथा तुझी प्रौढी, गर्व-अहंगण्ड

उदंड तू दण्ड भोगशील !

देत मी इषारा, सावध सावध !!

नको आत्मवध करू ऐसा !

उलटेल शस्त्र उफाळून थंड

त्यात शतखंड होशील तू !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

उमर खय्यामा

उमर खय्यामा, गाऊन रुबाया

होशी कविवर्या अमर तू

जगाच्या फुलाचा घेतला आस्वाद

लुटिला आनंद तूच खरा !

जीवन-मद्याचा पेला काठोकाठ

भरून आकंठ प्यालास तू

तूच ठरविले वेडे शहाण्यांना

वेडा तू शहाणा ठरलास !

तुझे ते काव्यात्म, प्रसन्न सदय

विशाल ह्रदय देशील का?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या