आपुले मन

आपुले मन तू मोठे करशील

होईल मंगल सर्व काही

हासून उमले फूळ कळीतून

सुंदर प्रसन्न वेल दिसे

निर्मळ वाहतो झरा थुईथुई

दरीखोरे होई शोभिवंत

खुला करी कंठ कोकीळ गाऊन

जादूने भारून टाकी राई

का रे धुमसशी मनी मूढ प्राण्या,

दे रे कुढेपणा टाकून तो


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मोट हाकलतो एक

येहेरींत दोन मोटा

दोन्हींमधीं पानी एक

आडोयाले कना, चाक

दोन्हींमधीं गती एक

दोन्ही नाडा-समदूर

दोन्हींमधीं झीज एक

दोन्ही बैलाचं ओढणं

दोन्हींमधीं ओढ एक

उतरनी-चढनीचे

नांव दोन धाव एक

मोट हाकलतो एक

जीव पोसतो कितीक?


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

कुणी शिकविले

"कुणी शिकविले रचाया कवने?"

पुसती लाडाने बाळे माझी

"सोनुल्यांनो, होतो तुमच्यासारखा

आईचा लाडका बाळ मीही

मांडीवर मला निजवून आई

जात्यावर गाई गोड ओव्या

ऐकून प्रेमळ, प्रासादिक काव्य

फुलून ह्रदय गेले माझे

मनाशी लागलो करू गुणगुण

म्हणता 'कवन' त्याला तुम्ही!"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

लुटा हो लुटा

नाही माझे धन कधी झाले कमी

कुणबी असा मी भाग्यशाली

अलुत्यांनो या हो, बलुत्यांनो या हो,

लुटा हो लुटा हो माझे खळे !

देवाजीने दिली मला ही देणगी

सदा ही कणगी भरलेली

सुखाने आपुला घेऊन जा घास

कमी नाही रास व्हायची ही

नंतर मी माझी खाईन भाकर

देईन ढेकर समाधाने


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

खरा जो कुणबी

मृगाचा पडला पाऊस पहिला

वापसा जाहला पेरणीला

खरा जो कुणबी साधितो ही घात

झाकुनीया प्रेत म्हातारीचे

धरूनी पाभर करितो पेरणी

करी मागाहूनी क्रियाकर्म

जीवनात माझ्या आज आली घात

मनसोक्त गात बैसणार

कसाहि कुणाचा येवो अडथळा

नाही माझा गळा थांबणार


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या


आनंद भैरवी

१. छेड अशीच शरीरसतार ।
२. तुझ्याजवळी ।
३. खंजीर हे मारीत जा ।
४. डोळे तुझे बदामी ।
५. माझी बेगम ।
६. माझ्यापरी ।
७. नवल ।
८. रसवंती ।
९. काळास ।
१०. रात्रीचे पाखरू ।
११. रात्र निळी रात्र निळी ।
१२.  तव नयनाचे दल हलले ग ।
१३. खाईतला स्वर्ग ।
१४. रुमडाला सुम आले ग ।
१५. समजावणी
१६. पाण्याला ओढ लागली थोर ।
१७. आणखिन काय ?।

चाळीसाव्या वाढदिवशी

बांधवांनो, आज माझा वाढदीस

लोटली चाळीस वर्षे वया

चाळीस पानांचा ग्रंथ मी लिहिला

पाहिजे पाहिला तपासुनी

जाहल्या चुका ज्या जाणून नेणून

दुरुस्त करीन शुद्धिपत्री

देवाच्या आज्ञेने आज मी नवीन

उघडून पान लिहू लागे

सरस, सुरेख उतराया लेख

प्रभुजीची एक हवी कृपा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या