संस्कृतीचा गर्व

विकट हासूनी काळ ओरडला,

"खुळ्यांनो, तुम्हाला भान नाही

हजारो हजार वर्षापाठीमागे

तुम्हा जावे लागे खुणेसाठी

कोण होता तुम्ही? पटली ओळख?

आता का रे सुख चुकविता?

हजारो हजार वर्षे लोटतील

प्राप्त ती होईल गती पुन्हा

नका वाहू व्यर्थ संस्कृतीचा गर्व

हारवीन सर्व क्षणमात्रे !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

असा तू प्रवासी विक्षिप्त रे !

मुख मागे पण पुढे तू चालशी

रीत तुझी अशी उफराटी

सरळ का तुझे पडते पाऊल !

तुझी वाटचाल नाही सुधी

तुझी कुरकुर पाउलागणिक

नेहमी साशंक मुद्रा तुझी

मागीलासंबंधी प्रशंसा अक्षयी

पुढीलांविषयी पूर्वग्रह

पुढे पुढे तरी चालत असशी

असा तू प्रवासी विक्षिप्त रे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

रामराज्य मागे कधी झाले नाही

रामराज्य मागे कधी झाले नाही

होणार पुढेही नाही कधी

केवळ ते होते गोड मनोराज्य

कल्पनेचे काव्य वाल्मीकिचे

कधीच नव्हती रावणाची लंका

अपकीर्ति-डंका व्यर्थ त्याचा !

दोन्ही अधिराज्ये होती मानवांची

नव्हती देवांची -दानवांची

भाविकांनो, झाली होती दिशाभूल

सोडूनी द्या खूळ आता तरी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आई मानवते

आई मानवते, आता तुझी काही

बघवत नाही विटंबना

आक्रोश तुझा गे ऐकवत नाही

बघवत नाही अश्रु तुझे

उन्मत्त जाहले शंभर कौरव

जाहले पांडव हतबुद्ध

द्रौपदीस छळी दुष्ट दुःशासन

मिळे त्या शासन प्राणांतिक

कोण कृष्ण तुझी राखावया लाज

अवतार आज घेणार गे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मानवाचा आला पहिला नंबर

पशूंचे एकदा भरे सम्मेलन

होते आमंत्रण मानवाला

"दुबळा, भेकड, क्षुद्र कोण प्राणी !"

करी हेटाळणी जो तो त्याची

"ऐका हो," बोलला अध्यक्ष केसरि

"जाहीर मी करी बक्षीस हे

क्रूर हिंसा-कर्मी उच्चाङक गाठील

पात्र तो होईल बक्षिसाला"

मानवाचा आला पहिला नंबर

लाजले इतर पशु हिंस्त्र !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जातीवर गेला मानव आपुल्या

अणुस्फोटकाचा नका मानू रोष

सारा आहे दोष मानवाचा

मानव म्हणजे एक पशुवंश

मुख्य तो विध्वंस-कर्म जाणे

अणुरेणूमध्ये वसे परब्रह्म

गेला वेदधर्म विसरुनी

मर्कटाच्या हाती दिधले कोलीत

सुटले लावीत आग जगा

जातीवर गेला मानव आपुल्या व्हायचा होऊ द्या नाश आता !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अभागिनी आई

का गे रडतेस आता धायधाय !

आणि हाय हाय म्हणतेस !

शेफारले पोर तुझे खोडकर

झाले अनावर आता तुला

नको म्हणताही कोठाराची किल्ली

त्याचे हाती दिली भोळेपणे

गुप्त तिथे होती संदूक ठेविली

अखेर लागली त्याचे हाती

अभागिनी आई, पुरा झाला घात

तुझ्या नशिबात दुःख आता !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या